Sunday, May 11, 2025

विदेशमहत्वाची बातमी

Dhaka: बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये अग्नितांडव, ४३ जणांचा होरपळून मृत्यू

Dhaka: बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये अग्नितांडव, ४३ जणांचा होरपळून मृत्यू

ढाका: बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये गुरूवारी रात्री अग्नितांडव पाहायला मिळाले. राजधानीमध्ये ६ मजली शॉपिंग मॉलला आग लागल्याने कमीत कमी ४३ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक डझन लोक जखमी झाले आहेत. आरोग्यमंत्री समंता लाल सेन यांनी दिलेल्या माहितीनुसार ढाकाच्या डाऊनटाऊन परिसरात गुरूवारी रात्री आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी जिवंत लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. या दुर्घटनेत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे तर २२ जणांवर उपचार सुरू आहेत.


आरोग्य मंत्र्यांनी सांगितले की मॉलच्या आतून अग्निशमन दलाच्या जवानांनी जळालेले मृतदेह बाहेर काढले. महिला आणि मुलांसह ३३ जणांना ढाका मेडिक कॉलेज रूग्णालयात मृत घोषित करण्यात आले तर १० जणांना शेख हसीना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बर्न अँड प्लास्टिक सर्जरी येथे आणण्यात आले होते. येथेही डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आग लागल्याची ही घटना बेली रोड परिसरात शॉपिंग मॉलसमोर घडली.



कशी लागली आग?


अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले की शॉपिंग मॉलमधील पहिल्या मजल्यावरील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये आग लागण्यास सुरूवात झाली. यांनंतर पाहता पाहता आगीने संपूर्ण इमारतीला लपेटले. रेस्टॉरंटमध्ये गॅस सिलेंडर असल्याने ही आग जोरात भडकली. आग लागल्यानेक अनेकजण इमारतीच्या आतच अडकले. दरम्यान, रेस्टॉरंटमध्ये ही आग कशामुळे लागली याचे कारण समोर आलेले नाही.

जीव वाचवण्यासाठी इमारतीतून मारल्या उड्या


कच्ची भाई या नावाच्या रेस्टॉरंटमध्ये रात्री पावणेदहाच्या सुमारास आग लागली होती. त्यानंतर साडेबाराच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले. अनेकांनी आगीपासून बचावासाठी इमारतीवरून उडी मारणे योग्य ठरवले. यात अनकेांचा मृत्यू झाला.
Comments
Add Comment