मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीनंतर नवी मुंबईतील बहुप्रतिक्षित असलेले महाराष्ट्र भवनाचे भूमीपूजन करण्यात येईल असे राज्याचे उपमुख्यमंत्री. तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले.
सिडको वतीने वाशी सेक्टर- ३० येथे ‘महाराष्ट्र भवन’ साठी भुखंड दिला आहे. देशातील अनेक राज्यांचे भवन बाधून तयार झाले आहेत. परंतू, महाराष्ट्र भवनाचे बांधकाम अद्याप सुरू झालेले नाही. अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्र भवन सुद्धा भव्य दिव्य उभारण्यात यावे यासाठी बेलापूर मतदार संघाच्या आमदार मंदा म्हात्रे या सिडको, महापालिका आणि राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा करत आहेत.
सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा करताना पुन्हा मंदा म्हात्रे यांनी महाराष्ट्र भवनाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मे महिन्यात संपल्यानंतर, मुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात येईल, असे सांगितले.