घर खरेदीसाठी अधिवास पत्राची गरज नसल्याचे पुस्तिकेत नमूद
अधिवास पत्र बंधनकारक असल्याचे सिडकोने केले स्पष्ट
नवी मुंबई(प्रतिनिधी) : महाराष्ट्रात घर घ्यायचं असेल तर महाराष्ट्रात किमान १५ वर्षे अधिवासाचा पुरावा (डोमिसाईल प्रमाणपत्र) सादर करणे घर खरेदीदाराला बंधनकारक आहे. असे असताना सिडकोच्या मार्केटिंग विभागातील अधिकारी-कर्मचाऱयांनी कामावर काढलेल्या डुलक्यांमुळे सिडकोने नुकत्याच जाहीर केलेल्या गृहनिर्माण योजना (जानेवारी २०२४) पुस्तिकेमध्ये महाराष्ट्रातील अधिवास प्रमाणपत्राची गरज नसल्याचे नमूद केल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
मार्केटिंग विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतची चूक लपवण्यासाठी सदर प्रकाराला टायपो एररचे नाव देऊन स्वतची कातडी बचावण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच आता सिडकोच्या महागृहनिर्माण योजना जानेवारी – २०२४ मधील सदनिकांकरिता अर्ज करणाऱ्या ग्राहकांना महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याबाबतचे अधिवास प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असल्याचे सिडकोतर्फे जाहीर करण्यात आले आहे.
सिडकोच्या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या सदर योजनेच्या माहितीपुस्तिकेत अनावधानाने अल्प उत्पन्न गट/ सर्वसाधारण गटासाठी महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही असे टंकलिखित झाले असल्याचे सिडकोने प्रसारमाध्यमांना कळविले आहे.
सिडकोतर्फे २६ जानेवारी २०२४ रोजी महागृहनिर्माण योजना जानेवारी – २०२४ जाहीर करण्यात आली. या योजनेंतर्गत एकूण ३,३२२ सदनिका प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिकदृष्टया दुर्बल घटक आणि सर्वसाधारण गटातील नागरिकांकरिता द्रोणागिरी आणि तळोजा नोडमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.