Friday, July 5, 2024
Homeताज्या घडामोडी1993 Serial Bomb Blast : १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अब्दुल...

1993 Serial Bomb Blast : १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अब्दुल करीम टुंडाची निर्दोष मुक्तता

अजमेरच्या टाडा कोर्टाने दिला निर्णय

मुंबई : १९९३ मध्ये मुंबई, कानपूर, हैदराबाद, सुरत आणि लखनऊच्या काही ट्रेनमध्ये एकापाठोपाठ एक स्फोट (1993 Serial Bomb Blast) झाले होते. या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अब्दुल करीम टुंडा (Abdul Karim Tunda) याची राजस्थानमधील अजमेरच्या टाडा न्यायालयाने (Tada Court) निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल ३१ वर्षांनतर तो निर्दोष असल्याचा निकाल देण्यात आला आहे. यासह टाडा न्यायालयाने इरफान आणि हमीदुद्दीन यांना दोषी घोषित केले आहे.

१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अब्दुल करिब टुंडा, इरफान आणि हमीमुद्दीन यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. सीबीआयने टुंडाला या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड मानले होते आणि त्याला २०१३ मध्ये नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आली होती. सर्व आरोपींविरुद्ध टाडा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आतापर्यंत दीडशेहून अधिक जणांची साक्ष झाली आहे.

कोण आहे टुंडा?

मुंबई बॉम्बस्फोटात सहभागी होण्यापूर्वी टुंडाने जलीस अन्सारी सोबत मुंबईतील मुस्लिम समाजासाठी काम करण्याच्या उद्देशाने ‘तन्झीम इस्लाह-उल-मुस्लिमीन’ या संघटनेची स्थापना केली. मध्य दिल्लीतील दर्यागंजमधील छत्तालाल मियाँ भागात एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या टुंडाने उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील पिलखुआ गावातील बाजार खुर्द भागात आपल्या मूळ गावी सुतार म्हणून काम करायला सुरुवात केली. तो त्याच्या वडिलांना मदत करू लागला.

वडिलांच्या मृत्यूनंतर टुंडाने उदरनिर्वाहासाठी भंगाराचे काम सुरू केले आणि कट्टरपंथी जिहादी दहशतवादी बनण्यापूर्वी कपड्यांचा व्यवसायही केला. ८० च्या दशकात तो पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लष्कर-ए-तैयबाच्या संपर्कात आला. टुंडाने मूलतत्त्ववाद स्वीकारला. अब्दुल करीम टुंडा लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय आहे. टुंडाने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयकडून दहशत पसरवण्याचे प्रशिक्षण घेतल्याचा दावाही केला जात आहे.

टुंडावर आणखी काही दहशतवादाचे खटले

अब्दुल टुंडावर देशात विविध ठिकाणी दहशतवादाचे खटले प्रलंबित आहेत. त्याने तरुणांना भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रशिक्षण दिल्याचा आरोप आहे. जुनैद या पाकिस्तानी नागरिकासह त्याने १९९८ मध्ये गणेशोत्सवादरम्यान दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखल्याचेही बोलले जाते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -