
जाणून घ्या तिचा होणारा नवरा आणि लग्नाविषयी...
मुंबई : दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टी आणि बॉलीवूडमध्येही (Bollywood) आपला ठसा उमटवलेली अभिनेत्री तापसी पन्नूचा (Taapsee Pannu) मोठा चाहतावर्ग आहे. आजवर तिने अनेकविध भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तापसी आता लवकरच तिचा बॉयफ्रेंड मॅथियास बो (Mathias Boe) याच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. उदयपूरमध्ये शीख व ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने त्यांचा भव्य लग्नसोहळा पार पडणार आहे.
मॅथियास बो हा बॅडमिंटन खेळाडू (Badminton player) असून तो डेन्मार्कचा रहिवासी आहे. तापसी आणि मॅथियास गेल्या १० वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. तापसी अनेकदा मुलाखतींमध्ये आणि सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबद्दल मनमोकळेपणाने बोलली आहे. मार्चच्या अखेरीस उदयपूरमध्ये संपूर्ण कुटुंबासमवेत दोघांचा लग्नसोहळा पार पडेल आणि या लग्नाला कोणत्याही बॉलीवूड कलाकारांना आमंत्रित केले जाणार नाही.
लग्नात भरपूर नृत्य आणि जेवण वेळेवर
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तापसी म्हणाली होती की, “मला एकदिवसीय लग्नसोहळा करायचा आहे, ज्यात कलर पॅलेट न्यूड आणि फिकट रंगाचं असेल. माझं लग्न एकदम बेसिक आणि ड्रामा फ्री असायला हवं, कारण तसंही माझ्या प्रोफेशनल आयुष्यात आधीच खूप ड्रामा आहे आणि हा ड्रामा मला माझ्या वैयक्तिक आयुष्यात नकोय. तसंच लग्नात भरपूर नृत्य आणि जेवण वेळेवर असेल”, असं तिने सांगितलं होतं.
वेडिंग लूकबद्दल बोलताना तापसी म्हणाली, “मला हेअरस्टाईलबद्दल आता बोलायचं नाही. परंतु, जेव्हा ब्राईड्स हेवी मेकअप करतात तेव्हा मला अतिशय वाईट वाटतं. जर तुमच्या लग्नाच्या फोटोजमध्ये तुम्ही इतके वेगळे दिसत असाल तर तुम्ही कसं काय एन्जॉय करू शकाल? या आठवणी काही क्षणांपुरत्या नसून त्या कायमच्या असतात.”
‘वो लडकी है कहा’ मध्ये दिसणार तापसी
२०१३ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘चश्मे बद्दूर’ या चित्रपटातून तापसीने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘डंकी’ या चित्रपटात तापसी पन्नू शाहरुखसह प्रमुख भूमिकेत दिसली होती. यानंतर आता ‘वो लडकी है कहा’ या आगामी चित्रपटात तापसी पन्नू ‘स्कॅम १९९२’ फेम अभिनेता प्रतिक गांधी याच्याबरोबर झळकणार आहे.