डॉ. महेश अभ्यंकर, मुख्य समन्वयक, ग्रंथ तुमच्या दारी – मुंबई
दि.२७ फेब्रुवारी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. जगभरात हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. पुढील दोन दशकांमध्ये भारत देशाला वैश्विक गुरू बनविताना मराठी भाषा आणि महाराष्ट्र प्रांत सिंहाचा वाट उचलणार, यात काहीच शंका नाही.
‘वाचाल तर वाचाल, वाचाल तर वाढाल, वाचाल तर आनंदी राहाल’, वाचनाची आवड हे आपल्याला मिळालेले एक वरदान आहे. ज्ञान मिळविण्याचे एक प्रमुख साधन म्हणजे पुस्तके. व्यक्तिगत आणि सामाजिक कौशल्य हे पुस्तकातून विकसित करता येतात, आत्मचरित्रे वाचली की जीवन जगण्याला प्रेरणा मिळते, नवीन कल्पना सुचतात. ‘इमोझील, मनोबल उंचवणाऱ्या कथा’ या पुस्तकाने दहा हजार वाचकांचा वेध घेतला. वाचन कधी कधी आनंद मिळविण्यासाठी करावे.
प्रवासवर्णने अथवा विनोदी वाचनामुळे मानसिक तणाव, कंटाळवाणेपणा आणि एकाकीपणा दूर होतो. पुस्तक रोग्याच्या वेदनेवर फुंकर घालते. काही उत्तम भाषांतरित पुस्तके संग्रही ठेवावीत. वाचनाने माणूस चिंतनशील बनतो. वाचन हे आपल्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक प्रगतीसाठी पोषक ठरते. एक पुस्तक आपल्या आयुष्याला कलाटणी देऊ शकते. माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये स्वामी विवेकानंदांचा ‘कर्मयोग’ आमूलाग्र बदल घडविण्यास कारणीभूत झाला.
माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजां जिंके। भाषा हे माणसांमधील संपर्काचे, संवादाचे आणि भावनांच्या अभिव्यक्तीचे प्रगत माध्यम समजले जाते. भाषेची समृद्धी ही माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची आणि प्रगल्भतेची ओळख असते. मराठी भाषा संस्कृतनंतर जगातील सर्वांत सात्त्विक भाषा आहे. मराठी भाषेचे सौंदर्य, माधुर्य, समृद्धता आणि परिपूर्णता असे वेगळेपण आहे. मराठी भाषेतील शब्दभांडाराचा आनंद सर्वांनीच घेतला पाहिजे. मराठी साहित्य ही न संपणारी दौलत आहे, जितकी जास्त लुटाल तितकी ती वाढत जाते.
मराठी पुस्तके जगायला बळ देतात. मातृभाषेमुळे मुलांना बालवयापासून ग्रहण, आकलन आणि स्वयंअध्ययन या क्षमतांचा पुरेपूर विकास करता येतो. मायबोलीतील वाचनामुळे मायबोलीत विचार व्यक्त करण्यास चालना मिळते. भाषाभिमानाचा संबंध थेट राष्ट्राभिमानाशी आहे. भारताला वैश्विक गुरू बनवायचे असेल, तर वैचारिक सुबत्तता आवश्यक आहे. राजकारण, समाजकारण करणाऱ्या आणि जनमानसावर छाप पाडणाऱ्या सर्वांनी भाषा आणि वाचन याचा आस्वाद घेतला पाहिजे.
कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक या संस्थेचे माजी विश्वस्त विनायक रानडे यांनी १२ वर्षांपूर्वी केलेल्या निश्चयातून ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या योजनेचा उगम झाला. ही योजना नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई असा दिमाखदार प्रवास करीत महाराष्ट्रभर पोहोचली, त्यानंतर भारतातील इतर राज्यांमध्ये याचा विस्तार झाला. परदेशात दुबई, ओमान, बहारिन, नेदर्लंड, यूएई, टोकियो, अटलांटा, स्वित्झर्लंड, फिनलँड, वॉशिंग्टन डीसी, कॅलिफोर्निया, मॉरिशस, सिंगापूर आणि जपान येथील हजारो वाचकांना मराठी पुस्तके वाचनासाठी उपलब्ध झाली आहेत.
‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमांतर्गत २५ – ३५ वाचकांच्या समूहासाठी साहित्याच्या कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, विज्ञान, इतिहास, अनुवादित, गूढ कथा, आध्यात्मिक, ऐतिहासिक, विनोदी, वैचारिक, ललित लेख, प्रवासवर्णन असे विविध वाङ्मय प्रकार असलेल्या शंभर पुस्तकांची एक ग्रंथपेटी दिली जाते. प्रत्येक ग्रंथपेटीत नवीन व जुन्या विविध लेखकांची पुस्तके असतात. दर चार महिन्यांनी प्रत्येक ठिकाणची ग्रंथपेटी बदलून दुसरी पेटी दिली जाते. यामुळे वाचनासाठी हजारो पुस्तके उपलब्ध आहेत.
मुंबई शहर गतिमान शहर आहे, आर्थिक राजधानी आहे, चांगल्या गोष्टी लवकर आत्मसात करते, घराजवळ उत्तम वाचनीय पुस्तके उपलब्ध झाली, हे मुंबईने लगेच स्वीकारले. घर आणि सोसायटी शिवाय शाळा, ऑफिस, मंदिर, हॉस्पिटल, दवाखाना, आश्रम, उद्यान, ज्येष्ठ नागरिक संघ, महिला मंडळ, सामाजिक संस्था, पोलीस ठाणे, तुरुंग, इ. ठिकाणी मुंबईत १७५ वाचक केंद्रे आहेत. गोरेगाव – मालाड, कांदिवली ते भाईंदर, जोगेश्वरी, अंधेरी ते बांद्रा, दादर ते कुलाबा आणि वडाळा, कुर्ला, पवई, घाटकोपर, भांडुप, देवनार, गोवंडी, ऐरोली अशा विविध विभागांमध्ये पसरली आहे, स्वेच्छेने काम करणाऱ्या २०० हून अधिक समन्वयकांमुळे हा उपक्रम वाढीस लागला आहे. महिन्यातून १-२ पुस्तके तरी वाचा. आवडलेले मुद्दे एका वहीत टिपून ठेवा. त्यावर मनन, चिंतन आणि विश्लेषण करा. आजच्या नेटयुगात संगणकाच्या पडद्यावर क्षणार्धात पुस्तकेच्या पुस्तके आणि वैचारिक मंथन उपलब्ध होऊ शकते. तरीही प्रत्येक व्यक्तीने, शिक्षकांनी, पालकांनी, सामाजिक आणि राजकीय संघटना यांनी मुलांना, तरुणांना वाचनाची गोडी लावावी.
मातृभाषेचे संवर्धन करा. मराठी भाषेचा विकास व संवर्धन व्हावे, मराठी वाचनसंस्कृती रुजावी व वृद्धिंगत व्हावी, या एकमेव ध्येयाने प्रेरित असलेला ‘ग्रंथ तुमच्या दारी’ हा उपक्रम कौतुकास्पद कामगिरी करीत आहे. जेथे जेथे मराठी माणूस आहे, जेथे जेथे शक्य आहे, त्याच्यापर्यंत ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाचे पाऊल पडावयास हवे. मराठी वाचकांपर्यंत मराठी ग्रंथसंपदा पोहोचल्यामुळे त्यांचे मराठी वाङ्मयाशी नाते वृद्धिंगत होते. ‘सोसायटी तिथे, ग्रंथ पेटी’ असा आमचा मानस आहे. सर्वांनी उपक्रमाशी जुडावे. “पुस्तक एक सखा आहे, मार्गदर्शक आहे, जीवनप्रेरक आहे. पुस्तकांना जीवनाचा अविभाज्ज भाग बनवा”.