Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीPM Kisan : २८ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण देशभर पीएम किसान उत्सव...

PM Kisan : २८ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा होणार!

प्रधानमंत्री यांच्या हस्ते पी. एम. किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांच्या निधीचे होणार वितरण

मुंबई : पी.एम. किसान (PM Kisan) सन्मान निधी योजनेच्या माहे डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४ कालावधीतील १६वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवार, दि २८ फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथील समारंभात वितरीत होणार आहे. पी. एम. किसान योजने अंतर्गत रू. २०००/ तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत दुसरा व तिसरा हप्ता मिळून रू. ४०००/ असा एकुण रू. ६०००/ चा लाभ दि. २८ फेब्रुवारी, २०२४ च्या समारंभात राज्यातील सुमारे ८८.०० लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येईल. केंद्र शासनाने दि. २८ फेब्रुवारी, २०२४ हा दिवस संपूर्ण देशभर पी. एम. किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे.

या समारंभास राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, यवतमाळ-वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, कृषी मंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, केंद्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष हंसराज अहिर आदी उपस्थित राहणार आहेत.

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजना माहे फेब्रुवारी, २०१९ पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये) रु. २०००/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. ६०००/- त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे. पी. एम. किसान योजनेअंतर्गत दि. २४ फेब्रुवारी, २०२४ अखेर राज्यातील ११३.६० लाख शेतकरी कुटुंबांना एकूण १५ हप्त्यांमध्ये रू. २७६३८ कोटीचा लाभ जमा झालेला आहे.

समारंभास शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष व ऑनलाईन पदधतीने सहभागी व्हावे – कृषीमंत्री धनंजय मुंडे

हा समारंभ केंद्र शासनाचा कृषी विभाग व महाराष्ट्र शासन यांनी एकत्रित राबविण्याचे नियोजन केले आहे. तसेच महाराष्ट्र राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यांचा एकत्रित लाभही प्रधानमंत्री यांच्या हस्ते या समारंभात वितरीत होणार आहे. पी. एम. किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लाभ वितरण समारंभात https://pmindiawebcast.nic.in या लिंकआधारे सहभागी होण्यासाठी राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे.

केंद्र शासनाच्या पी. एम. किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याच्या लाभ वितरणावेळी रक्कम रू. १९४३.४६ कोटीचा लाभ राज्यातील भूमि अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या, बँक खाती आधार संलग्न केलेल्या व ई-केवायसी पूर्ण केलेल्या एकुण ८७.९६ लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे. राज्यात कृषि विभागामार्फत गावपातळीवर विशेष मोहीमेद्वारे राज्यातील सुमारे १८ लाख लाभार्थींची पी.एम.किसान योजनेच्या लाभासाठी आवश्यक बाबींची पूर्तता झालेली आहे. त्यामुळे या लाभार्थींना पी.एम.किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनांचा दुहेरी लाभ मिळणे शक्य झाले आहे.

राज्यात सन २०२३-२४ पासून पी. एम. किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पी. एम. किसान योजनेच्या हप्ता वितरणावेळी लाभ देण्यात आलेल्या पात्र शेतकरी कुटुंबांना राज्याच्या या योजनेचा लाभ अदा करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने पी. एम. किसान योजनेच्या १४ व्या हप्त्याचा लाभ अदा झालेल्या राज्यातील ८५.६० लाख शेतकरी कुटुंबाना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता रक्कम रू. १७१२ कोटी यापूर्वी अदा केलेला आहे. महाराष्ट्र शासन सन २०२३-२४ मधील उर्वरीत दुसरा व तिसरा हप्ता एकत्रितरित्या या समारंभात राज्याच्या योजनेमधून जवळपास रू. ३८०० कोटी थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -