Wednesday, July 24, 2024
Homeताज्या घडामोडीShilpa Bodakhe : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शिल्पा बोडखे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

Shilpa Bodakhe : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शिल्पा बोडखे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

ठाकरे गटावर जहरी टीका करत ठोकला रामराम

मुंबई : लोकसभा निवडणुका (Loksabha Election) जवळ आलेल्या असताना ठाकरे गटाला (Thackeray Group) धक्क्यांवर धक्के पचवावे लागत आहेत. अनेक बडे बडे नेते पक्षाला रामराम ठोकत आहेत, तर अनेक महत्त्वाचे नेते ईडीच्या (ED) कचाट्यात सापडले आहेत. त्यामुळे ठाकरे गट अडचणीत असतानाच आता शिल्पा बोडखे (Shilpa Bodakhe) यांनी देखील पूर्व विदर्भ महिला संपर्क प्रमुख या आपल्या पदाचा राजीनामा दिला. एवढंच नव्हे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वर्षा निवासस्थानी शिल्पा बोडखे यांनी आज शिवसेनेत (Shivsena) जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या महिला नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यादेखील उपस्थित होत्या.

विदर्भात शिवसेना वाढवण्याचे आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचे काम आजवर प्रा. शिल्पा बोडखे आपल्या पूर्ण क्षमतेने प्रामाणिकपणे करत होत्या. मात्र, ठाकरे गटात वारंवार अपमान, गळचेपी आणि मानसिक खच्चीकरण झाल्याचा आरोप बोडखे यांनी काही दिवसांपूर्वी केला. शिवाय त्यानंतर त्यांनी उबाठा गटाला अखेरचा जय महाराष्ट्र केला होता. त्यानंतर आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश करत त्यांनी आपली पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करताना प्रा. बोडखे यांनी यापुढेही त्याच प्रामाणिकपणे पक्षाचे काम करावे आणि राज्य सरकारचे काम आणि पक्षाचे विचार विदर्भातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

शिल्पा बोडखेंनी ट्विट करत उबाठावर केले होते आरोप

शिल्पा बोडखे एक ट्विट शेअर करत म्हणाल्या होत्या, माझी चार वर्षांची मेहनत आज व्यर्थ गेली याचे दु:ख आहे, पक्षात पक्षप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरेजी यांच्या शद्बाला काही किंमत न देता विशाखा राऊत व रंजना नेवाळकर आपला मनमानी कारभार करत आहेत, त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे. मनीषा कायंदे व मीना कांबळी यांनी बघितलेले स्वप्न विशाखा राऊत व रंजना नेवाळकर यांनी यशस्वी करून दाखवल्याबद्दल दोघींचे अभिनंदन. पुढे देखील शिवसेना भवनात बसून असेच कार्य करत रहा. आशा करते रंजना नेवाळकर यांच्या हाताचा मटणाचा वास गेला असेलच, पुन्हा नागपूरात येवून सावजी वर ताव मारा व महाप्रसादाचे वाटप करा, असा टोला शिल्पा बोडखे यांनी आपल्या ट्विटमध्ये लगावला होता.

शिवाय त्यासोबत राजीनाम्याचे पत्र शेअर करत त्यातही त्यांनी उबाठावर आरोप केले होते. ‘माझा पक्षात टिश्यू पेपर म्हणून वापर केल्याबद्दल धन्यवाद. पुढे कोणाचे असे राजकीय आयुष्य बरबाद करून नका, नाहीतर कोणताही मराठी माणूस मराठी माणसाच्या आणि पक्षाच्या पाठीशी उभा राहणार नाही. कारण शिवसेना पक्षात काम करणाऱ्या लोकांपेक्षा येथे चुगल्या चहाड्या करणाऱ्या आणि षडयंत्र रचणाऱ्यांना जास्त महत्व आहे’, असा आरोप त्यांनी केला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -