फडणवीस साहेबांना अडचणीत आणण्यासाठी १०० जन्म घ्यावे लागतील
नितेश राणे यांनी मनोज जरांगेंना सुनावले खडे बोल
मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर काल मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी प्रचंड आक्रमक होत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर येण्याचीही धमकी दिली. जरांगे यांनी पातळी सोडून भाष्य केल्याने सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र उपसले. भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी देखील मनोज जरांगे यांना धमकीवजा इशारा दिला आहे. मनोज जरांगे यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. शिवाय फडणवीस साहेबांना अडचणीत आणण्यासाठी १०० जन्म घ्यावे लागतील, असंही ते म्हणाले आहेत.
नितेश राणे म्हणाले, सागरला येणं लांबची गोष्ट आहे. आधी आमची भिंत आहे ती पार करणे अवघड आहे. एक व्यक्ती मराठा समाजाची बदनामी करत असेल तर खपवून घेणार नाही. देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी १०० जन्म घ्यावे लागतील. कुणी विनाकारण केसेस अंगावर घेऊ नयेत. जरांगेंचे जुने सहकारी जरांगेंची शरद पवारांशी जवळीक असल्याचे सांगतात. मग हा आवाज तुतारीचा आहे का? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
नितेश राणे म्हणाले, जरांगे सातत्याने फडणवीस साहेबांवर आरोप करत आहेत, मात्र कोर्टात जेव्हा आरक्षणाची केस जाईल तेव्हा फडणवीस साहेबच मोठ्यातला मोठा तज्ज्ञ वकील उभा करुन आपली बाजू लावून धरणार आहेत. त्यांनी जे २०१४ ते २०१९ मध्ये केलं ते नंतर आलेल्या नालायक उद्धव ठाकरेला जमलं नाही. पण आता फडणवीस साहेबच आपली कायदेशीर बाजू तिथे लावून धरणार आहेत, हे मराठा समाजाने लक्षात घ्यावं, असं नितेश राणे म्हणाले.
पोलीसांवर जो हल्ला झाला त्यामागे जरांगे पाटलांचा हात असल्याचा आरोप त्यांचेच सहकारी करु लागले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले, की जे सहकारी त्या क्षणावेळी आंतरवाली सराटीमध्ये होते, त्या आंदोलनाचे साक्षी होते, ते जर खरं बोलत असतील तर त्यांची नार्को टेस्ट करा. जरांगे पाटलांची देखील नार्को टेस्ट करा. त्यामुळे खरं काय ते कळेल. त्या आंदोलनामुळे उगीच आमच्या पोलिसांची बदनामी झाली की पोलिसांनी चुकीचा लाठीचार्ज केला, तर या गोष्टीची चौकशी झालीच पाहिजे, असं मत नितेश राणे यांनी व्यक्त केलं.
नितेश राणे यांचा संजय राऊतांना टोला
संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही नितेश राणे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, रात्रीची उतरली असेल तर तुम्ही कालपासून कुणाला फोन करताय हे बाहेर येईल. सिल्व्हर ओक, जरांगे पाटील यांच्या जवळच्या लोकांना बोलत असतील याचा सिडीआर कधीतरी बाहेर येईल. जी भाषा पवार, उद्धव ठाकरे बोलतात तीच भाषा जरांगे बोलत आहेत. आम्ही राजकीय आंदोलनाला समर्थन देणार नाही. आम्हाला धमकी देणाऱ्याचे नंबर आमच्याकडे आहेत, आज ना उद्या पोलीस जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला कुणी वाचवणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.