Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीManoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी आमरण उपोषण घेतलं मागे; उद्यापासून साखळी...

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी आमरण उपोषण घेतलं मागे; उद्यापासून साखळी उपोषण

सरकारने अद्याप काही निर्णय न घेताच उपोषण मागे…

मुंबई : मराठा आरक्षणासंबंधी (Maratha Reservation) जीआर काढल्यानंतर असमाधानी असलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी १० फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाची (Hunger strike) घोषणा केली होती. यानंतर सरकारने मराठा समाजाला (Maratha Samaj) १० टक्के आरक्षण देऊनही मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला. याउलट ते अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) उलटसुलट आरोप केले. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी जरांगेंना चांगलेच धारेवर धरले. यानंतर आज उपोषणाच्या सतराव्या दिवशी जरांगेंनी आपलं आमरण उपोषण मागे घेण्याची घोषणा केली आहे. तर उद्यापासून धरणे आणि साखळी उपोषण करण्याचं आवाहन त्यांनी मराठा बांधवांना केलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेण्याची तयारी दाखवली आहे. हॉस्पिटलमध्ये दोन दिवस उपचार घेऊन त्यानंतर दोन-तीन दिवसांनी ते पुन्हा महाराष्ट्र दौरा करणार आहेत. सरकारने काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी यासाठी ते पुन्हा एकदा उपोषणाला बसले होते. मात्र, सरकारने अद्याप काही निर्णय न घेताच त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे.

अंबडमध्ये संचारबंदी लागू केल्याने लोकांना त्यांना भेटणे कठीण झाले आहे. त्यामुळे आता मराठा बांधवांच्या भेटी घेण्यासाठी ते स्वतः जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यासाठीच त्यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. गावातील मराठा भगिनींच्या हातून रस पिऊन ते उपोषण मागे घेणार आहेत. आंदोलनाची पुढची दिशा ते लवकरच जाहीर करणार आहेत.

काल नेमकं काय घडलं?

मनोज जरांगे काल अत्यंत आक्रमक झाले होते व त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते. सरकारचा मला मारण्याचा प्रयत्न आहे, माझा बळी घ्यायचा असेल तर मी सागर बंगल्यावर येतो, तिथे घ्या, असं जरांगे म्हणाले होते. त्यांच्या या आक्रमकपणामुळे मराठा बांधवांनीही त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे राज्यात एसटी जाळण्याचे प्रकार घडले. त्यामुळे अंबडमध्ये रात्री १ वाजता संचारबंदी लागू करण्यात आली होती. शिवाय छ. संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांमध्ये इंटरनेट, एसटी सेवा बंद करण्यात आली. अखेर जरांगे पाटील यांनी सामोपचाराची भूमिका घेतली आणि फडणवीसांच्या सागर बंगल्याकडे जाण्याचं टाळलं. त्यानंतर ते अंतरवली सराटी गावामध्ये परत आले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -