रांची: भारताने इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. रांचीमध्ये खेळवण्यात आलेल्या चौथ्या कसोटीत टीम इंडियाने ५ विकेटनी विजय मिळवला. इंग्लंडने हैदराबादमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात विजय मिळवत आघाडी घेतली होती. यानंतर विशाखापट्टणम, राजकोट आणि रांचीमध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यात भारताने सलग विजय मिळवत मालिका खिशात घातली. हा सामना एका खेळाडूने १३१ चेंडूत पलटवला आणि इंग्लंडच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला.
रांची कसोटीत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला होता. ज्यो रूटच्या शतकी खेळीच्या जोरावर संघाने पहिल्या डावात ३५३ धावा केल्या. भारत पहिल्या डावात अडचणीत अडकला होता. संघाने १७७ धावांवर आपल्या ७ विकेट गमावल्या मात्र येथे कुलदीप यादव आणि ध्रुव जुरेल यांची भागीदारी संघासाठी महत्त्वाची ठरली.
त्यांच्या भागीदारीमुळे भारताने ३०० पार धावसंख्या करता आली. ४६ धावांची आघाडी घेत दुसऱ्या डावात खेळण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडच्या संघाला केवळ १४५ धावा करता आल्या. आर अश्विनने या डावात ५ विकेट मिळवल्या तर कुलदीप यादवने ४ विकेट मिळवल्या.
१३१ बॉलने कसे बदलले सामन्याचे चित्र
भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या आपल्या पहिल्या डावात १७७ धावांवर ७ विकेट गमावून बसला होता. येथून एकजरी विकेट पडण्याचा अर्थ टीम इंडिया इंग्लंडच्या खूप धावांनी पिछाडीवर गेली असती. कुलदीप यादवने ध्रुव जुरेलसोबत मिळून ८व्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी केली. १३१ चेंडूचा सामना करताना २ चौकाराच्या मदतीने २८ धावा केल्या. कुलदीप यादवच्या या खेळीने सामन्याचे चित्र बदलले आणि इंग्लंडला अवघ्या ४६ धावांनी आघाडी घेता आली.