Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीDevendra Pem : प्रहारच्या गजालीत 'पेम' पितापुत्रांचं त्रिकूट

Devendra Pem : प्रहारच्या गजालीत ‘पेम’ पितापुत्रांचं त्रिकूट

ज्येष्ठ लेखक-दिग्दर्शक देवेंद्र पेम आणि त्यांची मुले, अभिनेते मयूरेश, मनमीत या बाप-लेकांच्या तिकडीने आपल्या विनोदबुद्धीने दैनिक प्रहारच्या गजाली कार्यक्रमात एकच हशा पिकवला. दैनिक प्रहारचे महाव्यवस्थापक मनिष राणे, संपादक डॉ. सुकृत खांडेकर यांनी त्यांचे स्वागत केले. लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशा विविधांगी क्षेत्रांतील तिघांचा थक्क करणार प्रवास त्यांनी गप्पाष्टकातून उलगडला. हा प्रवास इतका सुरस होता की, ऐकणारे मंत्रमुग्ध झाले.

अकेला देवेंद्र पेम कुछ भी कर सकता है…!

भालचंद्र कुबल

साधारणपणे देवेंद्रची आणि माझी ओळख तशी ३५-४० वर्षांची. एकमेकांचे नाटकातले कट्टर रायव्हल. तो एम.डी. कॉलेजकडून एकांकिका करायचा आणि मी रुईया कॉलेजकडून. नाटकातूनही करिअर होऊ शकतं हे समजण्याचे ते दिवस नव्हते, त्यामुळे केवळ छंद म्हणून आमच्या नाट्यचळवळीकडे पाहिलं जायचं. देवेंद्रचं नाटक ‘प्रेम’ हे अशाच आवडीतून तयार झालेलं. त्याला वडिलोपार्जित पार्श्वभूमी होती. गिरगावातल्या एका चाळीच्या गच्चीत सुरू झालेली नाट्यआवड पुढे एवढे मोठे स्वरूप धारण करेल याचा अंदाज त्यालाही नसावा. एकांकिका स्पर्धांमधून ही नाट्यआवड मात्र जसजशी बक्षिसे मिळू लागली तशी अधिकच बाळसे धरू लागली. त्याची “प्लँचेट” ही एकांकिका नव्वदच्या दशकात प्रचंड गाजली. त्याकाळी केवळ सतीश थिएटर ही एकमेव संस्था विनोदी एकांकिका सादर करीत असे; परंतु देवेंद्रच्या टीमने आपल्या विनोदी सादरीकरण शैलीने स्पर्धात्मक चुरस निर्माण केली होती. प्लँचेट या एकांकिकेचे हजारांपेक्षा जास्त प्रयोग आजवर झाले आहेत. पुढे मात्र महर्षी दयानंद महाविद्यालयाकडून देवेंद्रला संधी मिळाली आणि ऑल दि बेस्ट नामक रेकॉर्ड ब्रेक एकांकिकेचा जन्म झाला. त्या वर्षीच्या आय.एन.टी. आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत अभिनयाची वैयक्तिक पारितोषिके असून सांघिक निर्णयात तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेलेली ऑल दि बेस्ट प्रेक्षकांना चुटपूट लावून गेली होती. मात्र नंतर महेश मांजरेकर आणि कै. मोहन वाघांच्या पुढाकाराने याच एकांकिकेचे नाटक झालं. या नाटकाने केलेले रेकॉर्ड्स सर्वश्रुत आहेतच; परंतु दिग्दर्शनाची धुरा सांभाळणारा देवेंद्र हा कॉमन फॅक्टर होता. प्रत्येक भाषेनुरूप दिग्दर्शित केलेल्या प्रत्येक आवृत्तीस त्या त्या भाषेचा लहेजा होता. यासाठी त्याने घेतलेले परिश्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत.

या नाटकाने जवळपास ६० हिरो नाट्यसृष्टीस दिले. चौदा भाषा आणि हिंदी चित्रपटातून ऑल दि बेस्ट सातत्याने प्रेक्षक पसंती मिळवत आजही मराठी नाटकाची ध्वजा उंचावत आहे. तसा मितभाषी, आहे त्या परिस्थितीला सामोरा जाणारा, जमिनीवर पाय असणारा देवेंद्र नव्या पिढीसाठी नक्कीच आदर्श ठरावा.

देवेंद्रने स्लॅपस्टीक कॉमेडीला एक वेगळाच रंगमंचीय आयाम दिला. अत्यंत गंभीर स्वरूपाच्या कथानकाला विनोदी सादरीकरणाने एक वेगळी मिती त्याने मराठी नाटकांतून पुढे आणली. तुमचा मुलगा करतो काय किंवा लालीलीलाच्या विनोदाला कारुण्याची किनार होती, जी प्रेक्षकांना प्रचंड भावली. गुजराती लालीलीलाने गुजराती रंगभूमीवर स्थापित केलेला विक्रम आजही अबाधित आहे. नव्या पिढीसाठी आपल्या विनोदीशैलीचा पुनःप्रत्यय यावा यासाठी आपल्या दोन्ही चिरंजीवांना घेऊन ऑल दि बेस्ट नुकतेच झळकले आहे. आजवरचे सारे विक्रम लक्षात घेता या प्रयोगांनाही रसिक डोक्यावर घेतील याची खात्री देवेंद्रने गजालींच्या दरम्यान बोलून दाखवली.

निखळ बंधुमित्र

मानसी खांबे

ज्येष्ठ लेखक-दिग्दर्शक देवेंद्र पेम आणि अभिनेते मयूरेश पेम व मनमीत पेम ही पिता-पुत्रांची जोडी ‘पेमांचं फेम’ म्हणून ओळखली जाते. नव्या पिढीची नवी क्रेझ असलेले मयूरेश आणि मनमीत पेम यांनी चित्रपटांसह अनेक नाटकांमध्ये आपल्या भूमिका झळकावल्या आहेत. आज मयूरेश व मनमीत यांना उत्तम नट म्हणून ओळखले जाते. त्याशिवाय मयूरेश हा उत्तम नर्तक, तर मनमीत हा कवी आहे.

‘कविता म्हणजे प्रेम’ असे तो म्हणतो. या जोडगोळीला कलांचे बाळकडू त्यांच्या घरातूनच मिळाले. मयूरेश व मनमीत यांच्यात बंधुप्रेम असले तरीही त्यांच्यातील नाते बेस्टफ्रेंडपेक्षा कमी नाही. मनमीत हा थोडा खोडकर स्वभावाचा आहे. दोघांमध्ये चांगली केमिस्ट्री आहे. छोट्या-मोठ्या गोष्टींवरून होणाऱ्या मस्तीमुळे त्यांच्यातील निखळ प्रेम दिसून येते. या पेम बंधूंनी इंडस्ट्रीमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

मनमीतने कच्चा लिंबू, टाईमपास, व्हेंटिलेटर, लूज कंट्रोलसारख्या गाजलेल्या चित्रपटांत काम केले आहे. त्याशिवाय अनेक नाटकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तर मयूरेश पेमने एफयू, सचिन-अ बिलियन ड्रीम्स, झाला बोभाटा, गैरी, दिल दिमाग और बत्ती (मराठीत), रावरंभा अशा चित्रपटांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ऑल दि बेस्ट, वस्त्रहरण, प्लँचेट, लव्ह एक्सप्रेस, धनंजय माने इथेच राहतात का?, कोणे एके काळी, सौजन्याची ऐशीतैशी, लालीलीला, निम्मा शिम्मा राक्षस अशा नाटकांमधील त्याच्या भूमिका गाजल्या आहेत. तसेच उत्तम नर्तकाचा किताबही त्याने मिळवला आहे.

केसांमुळे ‘सचिन-अ बिलियन ड्रीम्स’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याचे मयूरेशने सांगितले. एका नाटकाच्या प्रयोगाला दिग्दर्शक जेम्स अर्स्किन यांना मयूरेशचा अभिनय भावला. प्रयोगानंतर दिग्दर्शकांनी सचिनच्या सिनेमात त्यांचा मोठा भाऊ नितीन तेंडुलकर यांच्या भूमिकेसाठी मयूरेशला विचारणा केली. ऑडिशनवेळी त्याचा थेट संवाद सचिनशी झाला. सौम्य व भारदस्त अशा विविध शैलीत ‘सचिन’ला आवाज देण्याची एक ऑडिशन झाली आणि नितीन यांच्या भूमिकेसाठी मयूरेशची निवड करण्यात आली. या भूमिकेच्या निमित्ताने हॉलिवूडचा दिग्दर्शक, मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि संगीतकार ए. आर. रेहमान यांच्यासोबत काम करण्याची संधी मयूरेशला मिळाली. त्यामुळे त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. त्यावेळी एक गंमत झाली. नितीन तेंडुलकारांना असणारी मिशी त्यावेळी मयूरेशला नव्हती. त्यात दिग्दर्शकाला सिनेमात कोणत्याही कृत्रिम गोष्टींचा वापर करायचा नव्हता. त्यामुळे आता पुढे काय करायचे? असा प्रश्न सतत जेम्स यांना पडत होता. चित्रपटासाठी मयूरेशने अनेक वर्कशॉप व अभिनयाचे धडेही गिरवले होते. नितीन यांची उत्तम भूमिका फक्त मयूरेश साकारू शकतो असा विश्वास दस्तुरखुद्द सचिन तेंडुलकर यांनी दिला. मग कृत्रिम मिशी लावून सिनेमाचे शूटिंग करण्यात आले. मयूरेशचा अभिनय फार आवडल्याने सचिनल्या सांगण्यावरून त्याचा एक सीन सिनेमाच्या ट्रेलरमध्ये टाकण्यात आल्याचे मयूरेशने सांगितले.

आमचा ‘बेस्ट’ बाबा

तेजस वाघमारे

बहुतांश भारतीय कुटुंबांत बाप-मुलांच्या नात्यात अबोला पाहण्यास मिळतो. पण यालाही काही कुटुंबे अपवाद आहेत. त्यापैकी एक म्हणजे लेखक आणि दिग्दर्शक देवेंद्र पेम आणि त्यांची दोन मुलं मयूरेश आणि मनमीत. पेम यांची दोन्ही मुलं रंगभूमीवर नवनवे प्रयोग करत मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारताना त्या त्या पात्राला न्याय देत आहेत. त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. पेम कुटुंबीयांचा मित्र परिवार दिवसेंदिवस वाढत असताना त्यांच्या बाप-लेकातले मैत्रीचे नाते आणि त्यांचा दिलखुलास संवाद अचंबित करणारा आहे.

मयूरेश आणि मनमीत या दोघांशी रंगलेल्या गप्पांमधून त्यांनी बाप-लेकांतलं नातं उलगडलं. या नात्याबद्दल सांगताना ते म्हणतात, लहानपणापासूनच वडिलांसोबत मैत्रीचे नातं आहे. आम्ही विचार शेअर करतो. घरात तालमी चालायच्या, तेव्हा गावाकडच्या शिवराळ मजेशीर भाषेत आमचा संवाद असायचा. लहान असल्याने या भाषेचा आमच्या मनावर काय परिणाम होईल, हा विचार नव्हता. कारण अनेकदा नाटकांमध्ये अशा विनोदी भाषेचा वापर होत होताच. त्यामुळे आमच्यात शिव्या देण्याची फेज लवकर आली. त्यामुळे खूप लवकर आम्ही मित्र झालो. आजही रात्री उशिरापर्यंत आम्ही नाटकावर बोलतो. आम्ही वडिलांकडे मित्र म्हणून बघतो, पण आमच्यासाठी ते आयडल आहेत. आयुष्यात मित्र कसे बनवावेत, हे मी त्यांच्याकडून शिकलोय. नातेसंबंध, अभिनय आणि डान्स या प्रत्येक गोष्टी शिकवणारी बाबा ही आमच्यासाठी एक मोठी इन्स्टिट्यूट असल्याची भावना व्यक्त केली. आपला बाप एक उत्तम दिग्दर्शकासह उत्तम नट आणि उत्तम डान्सरही आहे हे आज या माध्यमातून सगळ्यांना कळूदेच अशी टिप्पणीही दोघांनी व्यक्त केली.

मयूरेश आपल्या बेस्ट बाबाबद्दल मोकळेपणाने गप्पा मारतो. तो म्हणतो मनमीत आणि माझ्यामध्ये सात वर्षांचे अंतर आहे. त्यामुळे मनमीतपेक्षा जास्त काळ मी वडिलांसोबत घालवला आहे. तेव्हा ‘पपा लाली-लीला’, ‘तुमचा मुलगा करतो काय’ या नाटकांच्या तालमीमुळे सगळ्यांचे घरी येणे -जाणे असायचे. त्यावेळी वडिलांना बाबा कमी आणि सर अधिक बोलणे व्हायचे. मी बाबाची स्क्रीफ्ट असायचो. बाबाचे अक्षर असे आहे ना, त्याला स्क्रीफ्ट चोरी होण्याची भीतीच नसायची. त्याचे अक्षर अनेकदा त्यालाच लागत नाही. सतत होणाऱ्या तालमीत माझी नाटकाबद्दल आवड निर्माण झाली.
तालमीत बाबा काहीतरी बसवायचा आणि दुसऱ्या दिवशी त्यालाच फालतू म्हणून आपण नवीन काही करू म्हणायचा. त्यामुळे प्रत्येक गोष्ट नव्याने सुरू व्हायची. बाबासोबत काम केलेल्या कलाकारांना त्यांच्या दिग्दर्शनाची पद्धत माहीत होती. बाबा जे काही बसवायचे ते मी पाठ करायचो. आयत्यावेळी कुणी पात्र येऊ शकले नाही, तर त्याच्याऐवजी मी रंगभूमीवर उभा राहायचो. त्यामुळे तेव्हापासूनच नाटकाची आवड निर्माण झाली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -