
- विशेष : शल्य बोचरे
‘केवळ कालच्या पोथीच्या शब्दाने ‘आज’ बांधलेला नसावा, ‘उद्या’ तर नसावाच नसावा! या विज्ञाननिष्ठ मतासच आम्ही अद्ययावतपणा म्हणतो. आद्यतनी प्रवृत्ती ती हीच.’ ...स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हेच विचार, अनुयायांनीच नव्हे, तर तमाम भारतीयांनी स्वीकारण्याची वा त्याचा अनुनय करण्याची गरज आहे. अद्ययावत विचारांची ही संकल्पना हिंदू समाजाला अद्ययावत करणारी आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर आज लाखो हिंदूंचे दैवत झाले आहेत. खरे म्हणजे विचारांमुळे आणि बुद्धीनिष्ठ, विज्ञानवादी दृष्टीमुळे त्यांच्यासंबंधात त्यांना देवत्व देऊन भक्तीची नव्हे, तर त्यांच्या विचारांना समजून घेऊन विज्ञाननिष्ठ दृष्टीने अनुनय करण्याची आवश्यकता आहे. तो अनुनयही कितींना जमेल, तोदेखील तसा अडचणीचा विषय अनेकांना वाटू शकतो, इतकी सावरकरांच्या विचारांची प्रगल्भता प्रखर आहे. किंबहुना म्हणूनच त्यांच्या नावाची असणारी जरब ही हिंदुत्वावर अद्ययावतपणे बसलेली आहे. असे म्हणण्याचे कारण म्हणजे सावरकर यांनी सांगितलेले हिंदुत्व हे अद्ययावत आहे. मुळात काळाप्रमाणे धर्मसंस्था ही कशी घडू शकते, हे स्पष्ट करणारा विज्ञाननिष्ठ असा निकष स्वीकारा आणि पोथिनिष्ठता सोडा, हे सांगण्याचे असामान्य धैर्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दाखवले.
सावरकर यांचे हिंदुत्व आस्तिक आहे, नास्तिक आहे; आस्तिक नाही आणि नास्तिकही नाही. वेदप्रामाण्याला मानणारा आस्तिक आणि न मानणारा नास्तिक असतो, ही खरी व्याख्या आहे. आर्य सनातन वैदिक धर्मामध्ये विविध आस्तिक दर्शने व नास्तिक दर्शने आहेत. काळाच्या निकषावर ती नेहमी पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसेने तावून-सुलाखून निघाली, निघत होती. मात्र तो काळ प्राचीन आहे. त्यानंतर मध्ययुगापासून विद्वत्तेकडून भिक्षुकीकडे जाण्याचे स्वरूप धर्मसंस्थांनी स्वीकारले असावे. ब्राह्मण समाज हा धर्माच्या निकषांचे प्रतिनिधित्व करता करता अनावश्यक पद्धतीने नको त्या अनिश्चिततेत गुरफटला गेला. कुठे ना कुठे अहंपणामुळे, तर कधी सत्ताकेंद्रित मानसिकतेमुळे वा प्रवृत्तीमुळे साऱ्या सर्व वर्णांना आणि हिंदू समाजालाच अनेक बेड्यांमध्ये त्याने गुरफटवून टाकले. केवळ ब्राह्मण वर्णच नव्हे, तर अन्य सर्व वर्णांनाही यामुळे विचारभ्रमतेच्या स्थितीत जावे लागले होते. यामुळेच जातिभेदासारख्या भेदक क्षेपणास्त्राने भारतीय समाज, धर्मसंस्था, राज्यसत्ता यांना उद्ध्वस्त केले. परंपरा आणि रिती-रिवाज टिकवून आम्ही हिंदू धर्म राखला किंवा हिंदूचे विश्वगुरुत्व अबाधित ठेवले असे जर कोणी म्हटले, तर ते नक्कीच फसवणूक करणारे ठरेल.
आज आपण नेमके कुठे आहोत, याचा विचार प्रत्येक हिंदू व्यक्तीने करणे गरजेचे आहे. याचे कारण अद्ययावत होण्यासाठी अनेक घटक आवश्यक आहेत, ते आत्मसात करण्यात कमी पडलो आहोत. हिंदूंचे संघटन म्हणजे केवळ मुस्लीम धर्मियांवर टीकेचे आसूड ओढणे किंवा सतत त्यांना यापूर्वीच्या सरकारांनी विशेषकरून काँग्रेस सरकारने दिलेल्या अनेक राजकीय सोयी-सवलतींच्या वर्षावामुळे, त्यांचे केले गेलेले लांगूलचालन यामुळे, त्यांच्या धर्मातील विविध अतिपोथिनिष्ठ अशा घटकांच्या अतिरेकातून निर्माण झालेले मागासपण यावर टीका करणे नव्हे. मुसलमानांच्या संबंधात विरोध म्हणजे हिंदू संघटन नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे.
मुळात ‘हिंदू’ ही सावरकरांची व्याख्या लक्षात घेत हिंदू आणि अहिंदू यातील भेद लक्षात घेत हिंदूंमध्ये धार्मिक स्तरावर सुधारणा अद्ययावत पद्धतीने स्वीकारल्या गेल्या पाहिजेत. सावरकरांच्या रत्नागिरीतील स्थानबद्धतेच्या काळात त्यांच्या कामामधून सात बंद्या तोडण्यात आल्या होत्या. हे मोठे बंडच होते, क्रांती होती. स्वातंत्र्यानंतर या व्यतिरिक्तही आणखी बऱ्याच काही कालबाह्य चालीरिती, मानसिकता, नव्याने निर्माण झालेल्या स्वातंत्र्योत्तर काळातील असमान सामाजिक-शैक्षणिक स्तर, असमान जीवनशैली अशा जाचक बंधनांमुळे हिंदू समाज ग्रासला गेला आहे. राजकीय पक्ष, नेतृत्व यांच्याकडून या सर्व जाचकतेविरुद्ध लढण्याची क्षमता अपेक्षित नाही, इतके गेल्या काही वर्षांमधील भारतीय राजकारण हे सत्तापिपासू वृत्तीमुळे अन्यायकारकच ठरले आहे. यामुळे हिंदू समाज आजही जो बहुसंख्य आहे, त्याला जीवनशैलीसाठी अतिभयावह संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो केवळ आर्थिकच नव्हे तर बौद्धिक, धार्मिक, शैक्षणिक, व्यावसायिक-रोजगारविषयक स्तरावरही असमानतेच्या जात्यात हिंदू बहुसंख्य असूनही पिचला गेला आहे. हिंदूंमधील ही असमानता स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षांतही कायम आहे. असमानतेची ही स्थिती दूर करण्यासाठी हिंदू समाजाला सर्व स्तरावर अद्ययावत करणे आवश्यक आहे. केवळ डिजिटलायझेशन म्हणजे अद्ययावत झालो वा देश अद्ययावत झाला असे होत नाही. बौद्धिक स्तरावर संपूर्ण हिंदू समाज ‘अप टु डेट’ बनला पाहिजे.
खडतर वैचारिक वाटचाल
स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय आहे, त्यातूून नेमके काय साध्य करावयाचे आहे आणि या स्वातंत्र्यामुळे नेमके कोणाचे भले होणार आहे, असे अनेक प्रश्न पूर्वी अनेकांना पडले होते. खरं म्हणजे स्वातंत्र्य हे केवळ ब्रिटिशांच्या राजवटीतून भारताची मुक्तता करणे इतकेच नव्हते, तर भारतीय मनाची वैचारिक स्वातंत्र्यता मिळवणेही तितकेच आवश्यक होते. तशात बहुसंख्य हिंदू असणाऱ्या या समाजामध्ये असणाऱ्या रुढीवादी मानसिकतेतून समाजाला बाहेर काढण्याची गरजही तितकीच महत्त्वाची होती, जितकी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारत मुक्त करण्याची होती. किंबहुना या वैचारिक स्तरावरील पारतंत्र्यामधून बाहेर पडण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनाही फार लक्ष द्यावेसे वाटले नाही, कारण जहाल व मवाळ या संघर्षातच हे पारतंत्र्य अडकून बसले.
मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ही पारतंत्र्याचीही बेडी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात बरोबरीने तोडण्याचा प्रयत्न अधिक प्रखरपणे केला. विशेषकरून रत्नागिरीच्या स्थानबद्धतेमधून सुटल्यानंतर हिंदू महासभेद्वारे जसे स्वातंत्र्यासाठी राजकारण केले, मुस्लीम लांगूलचालनातील राष्ट्रीय सभेच्या मानसिकतेमधून हिंदूंना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच रत्नागिरीतील वास्तव्यामध्ये सुरू केलेली सामाजिक चळवळही तितक्याच प्रखरतेने मांडली. आंतरिक तळमळ त्यामागे त्यांनी जितकी दाखवली तितकी ऊर्मी राजकीय स्तरावरील अन्य संघटनांच्या नेत्यांनीही दाखवायला हवी होती; परंतु केवळ भविष्यातील सत्तेच्या नादात व ब्रिटिशांशी आम्ही किती जोरदारपणे लढत आहोत, हे सांगण्याच्या नादात राष्ट्रीय काँग्रेस असो वा मुस्लीम लीग असो किंवा साम्यवादीही असोत त्यांच्याकडून बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजामधील जातिभेद, शिक्षण, सात बेड्या आदी पारंपरिक दोष दूर करण्याचा प्रयत्न फार मोठ्या प्रमाणात झाला नाही.
हिंदुत्व ही संकल्पना त्यामुळेच केवळ राजकीय, धर्म-समाज अशी मर्यादित नव्हती, तर ती एकंदर समाजाला वैचारिक उत्कर्षासाठी जागविणारी होती. राजकारण, समाजकारण, धर्म आणि विज्ञानाची आस याद्वारे सावरकरांनी समाजोत्थान करण्याचा प्रयत्न केला. केवळ हिंदुत्व इतकेच त्यांचे काम नव्हते, त्यापलीकडील दृष्टी त्यांनी समाजालाही देण्याचा प्रयत्न केला. रत्नागिरीतील त्यांच्या कार्यात यामुळेच वैचारिक आणि व्यावहारिक बाबींचा संगम दिसून येतो.
विज्ञाननिष्ठेला आपलेसे करण्याचा त्यांचा सल्ला हा केवळ हिंदूंनाच नव्हे, तर मुस्लीमांनाही होता. मात्र असे असूनही त्यांना हिंदुत्वनिष्ठ म्हणजे केवळ जातीयतेच्या विखारीपणाचे बिरूद चिकटवून देण्याचा करंटेपणा केला जातो. ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी मुस्लीम समाजानेही आपल्याबरोबर यावे, असे सांगत “आलात तर तुमच्यासह, न आलात तर तुमच्याविना” असे सांगण्याचे स्पष्टवक्तेपण असूनही सावरकरांना मुस्लीमद्वेष्टे म्हणून मानण्याचा ‘तथाकथित धर्मनिरपेक्ष’ आततायीपणा अजूनही अनेक भारतीयांनी दाखवलेला आहे. मानवतावादी असल्याचे स्पष्ट करताना हिंदू-मुस्लीम यांच्यातील नेमके दोष ओळखून सावरकरांनी एकंदरच विज्ञाननिष्ठ पद्धतीने समाजाला पुढे जाण्यास सांगणे म्हणजेच शिक्षणाचे महत्त्वही त्यांना चांगलेच माहिती होते, त्यादृष्टीने त्यांनी समाज अद्ययावत होण्यासाठी केलेली वैचारिक वाटचाल ही व्यापक हिंदुत्ववादाच्याच नव्हे, मानवतावादी आणि बुद्धिप्रामाण्याला धरून होती. ती जातीय हिंदुत्ववादाच्या तथाकथित चौकटीत बद्ध करणे, हे अपरिपक्व वा वैचारिक शैथिल्याचेच गमक ठरेल.