- निसर्गवेद : डॉ. महालक्ष्मी वानखेडकर
तितर पक्ष्यांच्या अनेक प्रजाती आहेत. या लेखातील कलाकृतीत सोनेरी तितर पसरलेले पंख घेऊन उडत आहे आणि लेडी ॲमहर्स्ट बसलेला आहे. एखादी चित्राकृती असल्यासारखा हा अद्भुत आणि दुर्मीळ पक्षी आहे. या पक्ष्याचे नाव भारतीय गव्हर्नर जनरल विलियम पीट ॲमहर्स्टची पत्नी सारा ॲमहर्स्टच्या नावावर “लेडी ॲमहर्स्ट फिजंट” ठेवण्यात आले आहे.
या कलाकृतीत मी गोल्डन फिजंट आणि लेडी ॲमहर्स्ट पक्षी दाखवले आहेत. खरं सांगू का सर्वच पक्षी खूप सुंदर आहेत. पण हा पृथ्वीवरील सर्वात सुंदर तितर पक्षी आहे. लेडी ॲमहर्स्ट तितर हा सर्वात लक्षवेधी पक्ष्यांपैकी एक आहे. एखादी चित्राकृती असल्यासारखा हा अद्भुत आणि दुर्मीळ पक्षी आहे. या पक्ष्याचे नाव भारतीय गव्हर्नर जनरल विलियम पीट ॲमहर्स्टची पत्नी सारा ॲमहर्स्टच्या नावावर “लेडी ॲमहर्स्ट फिजंट” ठेवण्यात आले आहे.
ही प्रजाती दक्षिण चीन आणि उत्तर म्यानमारमधील मूळ निवासी आहेत. तितर पक्ष्यांच्या अनेक प्रजाती आहेत. नराची लांबी ४० ते ४८ इंच असते, तर त्याच्या शेपटीची लांबी ३१ इंच असते ते जमिनीवर जास्त वेळ घालवतात. लेडी ॲमहर्स्ट हा पिवळसर सोनेरी काळपट चोच, पिवळसर काळा डोळा, त्याच्याभोवती निळसर हिरवट त्वचा, संपूर्ण चेहऱ्यावर हिरवट सोनेरी पिसं, डोक्यावर लाल रंगाचा झोपलेला तुरा, डोक्यापासून मानेपर्यंत अर्धगोलाकार पांढऱ्या आणि काळ्या मिश्रणाचे पंख, समोरच्या बाजूने अर्ध गोलाकार सोनेरी हिरवट काळपट पंख, पाठीवर सोनेरी हिरवट काळ्या किनारीचे अर्धगोलाकार पंख, त्यापुढे निळसर सोनेरी थोडेसे लांबट पंख, पोटावर पांढरे पंख आणि खूप लांब असणाऱ्या शेपटीवर पांढऱ्या पार्श्वभूमीवर तिरकस तिरकस गडद काळ्या कोनाकृती नक्षीदार रेषा आणि त्याच्यामध्ये काळपट राखाडी नागमोडी रेषा, या पंखांच्या आजूबाजूला आकर्षक लालसर सोनेरी बाहेर आलेले पंख, निळसर पाय असा हा राजसी सौंदर्यवान लेडी ॲमहर्स्ट. लेडी ॲमहर्स्ट हा पक्षी फॅसीनिडे आणि गॅलिफॉर्मेस यांच्या कुटुंबातील आहे. हा पक्षी खूप सुंदर आहे, त्यामुळे त्याला आपल्याजवळ ठेवण्याचे आपले मन असते, त्याचे रंग संयोजन पाहून आपण हरखून जातो, या कलाकृतीत सोनेरी तितर पसरलेले पंख घेऊन उडत आहे आणि लेडी ॲमहर्स्ट बसलेला आहे, हे दाखवले आहे.
हे पक्षीसुद्धा रात्री झाडांवरच झोपतात. हे कमी उडतात, यांना धावायला जास्त आवडते फक्त संकट आले, तरच ते आकाशात तीव्र गतीने उडतात. हे पक्षी जास्तीत-जास्त वेळ जमिनीवरच घालवतात. यांच्या खाद्यात धान्य, छोटे-मोठे किडे, झाडांचे पत्ते यांचा समावेश असतो. यांचे आयुष्य ६ ते १० वर्षांचे असते. जास्तीत जास्त पंधरा वर्षे. त्यांची नजर तीक्ष्ण आणि श्रवणशक्ती चांगली असते.
नेहमीसारखीच मादी सुंदर नसते. खूपच कमी रंगछटांमध्ये असलेली ही मादी पूर्णपणे तपकिरी आणि काळपट रंगछटांमध्येच नागमोडी रेषायुक्त असते. हिच्यासुद्धा डोक्यावर एक गर्द लाल तुरा असतो. पण शेपूट नरापेक्षा खूपच लहान असते. मादी जेमतेम २५ इंचाचीच असते. तिची शेपूट २० इंचाची असते. प्रजनन काळात मादीसाठी नर विशिष्ट आवाज काढतो. यांची घरटी ही जमिनीवरच झुडपांमध्ये असतात. सहा ते बारा मातकट रंगाची अंडी देतात. ही अंडी फुटायला २४ दिवस लागतात आणि मादीच या अंड्यांचे संरक्षण करत असते. एकापेक्षा जास्त माद्यांबरोबर नर संबंध ठेवत असतो. तसं म्हटलं तर हे पक्षी भांडायला लागले की खूप आक्रमक होतात.
या पक्ष्याचे पंख अतिशय सुंदर असल्यामुळे यांना सजावटीसाठी सुद्धा वापरले जाते. जंगली कोंबडे टर्की हे पक्षी चंचल असतात आणि सतत चालत तीव्र वेगाने पळत असतात. त्यामुळे यांना गोळ्या मारण्याचा खेळ इंग्रज खेळत असत. त्यातीलच हासुद्धा एक पक्षी. त्यामुळे याच्यासुद्धा संख्या खूप कमी झाल्या. या पक्ष्यांची शिकार खाद्य आणि सजावटीसाठी केली जाते. कोल्ह्यासारखे प्राणी यांची शिकार करतात; परंतु आता चीनमध्ये या पक्ष्यांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी खूप मोठे प्रयत्न केले जात असल्यामुळे या प्रजातीची संख्या चांगलीच वाढत आहे.
गोल्डन फीजंट म्हणजेच सोनेरी तितर. याला चायनीज तितर किंवा इंद्रधनुषी तितर सुद्धा म्हणतात. हा लेडी एमहर्स्टच्या कुटुंबातीलच आहे. हा सुद्धा जवळजवळ ३९ इंचांचा असून याचे वजन एक ते दोन पौंडाचे असते. या नराची शेपूट खूप लांब असते. मादी २४ ते ३१ इंचांची असून वजन जेमतेम एक पौंडाचे असते. या पक्ष्याची सोनेरी पिवळी चोच, डोक्यावर सोनेरी पिवळ्या पंखांचा आडवा तुरा, ज्याच्या खाली काळ्या किनारीचे अर्धगोलाकार सोनेरी-केशरी पंख जे फुलवल्यावर एखाद्या झालरीसारखे डोळ्यांपर्यंत येऊन अर्धगोलाकार पंखा तयार करत असतात. काळ्या बुबुळांवर पिवळसर रिंग असणारे डोळे असून, मध्यभागी मानेवर नारंगी तपकिरी काळ्या किनारीचे पंख, पाठीवर अर्धे निळसर, हिरवट काळ्या किनारीचे गोलाकार पंख आणि अर्धे काळ्या किनारीचे चमकते पंख त्यापुढे शेपटीपर्यंत पिवळसर सोनेरी लांबट पंख, छातीपासून शेपटीपर्यंत लाल लाल चमकदार पंख, सोनेरी पिवळी चमचमती लांबलचक शेपूट, त्यावर काळ्या रंगाच्या नागमोडी रेषा आणि त्यावर परत सोनेरी गर्द लाल लांबट पंख असा आकर्षक पिवळा, लाल, सोनेरी रेशमी चमकदार रंगाचा सोनेरी तितर.
आता मी ही कलाकृती बनवताना मला आलेला अनुभव सांगते. एकदा एक गंमतच झाली होती. यात डाव्या बाजूला असणारी फुलांची जंगली वेल आहे ती बनवून मी ठेवली होती. वाऱ्याने ती टेबलावरून खाली उडाली. माझ्या कामवालीने झाडताना ती छोटीशी वेल खरी समजून बाहेर फेकून दिली. आम्ही राहायला तळालाच. जेव्हा तिला कळलं की, ती चित्रातली कागदाची वेल आहे. तेव्हा घाबरून खिडकीतून बाहेर उडी मारून तिने ती शोधून परत आणली. कलाकृती करताना अशा अनेक गमती-जमती झाल्या. मला खूपच सांभाळून माझे काम प्रत्येक वेळेला करायला लागायचे. काही वेळेस चिमण्या-कावळ्या-कबुतरांच्या पंखांसारखा दिसणारा एखादा पंख असेल, तर बाहेरून उडून आलेला पंख समजून बऱ्याचदा बाहेर फेकला जायचा. एखाद्या लेखात तुम्हाला मी माझे आलेले असे गमतीशीर अनुभव नक्कीच सांगीन.
एका गोष्टीचं खूप वाईट वाटतं. खरं तर जगातील कोणतेच पक्षी मानवाला कधीच त्रास देत नाहीत. पण आपण यांची बेमालूमपणे शिकार करून यांचे जगणे असह्य करून टाकतो. वन्य तितरांचे मास आणि अंडी ही चविष्ट असल्यामुळे खाल्ली जातात. तितरांमध्ये पौष्टिक जीवनसत्त्वे आणि फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम इ. असते. यांची चव कोंबडीसारखी लागत असली तरी यांच्यात चरबीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे तितरांची शिकार केली जाते आणि त्यांना पाळीव पक्षी म्हणून पाळले जाते, त्यांची अंडीसुद्धा खाल्ली जातात.
जर आपल्या शहरावर छोट्याशा कीटकांनी उदाहरणार्थ टोळ. जर हल्ला केला, तर आपल्याला सहन होईल का? जर सगळ्या शहरात मुंग्याच मुंग्या झाल्या तर? काय कराल? सहन होईल का तुम्हाला? लगेच त्यांना मारण्यासाठी औषध शोधाल. एवढे मोठे मानव असून पण घरात साध्या मुंग्या झालेल्या सहन होत नाहीत, मग त्यांचे वास्तव्य असणारे ठिकाण जंगल तोडून जर तुम्ही तिथे वास्तव्य करीत असाल, तर त्यांनी काय करायचं? या निरपराध पक्ष्यांचे स्वातंत्र्य आपण हिरावून घेऊ नये. प्रत्येक जीवाची जडणघडण ही निसर्ग नियमानुसारच झाली आहे. काही पक्षी जंगलातच राहू शकतात, तर काही चिमण्या-कावळ्यांसारखे विविध पक्षी शहरातसुद्धा राहू शकतात. यांचे संवर्धन आणि संरक्षण आपण नक्कीच करायला हवे. आपल्या चुकीच्या प्रकल्प योजना नक्कीच यांचा घात करीत आहेत. मी स्वतः अशा अनेक प्रकल्प योजना केल्या आहेत की, ज्या निसर्गातील प्रत्येक घटकाचे संरक्षण आणि संवर्धन करतील. मानव आपल्या स्वतःच्या सुखासाठी या जीवांच्या सुखाचा बळी घेत आहे. कुठेतरी हे थांबवायलाच हवे आणि त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपापल्या परीने यांचे संरक्षण करावे लागेल.
dr.mahalaxmiwankhedkar@gmail.