
वयाच्या ८३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
कोलकाता : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि चित्रपट निर्माते कुमार साहनी (Kumar Shahani) यांचं आज निधन झालं. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काल रात्री कोलकाता येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कुमार साहनी यांची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री मीता वशिष्ठ यांनी ही माहिती दिली.
कुमार साहनी हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्याचप्रमाणे त्यांची प्रकृती देखील खालावत चालली होती. अखेर काल रुग्णालयात उपचारादरम्यानच त्यांनी जगाचा निरोप घेतला. साहनी यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे मनोरंजन सृष्टी हळहळली आहे.
कशी होती कुमार साहनी यांची कारकीर्द?
७ डिसेंबर १९४० रोजी लारकाना येथे जन्मलेले कुमार भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर कुटुंबासह मुंबईत आले. हिंदी लेखक निर्मल वर्मा यांच्या लघुकथेवर आधारित 'माया दर्पण' या चित्रपटाद्वारे साहनी यांनी १९७२ साली सिनेसृष्टीत प्रवेश केला. त्यांच्या या चित्रपटाला हिंदीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. कुमार यांनी ‘तरंग’, ‘ख्याल गाथा’, ‘कसबा’ आणि ‘चार अध्याय’ यांसारख्या इतर उत्कृष्ट चित्रपटांचे दिग्दर्शन केले. दिग्दर्शकासोबतच कुमार यांनी लेखक आणि शिक्षक म्हणूनही आपला ठसा उमटवला.