Marathi : माय मराठी


  • मनस्विनी : पूर्णिमा शिंदे


“अलवार कधी, तलवार कधी,
कधी पैठणी सुबक नऊवार,
कधी कस्तुरीचा दरवळ दैवी,
तर कधी सप्तसुरांवर स्वार”
अशी चहूमुलुखी पसरलेली मराठी भाषेची कीर्ती अजरामरच आहे. मराठी तुझिया पायी तन-मन-धन मी वाहिले, तुझ्या नामी अखंड रंगून राहिले. आपली मातृभाषा ही हृदयाची भाषा, विकासाची, प्रगतीची समृद्ध भाषा! भावनेशी जोडलेली मायबोली.



ज्येष्ठ कवी वि. म. कुलकर्णी म्हणतात, माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट, माझ्या मराठीचा छंद मला नित्य मोहवीत, ज्ञानोबाची, तुकोबांची, मुक्तिशाची, जनाईची माझी मराठी चौखडी रामदासांची, शिवरायांची. इतिहासाच्या पानापानांवर प्रत्येकाच्या मनावर कोरलेली मराठी संस्कृती, माती, नाती, महान आहेत. सर्वच क्षेत्रांतील संतपरंपरा, साहित्य, इतिहास, संस्कृती यांनी ती विस्तृत बनली आहे. “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरंच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी...” असे कविवर्य सुरेश भटांनी म्हटले आहे.



अमृताशी पैजा जिंकणारी मराठी भाषा इथे हृदयाशी भिडणारी म्हणूनच म्हटले आहे. कविवर्य कुसुमाग्रज म्हणतात, “माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, तिच्या संगे जागल्या दऱ्याखोऱ्यात शिळा, रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी चारी वर्ण तुम्ही फिरे मराठीची पालखी” मराठी भाषेचे देखणे स्वरूप व्याप्ती, गौरव, वैभव, ऐश्वर्य अद्वितीय, अलौकिक आहे.



सावरकरांनी बजेट शब्दाला अंदाजपत्रक आणि सायकलला दुचाकी म्हटले. कुसुमाग्रजांनी बेकेट अनुवादात सायक्लोटामासाठी आकाश पडदा म्हटले... ज्ञानपीठ विजेते कविवर्य वि. वा. शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. त्यांनी साहित्य क्षेत्रात महनिय कार्य केले आहे. महाराष्ट्राची शान, मराठी शिवरायांची बोली, मराठी रयतेचा विश्वास, मराठी लाखोंचा स्वाभिमान मराठी. मुखामुखातील अमृतवाणी मराठी हीच आपली निशाणी. अभंग, मराठी भाषा अथांग, शब्द कुसुमाग्रजांचे भावून गेले, मराठी मातीचे प्रेम दावून गेले.



मराठी भाषेचे काय गाऊ आज गुणगान, आज साजरा करू मराठी राजभाषा दिन. माझ्या मराठी भाषेची काय सांगू महती, सातासमुद्रापलीकडे ही तिची ख्याती. वेलांटी, काना, मात्रा, आकारोकार, या साज शृंगारसह वस्त्र नेसली ती नववार, शोभती जणू सौंदर्याची खाण. मातृभाषेतून शिक्षण म्हणजे मायबोलीमधून हे जेव्हा शिक्षण दिले, जन्म देणाऱ्या मातेचं अक्षररूप मातृभाषा भाषेच्या पोषणात जीवनाच्या पोषणाची बीज असतात. मनाची मुळं जगण्याच्या मातीत रुजविण्याचं, मानव्याचे सामर्थ्य मातृभाषेच्या आकलनाने वाढतं आणि साक्षात समाधान आणि आनंद हा मनाला भिडणारा मातृभाषेतच असतो!



पाहुणे असंख्य पोसते मराठी, आपल्या घरात सोसते मराठी. अभिमानाने सांगावेसे वाटते की, दगड झालो तर सह्याद्रीचा होईल, तलवार झालो तर तुळजाभवानीची होईल. पुन्हा एकदा जन्म लाभला, तर मी मराठीच होईल! कारण पॅरिसचा दीपोत्सव कितीही भव्यदिव्य असला तरी आपल्या देवघराच्या समयीतील तुपाच्या तवंगावर लवलवणारी ज्योत मनाच्या गाभाऱ्यात नित्य तेवते. तीच पवित्र निर्मळ मांगल्यरूपी मायबोली. कवयित्री संजीवनी मराठे म्हणतात,
“माय मराठी तुझिया पायी
तन-मन-धन मी वाहिले,
तुझ्या नामे तुझ्या धामे
अखंड रंगूनी राहिले,
माय मराठी तुझ्यासाठी
वात होऊनी जळते मी,
क्षणाक्षणाला कणाकणाला
तुझ्या स्वरूपा मिळते मी...”


Comments
Add Comment

अष्टमी: अंतर्मनाचा आरसा

कुठलाही धर्म असो…, कुठलाही पंथ असो… प्रत्येकाने शेवटी सत्, सुंदर आणि अहिंसेचीच शिकवण दिली आहे. कुणी कुर्निसात

प्रश्न आणि उत्तर!

प्रल्हाद जाधव दुपारची निवांत वेळ होती. घरात बसूनच होतो. एक छानसा लेख लिहावा असे मनात आले. पण कोणत्या विषयावर

थोर स्वातंत्र्यसैनिक काकासाहेब कालेलकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर दत्तात्रेय बाळकृष्ण कालेलकर, ऊर्फ काकासाहेब कालेलकर हे थोर स्वातंत्र्यसैनिक,

तुम्ही मुलांना घाबरताय का?

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू नएजर्सच्यां मॅन्युप्युलेटिव्ह वागण्याने तुम्ही घाबरून गेला आहात का? मुलांवर

‘मेरे खयालोके आंगनमें...’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांनी दोनच सिनेमात एकत्र काम केले. ‘आनंद’(१९७१) आणि

आदिशक्ती जगन्माता

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर सध्या नवरात्री सुरू आहे. आदिशक्ती जगन्मातेचा उत्सव सुरू आहे. देवीच्या वेगवेगळ्या