Friday, July 5, 2024

पत्र…

  • हलकं-फुलकं : राजश्री वटे

llश्रीll
दिनांक ००-००-००००
प्रिय…
आदरणीय…
शि. सा. न.
सा. न. वि. वि.

जरा आठवून पाहू की वरील मायना कागदावर लिहून किती काळ लोटला…? नाही आठवत ना! हो… पत्राबद्दलच आज लिहिणार आहे.

मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनात खोलवर दरवळत जातो, चित्त प्रसन्न होऊन जातं… तसेच काहीसं पत्राच्या बाबतीत होतं, हाती आल्यावर त्याचा स्पर्श मरगळलेल्या मनाला उत्साही करतं…

हाती पेन धरून कागदावर निळ्या शाईची नक्षी उतरत जाते! ती नक्षी… अक्षररूपी भावना व्यक्त करणारं मनाचं सुंदर प्रतिबिंब असतं, असं हे भावनांचं शब्दांत उतरवणं म्हणजे पत्र लिहिणे, हे दोन मनाला जोडणारा दुवा आहे. लिहिता लिहिता संवाद घडवतो पत्र…

मनाला मोकळं करत जातात लिहिणाऱ्याला व वाचणाऱ्याला सुद्धा! पुन्हा पुन्हा वाचता येतं… काहीतरी वेगळं गवसतं… वाचता वाचता…

पत्र म्हणजे एकमेकांची घेतलेली दखल, पत्राला नातं असतं, नात्याचे अनेक पैलू म्हणजे पत्र… नात्याला घातलेली साद म्हणजे पत्र! विचारांचं आदान-प्रदान करून एका मनातून दुसऱ्याच्या मनात पोहोचणं! मनाला कुठे कुठे फिरवून आणता येतं, अल्याड-पल्याड कुठलीच सीमा नाही!

कधी ते तुटक असतं…
कधी ते व्यापक असतं…
कधी असतं घाव घालणारं…
कधी अश्रूंना वाव देणारं…
आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलणारं मनमोहक हिरवे पान आहे पत्र…

पत्र छंद आहे… पत्र गंध आहे… पत्र नाद आहे… अंतरीचा आवाज आहे पत्र… किनाऱ्याच्या ओढीने काठावर आलेली लाट म्हणजे अलवार शब्दांनी भिजलेलं पत्र… समुद्राच्या खोल तळाची गहराई असतात काही पत्र…

समजू नये असं काही… उमजू नये असंही काही… होय-नाहीचे द्वंद्व आहे पत्र!!

भावनांचा पूर वाहू द्यावा, पण शब्दांचा बांध तिथे असावा… कित्येकदा काही वाहून जातं… सावरता सावरता निसटूनही जातं…

कधी शांत करतं… कधी अशांत करतं… कधी संथ असतं… कधी वादळ असतं… जसं समजून घ्यावं, तसं असतं पत्र! पत्र लिहिणं म्हणजे एक मोठा घाट असतो! शब्दांचा थाट असतो!! भावनांचा झगमगाट असतो!!! तर कधी थयथयाटही असतो!!!
अशी अनेक रूपं मांडतं हे पत्र…

मो. न. ल. आ.
कळावे,
लोभ असावा…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -