मायभाषा: डॉ. वीणा सानेकर
आमचे सोमैया महाविद्यालय कला व वाणिज्य शाखांशी निगडित आहे. या महाविद्यालयाचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथली भाषिक समृद्धी. संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी या पाच भाषा आज या महाविद्यालयात शिकवल्या जातात. काही वर्षांपूर्वी कन्नड, सिंधी, पाली याही भाषा इथे शिकवल्या जायच्या. हे महाविद्यालय बहुभाषिक आहे. त्यामुळेच एकमेकांच्या भाषेचा आदर करण्याचा दृष्टिकोन विकसित झाला.
जागतिकीकरणानंतर प्रत्येकच भाषेसमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. ती गुंतागुंतीची पण मायभाषेविषयीची आस्था असणे, ही माणूस म्हणून आपली अपरिहार्य गरज आहे. तिच्या प्रगतीकरिता सर्व अंगांनी प्रयत्न केल्यासच तिचे जतन किंवा संवर्धन होऊ शकते. मायभाषा ही घरात बोलायची गोष्ट आहे, पण जगाच्या बाजारपेठेत ती दुय्यम आहे, असा दृष्टिकोन सतत अनुभवास येतो. त्यामुळे फक्त मराठीच नाही, तर गुजराती, हिंदी माध्यमाच्या शाळांनाही घरघर लागलेली दिसते.
माझी मुलगी फ्रान्समध्ये नुकतीच जाऊन आली. ती मराठी माध्यमातच शिकल्याने तिथल्या भाषेचे ती बारकाईने निरीक्षण केले. तिथल्या शाळांमध्ये मुलांना फ्रेंच भाषेत शिकण्याचा न्यूनगंड वाटत नाही, याचे मुख्य कारण ते इंग्रजीवर अवलंबून नाहीत. त्यांनी त्यांच्या भाषेतून सर्व अद्ययावत ज्ञान आणले आहे. माहिती तंत्रज्ञान त्यांच्या भाषेत विकसित केले आहे. संगणक, मोबाइल सर्वत्र त्यांचीच भाषा प्राधान्याने आहे. वय वर्ष दोनपासून इंग्रजीचे ओझे तिथे मुलांवर लादले जात नाही. जगातील विविध प्रगत देशांमध्ये त्यांच्या भाषेलाच अग्रणी स्थान आहे. आपली भाषा जपणे, तिचे संवर्धन करणे म्हणजे अन्य भाषेला कमी लेखणे नव्हे किंवा तिचा दुस्वास करणे नव्हे.
आपल्या भाषेच्या विस्ताराच्या सर्व शक्यता शोधायचा पूर्ण अधिकार त्या-त्या भाषकांना आहे. तिच्या प्रश्नांकरिता झगडण्याचा हक्क आहे. मराठी शाळांच्या प्रश्नांकरिता आयोजित बैठकांमध्ये माझी भेट एका गुजरातीतील पत्रकाराशी झाली. तो म्हणाला, “आमच्या शाळाही संपत चालल्या आहेत. सर्व प्रादेशिक भाषांसमोर आज अटीतटीची लढाई आहे नि आपण आपली भाषा वाचवण्याकरिता एकमेकांकडून खूप काही शिकू शकतो.” माझी भेट खूपदा भावेशभाई या गुजराती भाषक कार्यकर्त्याशी झाली आहे. पालकांनी मुलाला मातृभाषेतून शिकवावे म्हणून ठिकठिकाणी ते जनजागृती करतात. स्पर्धा, पथनाट्य असे विविध उपक्रम आयोजित करतात. मायभाषेचा अभिमान जपण्यासोबतच भाषा-भाषांमधील सौहार्द जपणे आवश्यक आहे, कारण दुसऱ्यांची भाषा संपवून आपली भाषा मोठी होऊ शकत नाही नि आपल्या भाषेचा विकास दुसऱ्या कुणाच्या हाती नाही.
गेली काही वर्षे आमच्या सोमैया महाविद्यालयात आम्ही भाषासप्ताह आयोजित करतो. विविध भाषांतील स्पर्धा, लेखकांशी संवाद, पुस्तकप्रकाशने, असे भरगच्च कार्यक्रम असतात. आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत भारतीय भाषा युवापिढीला अभ्यासाव्या लागणारच आहेत. माझी भाषा ‘डाऊनमार्केट’ आहे हा चष्मा उतरवून निकोप दृष्टीने आपआपल्या भाषांकडे पाहणे, त्या वाढवणे ही पावले ठामपणे उचलली, तरच आपापल्या भाषा जगतील नि बहरतील.