- नक्षत्रांचे देणे : डॉ. विजया वाड
“पथ्यपाणी, व्यायाम नि रिप्लेसमेंट मात्र नको. भय वाटतं मला. माझी धाकटी बहीण निर्मला! फेल गेली हो तिच्या गुडघ्यावरची शस्त्रक्रिया. पण तुम्ही कुठे होतात?” मालतीबाई अप्पा वर्तकांना म्हणाल्या. तसे ते म्हणाले, “जपानला! एक लेख वाचला टाइम्स ऑफ इंडियात. जपानमधला डॉ. किंगकुंगकिंग हा शस्त्रक्रियेशिवाय गुडघे बरे करतो. म्हटलं घ्यावा अनुभव!”
“कुठे गेला होतात अप्पासाहेब? की गुडघेदुखीनं उसळी मारली पुन्हा?” मालतीबाईंनी बागेत फेऱ्या मारणाऱ्या अप्पा वर्तकांना हटकलं.
“माझी गुडघेदुखी पळाली हो मालतीबाई.”
“अशी कशी पळाली? मला तरी सांगा. गेली अकरा वर्षे काढतीय मी गुडघेदुखी!”
अप्पा वर्तकांचे डोळे खुशीने चमकले. मालतीबाई त्यांच्याकडे मोठ्या आशेने बघत आहेत हे बघून अधिकच समाधान पावले. मग आपल्या धवल रूपेरी केसातून हात फिरवीत म्हणाले,
“अहो, मी ढेग सांगीन, पण जमायचं नाही हो तुम्हाला मालतीबाई.”
“का नाही जमणार? मी बरोब्बर जमवीन. पथ्यपाणी, व्यायाम नि रिप्लेसमेंट मात्र नको. भय वाटतं मला. माझी धाकटी बहीण निर्मला! फेल गेली हो तिच्या गुडघ्यावरची शस्त्रक्रिया. पाच लाख रुपये ओतले त्या डॉक्टर मुंदडाच्या डोक्यावर… नि गुडघेदुखी तश्शीच!…”
“मालतीबाई, गेला दीड महिना मी बागेत आलो नाही. तुम्हाला माझ्यात काही फरक दिसतो का?”
“तसे थोडे वाटताय हो तजेलदार! पण असं का विचारलंत?”
“हिरवळीवर बसूया?”
“नको. उठताना मला त्रास होतो. त्यापेक्षा बाकडं परवडलं.”
“चला तर मग! बाकड्यावर बसू.”
“बोला आता. कुठे होतात?”
“जपानला!”
“काय सांगता काय? आम्ही आपले फार तर सोलापूर, पंढरपूर करतो. नि तुम्ही अप्पासाहेब चक्क जपानला?”
“हं! एक लेख वाचला टाइम्स ऑफ इंडियात. जपानमधला डॉ. किंगकुंगकिंग हा शस्त्रक्रियेशिवाय गुडघे बरे करतो. म्हटलं घ्यावा अनुभव.”
“म्हणून तुम्ही चक्क जपानला?”
“मग काय झालं?”
“अहो, पण तिथे तर भूकंप झाला ना? मेलाबिला असता म्हणजे?”
“कमाल करता मालतीबाई, मला चक्क मारून टाकताय?”
“नाही हो. तो भूकंप बघून भारी हादरले होते मी. न पाहिलेल्या त्या जपान्यांसाठी प्रार्थना केली मी… तुमच्यासाठी नसती का केली?”
“काय चाललंय प्रार्थना प्रार्थना? अॅ? मेलो का मी? जपानला जायला येन लागतात येन! चारशे रुपयांना एक केळं पडतं! एक! कळलं?”
“कळलं!”
“खिशात दिडक्या आणा आधी. मग करा प्रार्थना! मी चांगला सज्जड जिवंत आहे. एकशे चार वर्षं जगणार आहे. धोंडो केशव कर्व्यांसारखा! काय समजलात? प्रार्थना करतायत.” अप्पांच्या कपाळावर उभी शीर उठली. तशा मालतीबाई सचिंत झाल्या.
“लोसाकार घेतली नै का अप्पासाहेब सकाळी?”
“घेतली.”
“मग चिडू नका. मला काळजी वाटते.”
“काळजी? एकदा तरी बघायला आलात घरी गेल्या दीड महिन्यांत? हा अप्पा जिवंत आहे का मेला ते?”
“नाराज होती तुमची सून. तुमच्या गुडघ्यावर पाच लाख रुपये गेले म्हणून. भेटू नाही दिलंन मला.”
“काय सांगता? अहो चौदा हजार निवृत्तिवेतन घशात घालतोय गेली सतरा वर्षं! तिच्या घशात.”
“म्हणून तर जपानमधली केळी परवडतात ना! चारशे रु.ला एक!” मालतीबाई गोड हसल्या. अप्पासाहेब मोकळे झाले.
“मालतीबाई, आज बाहेर पडल्यावर खूप बरं वाटलं.”
“मला तुम्हाला बघून! अप्पा… निर्मलासारखी तुमची शस्त्रक्रिया वाया जाऊ नये म्हणून मी नवस बोलले होते.”
“काय सांगता?”
“होय हो! एकेकट्या उरलेल्या जोडीतल्या त्या ‘एकट्याला’ थोडी साथ – सोबत हवी वाटते. निर्विकल्प! मग जपानची ट्रीप ऐकता येते. किंगकुंग किंग कल्पनेत भेटतो.”
“मज्जा आली ना मालतीबाई?”
“अगदी! दिवस किंगकुंगकिंग झाला!” त्या बाकड्याला चैतन्याचे धुमारे फुटले.