- क्राइम : अॅड. रिया करंजकर
पैसे भरपूर मिळतील, व्याज मिळेल या शॉर्टकट पैसे मिळवण्याच्या नादात देवेंद्रने स्वतःच्या मागे बँकेचे वसुली अधिकारी लावून घेतले. घरी बँकेचे वसुली अधिकारी येत होते. यामुळे देवेंद्रच्या आई-वडिलांना धक्का बसला होता.
ईझी मनीची सवय तरुण पिढीला झालेली आहे. मेहनत केल्यानंतर पैसा मिळतो आणि त्यासाठी फार वेळ लागतो. म्हणून तरुण पिढी सोप्यात सोपा पैसे कमवण्याचा मार्ग बघत आहे. तो मार्ग कोणत्याही प्रकारचा असला तरी चालेल. झटपट पैसे कमवण्यासाठी तरुण पिढी या विचित्र मार्गाकडे वळत आहे.
बँकेचे अकाऊंट खोलल्यानंतर एटीएम कार्ड जसं मिळतं, तसंच सर्रासपणे सगळ्यांकडे आता क्रेडिट कार्डही उपलब्ध झालेले आहेत. शिवाय बँका फोन करून क्रेडिट कार्ड घेण्यासाठी आपल्याला विनंती करतात. देवेंद्र हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा प्रायव्हेट नोकरी करत होता. त्यामुळे त्याच्याकडे नऊ बँकांचे क्रेडिट कार्ड होते. त्या क्रेडिट कार्डवरून तो घरातील लाइट बिल, घरातील सामान इतर गोष्टी पूर्ण करत होता व सुरुवातीला वेळेवर क्रेडिट कार्डचे व्याज आणि पैसे भरत होता. त्याच्या मित्राने त्याला एक आयडिया दिली की, झटपट पैसा कसा कमवता येईल. “क्रेडिट कार्डवरून जी रक्कम घेतो, त्याला अमुक टक्के व्याज असते आणि तीच रक्कम आपण घेऊन दुसऱ्याला दिली, तर त्याच्या डबल टक्के आपण वसूल करू शकतो. जे क्रेडिट काढला इंटरेस्ट जर आठ टक्के असेल, तर आठ टक्के आपण इंटरेस्ट भरायचे आणि तेच पैसे आपण दुसऱ्यांना दिले, तर आपण दहा टक्के किंवा पंधरा टक्के इंटरेस्टने द्यायचे. जे उरलेला जो इंटरेस्ट आहे बाकीचा, तो आपला असेल.” अशा प्रकारे पैसे कमवण्याची आयडिया मित्राने त्याला दिली.
देवेंद्रला हे पटलं आणि त्याने नऊ बँकेच्या क्रेडिट कार्डवरून पैसे उचलले आणि मित्रांमध्येच व्याजाने लावले. क्रेडिट कार्डचे लिमिट संपल्यानंतर याच्याकडून इंटरेस्ट येत नसल्यामुळे बँकेचे वसुली अधिकारी त्याच्या घरी येऊन घिरट्या घालू लागले. नऊच्या नऊ बँकेचे वसुली अधिकारी त्याच्या घरी येऊ लागले. त्या मित्रांना देवेंद्रने पैसे दिले होते, त्यांच्याकडून तो पैसे मागू लागला. त्याचे मित्र, “आमच्याकडे आता पैसे नाहीत, आमच्याकडे येतील तेव्हा तुला देऊ” असं त्याला सांगू लागले आणि या सर्व क्रेडिट कार्ड्सची टोटल वीस लाखांपर्यंत गेलेली होती. तेच नाही तर देवेंद्र याने मोबाइलवरून असलेल्या ॲपवरही पैसे घेतलेले होते आणि त्या ॲपमधूनही त्याला आणि त्याच्या नातेवाइकांना कॉल आलेले होते. म्हणजे देवेंद्रला बँकांकडून, ॲपकडून कर्ज घेण्याची सवय लागलेली होती आणि मध्येच त्याची नोकरी गेल्यामुळे तो आपल्या सगळ्या गरजा क्रेडिट कार्डवरच पूर्ण करत होता.
ज्या मित्राने त्याला क्रेडिट कार्डवर पैसे घेऊन दुसऱ्यांना व्याजाने लाव सांगितले, त्याच मित्राने त्याच्याकडून दहा लाख रुपये घेतलेले होते आणि आता तो देत नव्हता. पैसे भरपूर मिळतील, व्याज मिळेल, या शॉर्टकट पैसे मिळवण्याच्या नादात देवेंद्रने स्वतःच्या मागे बँकेचे वसुली अधिकारी मात्र लावून घेतले. सर्व प्रकारांमध्ये घरी बँकेचे वसुली अधिकारी येत असल्यामुळे देवेंद्रच्या आई-वडिलांना एक वेगळाच प्रकारचा धक्का बसलेला होता आणि एवढेच नाही तर पूर्ण बिल्डिंगमध्ये ही गोष्ट समजलेली होती. घरी लोक येतात म्हणून तो दिवस-रात्र घराच्या बाहेरच फिरत असतो.
क्रेडिट कार्ड हे बँकेने माणसाला इमर्जन्सीसाठी दिलेले कार्ड आहे. पण काही लोक स्वतःची मौजमजा आणि डबल पैसे मिळवण्याच्या नादात त्याचा चुकीचा वापर करत असून, या वापरामध्ये ते स्वतःच फसत आहेत.
(सत्यघटनेवर आधारित)