Monday, April 21, 2025
Homeसाप्ताहिककोलाजAmeen Sayani : “बहनों और भाईयों... अलविदा”

Ameen Sayani : “बहनों और भाईयों… अलविदा”

  • विशेष : मृदुला घोडके

रेडिओविश्वावर जवळपास चार दशके राज्य करणाऱ्या अमीन सायानी यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांसाठी काळ थांबला. केवळ आवाजातील चढ-उतारांच्या जोरावर संपूर्ण देशभरात आपली ओळख अमीन सायानी यांनी निर्माण केली. त्यांनी ‘भाईयों और बहनों’च्या जमान्यात ‘बहनों और भाईयों’ म्हणत क्षणात श्रोत्यांना आपलेसे केले. ‘बहनों और भाईयों, अगली पायदान पे हैं ये गाना…’ असे म्हणत श्रोत्यांवर त्यांनी सोडलेली छाप अजूनही कायम आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या दमदार आवाजाच्या जाण्याने रसिक एका व्यक्तीलाच नाही, तर एका भावनेला मुकला आहे, कारण या जादूई आवाजाने १९५० ते १९९० ही चार दशके रेडिओवर राज्य केले आहे.

आवाजाच्या दुनियेतील अनभिषिक्त सम्राट, रेडिओच्या सुवर्णयुगाचा शिल्पकार, खनकदार आवाजाचा धनी, आपल्या जादूई आवाजाने सुमारे सहा दशकं अधिराज्य गाजवणारा रेडिओ उद्घोषक, अमीन सायानी गेल्याची बातमी वाचली आणि मन उदास झालं. त्या काळात कदाचित अनेक दशकं त्यांचा चेहरा कुणी पाहिला नसेल पण आवाज मात्र परिचयाचा, जिव्हाळ्याचा होता.

माझ्या लहानपणी, ७०च्या दशकात, मनोरंजनाचं एकमेव सशक्त माध्यम असलेल्या रेडिओवर दर बुधवारी रात्री ८ वाजता ‘बिनाका गीतमाला’ घरातले सगळेच जण न चुकता ऐकायचो… तेव्हापासून या जादूई आवाजाचं गारुड माझ्या मनावर पडलं. अमीन सायानी यांनी हिंदी चित्रपटातील गाणी भारतातल्या गावागावांत तर पोहोचवलीच, पण संपूर्ण देशाला आपल्या आवाजाच्या माध्यमातून बांधून ठेवलं. ‘बिनाका गीतमाला’ सादर करताना ते ज्या प्रकारे बोलायचे… तो आवाज, ते बोलणं किती तरी दिवस कानात गुंजत राहायचं. ‘बिनाका गीतमाला’ आणि अमीन सायानी हे समीकरण झालं होतं. त्यांचा कार्यक्रम सुरू झाला की लोक रेडिओपाशी गर्दी करायचे आणि रस्ते ओसाड पडायचे.

२१ डिसेंबर १९३२ रोजी, मुंबईत, एका सुशिक्षित, गांधीवादी कुटुंबात अमीन सायानी यांचा जन्म झाला. त्यांचे वडील, जान मोहोम्मद सायानी डॉक्टर होते. आई, कुलसुम सायानी समाज सेवा साहित्य क्षेत्राशी निगडित होती. प्रौढ साक्षरता प्रसारात त्यांचं योगदान होतं. महात्मा गांधी यांच्या सांगण्यानुसार त्या गुजराथी, हिंदी आणि उर्दू भाषेत, ‘रहबर’ नावाचं एक वृत्तपत्र चालवायच्या. त्यांचे सर्वात थोरले बंधू हबीब इंग्लंडमध्ये डॉक्टर होते. मधले बंधू हमीद यांचं All India रेडिओशी घट्ट नातं. ते इंग्रजी भाषेत कार्यक्रम सादर करायचे. अगदी लहानपणापासूनच अमीन सायानी यांच्यावर भाषेचे संस्कार झाले. ते चार वर्षांचे असताना संपूर्ण कुटुंब इंग्लंडला स्थलांतरित झालं. तथापि वडिलांना तिथली हवा बाधली आणि काही महिन्यांतच ते भारतात परतले. अमीन सायानी यांचं प्राथमिक शिक्षण गुजराथीमध्ये झालं. माध्यमिक शिक्षण ग्वाल्हेरच्या सिंधिया शाळेत झालं. शाळेत असताना त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. ते म्हणायचे, सूर माझ्या गळ्यात होता आणि हृदयातही. त्या काळात स्वातंत्र्याचं वारं वाहू लागलं होतं. देशप्रेमाची उर्मी मनात होती. अमीन यांना स्वातंत्र्य सैनिक बनायचं होतं. रवींद्र संगीतामध्ये त्यांची विशेष रुची होती. ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताची पाचही कडवी ते शाळेत गात असत. त्यांच्या देशप्रेमाची झलक शेवटपर्यंत त्यांच्या निवेदनामध्ये दिसत असे.

अमीन सायानी यांचं महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये झालं. तिथे पदमसी यांच्या थिएटर ग्रुपमध्ये ते सामील झाले. तिथेच त्यांच्या आवाजावर संस्कार झाले. आवाजातील चढ-उतार, शब्द फेक, उच्चार, लय, शब्दांवरचा भर इत्यादी बारकावे ते तिथेच शिकले. वयाच्या ९व्या वर्षी त्यांनी आपले थोरले बंधू हमीद यांच्याबरोबर All India रेडिओमध्ये एक रेकॉर्डिंग केलं. त्यांना आपला आवाज अजिबात आवडला नव्हता. हमीद यांच्या मार्गदर्शनात त्यांनी मेहनत केली. १९५२ मध्ये बिनाका नावाच्या टूथ पेस्ट बनवणाऱ्या कंपनीला आपल्या नावे एक कार्यक्रम रेडिओवर सुरू करायचा होता. त्याआधी अशा प्रकारचा कुठलाच कार्यक्रम रेडिओवर कुणी केला नव्हता. अशा वेळी हमीद यांच्या सांगण्यावरून नवशिक्या अमीन सायानी यांनी केवळ २५ रुपये महिना पगारावर, स्क्रिप्ट लिखाण आणि सादरीकरण करण्याची ही नोकरी पत्करली. ३ डिसेंबर १९५२ मध्ये ‘बिनाका गीतमाला’चा पाहिला कार्यक्रम सादर झाला. त्यात ७ गाणी वाजविण्यात आली. हा कार्यक्रम झटक्यात लोकप्रिय झाला. पहिल्याच कार्यक्रमानंतर त्यांना ६५ हजार पत्र आणि अभिप्राय मिळाले. १९५२ पासून रेडिओ सिलोनवर सुरू झालेला हा कार्यक्रम १९९४ पर्यंत तितक्याच लोकप्रियतेच्या शिखरावर होता. जगात इतकी वर्षे सातत्याने रेडिओवर चाललेला हा एकमेव कार्यक्रम. अनेक सुप्रसिद्ध आणि दिग्गज संगीतकार, गायक आणि कलाकार या कार्यक्रमात ‘पहली पायदान’वर आपलं गाणं वाजविण्यात यावं, अशी मनीषा बाळगून असायचे. या कार्यक्रमाच्या प्रचंड यशाचं श्रेय अमीन सायानी यांना जातं. “बहनों और भाईयों”नं प्रारंभ होणारा त्यांचा प्रत्येक कार्यक्रम श्रोत्यांना खिळवून ठेवत असे. बोलण्यात सहज, सरल स्थायीभाव असलेल्या अमीन सायानी मिश्र भाषेत बोलायचे. भाषेची सरमिसळ केल्याची टीका त्यांच्यावर बरेचदा व्हायची. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, “मी जे काही बोलतो, विचार करतो ते सगळं मनापासून करतो. मनाचा आवाज, मनापासून मनांपर्यंत पोहोचावा हा माझा प्रयत्न आहे. मी जनसामान्यांची भाषा बोलतो. श्रोते आणि वक्त्यादरम्यान कुठलाही पडदा नसावा. माझा आवाज असली आहे… माझं बोलणं असली आहे… म्हणून भाषा सहज, सोपी आहे.”

खरंच, अमीन सायानी निवेदन करताना श्रोत्यांशी संवाद साधायचे. हेच त्यांच्या लोकप्रियतेचं गमक असावं. ५४ हजारांपेक्षा अधिक रेडिओ कार्यक्रम आणि १९ हजार जिंगल्स – जाहिरातींना आवाज दिल्याबद्दल लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांच्या नावाची नोंद आहे. त्यांचा आवाज ऐकता ऐकता लहान मुले तरुण झाली, तरुणाई वृद्धत्वास आली तरी त्यांचा आवाज मात्र चिरतरुणच राहिला. त्यांच्यासारखा आवाज आणि त्यांच्यासारखी बोलण्याची ढब दुसरी सापडणे कठीणच. अनेक प्रथितयश निवेदक, सूत्रधार, उद्घोषक अमीन सायानी यांची नक्कल करतात, करत राहतील. माझ्यासारख्या अनेक रेडिओ निवेदक – प्रसारकांसाठी ते स्फूर्तिस्थान आहेत. अनेक पारितोषिक आणि सन्मानानी त्यांचा गौरव करण्यात आला. २००८ मध्ये पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. तरी श्रोत्यांचं उदंड प्रेम ही आपल्या कामाची खरी पावती असल्याचं ते मानायचे.

आवाजाच्या दुनियेतील २ आवाज आपल्या देशात युगानयुगे स्मरणात राहतील. गाण्यासाठी गानकोकिळा लता मंगेशकर आणि रेडिओ निवेदनासाठी अमीन सायानी! त्यांच्याच एका कार्यक्रमात उद्धृत एक शेर लिहून त्यांना मनापासून आदरांजली अर्पण करते.

“कुछ किस्सा, कुछ हिस्सा, कुछ बातें रहेंगी,
अगर कल हम ना रहे, तो हमारी यादें रहेंगी!”

होय, अमीन सायानीजी आपला आवाज सदैव स्मरणात राहील.

(लेखिका आकाशवाणी, नवी दिल्ली येथे माजी मराठी वृत्तविभाग प्रमुख आहेत.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -