Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीSudarshan Setu : अटल सेतूनंतर पंतप्रधानांच्या हस्ते पार पडलं 'सुदर्शन सेतू'चं उद्घाटन

Sudarshan Setu : अटल सेतूनंतर पंतप्रधानांच्या हस्ते पार पडलं ‘सुदर्शन सेतू’चं उद्घाटन

गुजरातमधील हा पूल आहे खास; काय आहेत वैशिष्ट्ये?

सुरत : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शिवडी ते न्हावाशिवा मार्गाला जोडणाऱ्या अटल सेतूचं (Atal Setu) उद्घाटन केलं होतं. हा पूल सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे आणि दिवसेंदिवस प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. यानंतर आज पंतप्रधानांनी देशातील सर्वात लांब केबल ‘सुदर्शन सेतू’चं (Sudarshan Setu) उद्घाटन केलं. या पुलामुळे देशातील पायाभूत सुविधांचे आणखी एक अनोखे उदाहरण देशात निर्माण झाले आहे.

पंतप्रधान मोदींनी आज गुजरातमधील (Gujrat) द्वारका येथे ‘सुदर्शन सेतू’चे उद्घाटन केले. हा केबल पूल ओखा ते समुद्राच्या मध्यभागी वसलेल्या बेट द्वारकाला जोडतो. याची लांबी सुमारे २.३२ किलोमीटर आहे. या पुलाच्या बांधकामाला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी २०१६ साली मंजुरी दिली होती. पंतप्रधान मोदींनी ७ ऑक्टोबर २०१७ रोजी या पुलाची पायाभरणी केली होती. आधी त्याची अंदाजे किंमत ९६२ कोटी रुपये होती, मात्र नंतर ती वाढवण्यात आली. ९७९ कोटी रुपये खर्चून ‘सुदर्शन सेतू’ बांधण्यात आला आहे.

काय आहेत ‘सुदर्शन सेतू’ची वैशिष्ट्ये?

  • सुदर्शन सेतू ‘ओखा-बेट द्वारका सिग्नेचर ब्रिज’ म्हणूनही ओळखला जाईल. रहिवासी आणि द्वारकाधीश मंदिरात येणाऱ्या यात्रेकरूंसाठी हा पूल महत्त्वाचा ठरणार आहे.
  • चौपदरी असलेल्या २७.२० मीटर रुंद पुलाच्या दोन्ही बाजूला २.५० मीटर रुंद पदपथ आहे.
  • सुदर्शन ब्रिजचे डिझाईन अनोखे असल्याचे सांगण्यात येत आहे. यात श्रीमद्भगवद्गीतेतील श्लोक आणि दोन्ही बाजूंना भगवान कृष्णाच्या प्रतिमांनी सजवलेला फूटपाथ आहे.
  • फूटपाथच्या वरच्या भागात सौरऊर्जेचे पॅनेलही बसवण्यात आले असून, यातून एक मेगावाट वीजनिर्मिती होणार आहे.

प्रवासी भाविकांचा वेळ वाचणार

सुदर्शन सेतू बांधण्यापूर्वी यात्रेकरूंना द्वारकेला जाण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत होता. त्यांना बोटीवर अवलंबून राहावे लागत असे. हवामान खराब असेल तर लोकांना थांबावे लागत असे. मात्र, आता या पुलाच्या बांधकामामुळे मोठा दिलासा मिळाला असून ते द्वारकेचे प्रमुख पर्यटन केंद्र म्हणूनही काम करेल. याशिवाय प्रवासी भाविकांचा बराच वेळ वाचणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -