
- तृप्ती राणे
नुकताच २१ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा झाला. त्या निमित्तानं ...ज्या दिवशी व्हाॅट्सॲपवर, मेसेंजरवर लोक j1 jhal ka? असं न लिहिता, ‘जेवण झालं का’ असं स्वच्छ मराठीत लिहायची तसदी घेतील तो खरा मातृभाषा दिवस. ज्या दिवशी कार्यालयीन ईमेल... ओळखपत्र... स्वपरीचय मराठीत मागताना आणि देताना कुणाला लाज, न्यूनगंड वाटणार नाही... तो खरा मातृभाषा दिवस. भाषा जगवायची... तर त्यासाठी प्रत्येक सामाजिक प्लॅटफॉर्मवर, मेल आदी सर्व ठिकाणी जास्तीत जास्त मराठी भाषेत लिहिण गरजेचं आहे. त्यात निव्वळ अनुकरण, स्टाईल म्हणून... हिंदी, उर्दू, इंग्रजी शब्द सतत वापरणं टाळायला हवं असं वाटतं. काही शब्द ओघाने येतात... ते ठिक आहे... पण सरसकट वेड्यासारखे इतर भाषिक शब्द वापरणं कमी व्हायला हवं, एव्हढं मात्र नक्की. त्यासाठी आपण ठरवून प्रयत्न करायला हवा. याबाबत मला दक्षिणेकडची राज्य... तिथल्या लोकांची भाषिक अस्मिता अधिक योग्य वाटते... स्वतःच्या मातृभाषेसाठी ही मंडळी कमालीची आग्रही असतात.
आपले चित्रपट, संस्कृती यावर वेड्यासारखं प्रेम करतात ही लोक. ती तशी आहेत म्हणून आज स्वतःची भाषिक अस्मिता आणि अस्तित्व ही माणसं टिकवून आहेत. याउलट महाराष्ट्रात आपण आणि आपली भाषा... मराठीत लिहिणं तर जाऊच दे मराठीत बोलणंही अनेकांना कमालीचं कमीपणाचं वाटतं. काही कालावधीसाठी माझं तिथे वास्तव्य होतं... तिथे सगळीकडेच जर तुम्ही हिंदी वा इतर भाषेत बोलायचा प्रयत्न केला, तर लोक सरळ निघून जायचे... एकतर तिथली भाषा बोला नाहीतर इंग्रजी... तेही अगदी अल्प... तेव्हा खूप राग यायचा त्यांचा... एव्हढं काय... यायला नको का यांना हिंदी असं वाटायचं... पण मराठीची दुर्दशा पाहता मला दाक्षिणात्य मंडळी याबाबत अधिक उजवी वाटतायतं... १९६० ला भाषावार महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. सहा दशकात मराठी नेत्यांच्या उदासीनतेमुळे... आणि अति इंग्रजीच्या मोहापायी मराठी भाषा हरवत जातेय... यात दोन मराठी माणसं जरी एकत्र आली तरी हिंदी बोलतील असे विनोद घडू लागले... विनोद सोडला तरी परिस्थिती गंभीर आहे... तुम्ही रस्त्यावर उतरलात की, टॅक्सी रिक्षासाठी... ‘भैया चलेंगा क्या?’ने सुरुवात होते. मग भाजीवाला... किराणा... मासे... कपडे आदी असंख्य ठिकाणी परप्रांतीयांची मक्तेदारी वाढल्याने... आणि मुळात लोक आणि सरकार यांनाही भाषिक अस्मिता (अपवाद आहेतच) फार उरली नसल्याने या कुणालाही... जिथे कमावतो आहोत तिथे तिथली भाषा बोलली पाहिजे याची पर्वा उरली नाहीये...
याला पर्याय... एकतर आपण मराठीतच बोलायला हवं... उगाच हिंदीत बोलायचं नाही... इंग्रजी भाषेत मुलांना शिकवतोय इतपत ठिक... पण ‘आमची मुलं इंग्रजी पुस्तकं वाचतात... मराठी नाही...’ हे म्हणताना एक वृथा कौतुक नकळत पालकांच्या तोंडी उमटतं... त्यामुळे आपण मराठी नाही बोललो वा लिहिलं, तर त्यात काय अशी भावना आपण नकळत मुलांमध्ये रुजवतोय हे अनेकांच्या लक्षात येत नाही... मुळात लहानपणापासूनच मुलांच्या हातात... विविध मराठीतील गोष्टींची पुस्तकं देणं. त्यांना मराठी नाटक, सिनेमा... विविध सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमांना जमेल तसं घेऊन जाणं ही जबाबदारी पालकांची... मात्र बरेचदा असं दिसतंय वेळ नाही म्हणत पालक ती जबाबदारी निभावत नाहीत... आणि भविष्यातील पिढी मराठीपासून दूर होते. तेव्हा आपल्या मुलांना यापुढे मराठीशी जोडण्याचं काम पालकांनी केलं... म्हणजे ते करूच शकतात... तरच मराठी भाषा टिकेल.
आणखी सोप होतंय म्हणून इंग्रजीत kashi ahe ऐवजी कशी आहेस? असं लिहिण्याचे कष्ट घ्यायचे... मराठीत काम करणारे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता अभिनेते... साहित्यिक, अगदी सरकारी अधिकारीही जेव्हा खासगी मेसेजमध्ये इंग्रजीतच सोप वाटतं म्हणून इंग्रजीत मेसेज करतात, तेव्हा खूप वाईट वाटतं. म्हणून यापुढे विशेषत सामाजिक माध्यमात ॲप्स, मेसेंजर आणि ईमेलमध्ये कंटाळा न करता मराठीत लिहाल नं... जमेल ना एव्हढं... एव्हढं जमलं तरी आपली मातृभाषा टिकेल...