मुंबई : आपण सर्वच जाणतो की कोणत्याही विषयाचे आकलन होण्यासाठी वाचन ही पहिली पायरी आहे. आजमितीस लहान मुलं, तरुण पिढी आणि काही अंशी वार्धक्याकडे सरकत चाललेल्या माणसांमध्येही वाचनाची आवड किंवा ओढ कमी होत चाललेली दिसून येते. अशातच इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल असल्यामुळे एकूणच मराठी भाषेच्या अस्तित्वाचा प्रश्न आपल्या महाराष्ट्रातच निर्माण झाला आहे.
शिवशाहू प्रतिष्ठान मुंबई व बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ विभाग लोअर परळ आयोजित मराठी भाषेचे पुनरुज्जीवन, संवर्धन आणि अस्तित्व टिकविण्यासाठी मराठी भाषा दिनी सामूहिक वर्तमानपत्र वाचन करण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमात इयत्ता दुसरी ते नववीचे विद्यार्थी आपल्या पालकांसोबत वर्तमानपत्राचे वाचन करतील. हा उपक्रम श्रमिक जिमखाना मैदान, ना. म. जोशी मार्ग मुन्सिपल शाळेच्या बाजूला, लोअर परेल (पूर्व) येथे रविवार दि.२५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ८.३० वाजता विनामूल्य राबवला जाणार आहे.
वर्तमानपत्र वाचन सुरू होण्याआधी अर्धा तास विद्यार्थी व पालकांनी येणे आवश्यक आहे. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास पदक आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. या सामूहिक वाचन सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठीचा अर्ज लोअर परेल विभागातील शाळेत अथवा शिवशाहू प्रतिष्ठान, मुंबई बीडीडी चाळ ना.म.जोशी मार्ग मधील कार्यालयात मिळतील.