Thursday, July 25, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सAjay Phansekar : सर्वोत्कृष्ट कलाकृती तयार करायची आहे...

Ajay Phansekar : सर्वोत्कृष्ट कलाकृती तयार करायची आहे…

  • टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल

अजय फणसेकर यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन केले. प्रेक्षकांना त्यांनी नेहमी दर्जेदार चित्रपटांची आस लावली. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले. पुढचे शिक्षण नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये झाले. शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात त्यांचा सक्रियपणे सहभाग असायचा. कधी गाणं गा, कधी मिमिक्री कर, कधी नाटक बसव, कधी नाटकात काम कर असे त्यांचे सुरू होते. तिथूनच त्यांना या क्षेत्राची आवड निर्माण झाली. तेथील सांस्कृतिक कार्यक्रमासाठी त्यांना सरांकडून बोलावले जायचे. खेळांमध्येही ते बॉक्सर होते.

रुईया कॉलेजमध्ये त्यांनी पुढील शिक्षण घेतले. तिथे कॉलेजतर्फे ते क्रिकेट देखील खेळायचे. तेथे ज्येष्ठ दिग्दर्शक विनय आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दिग्दर्शनाचे धडे गिरविले. त्यांनी दिग्दर्शित केलेली ‘अपुरी’ एकांकिका खूप गाजली. एका मित्राने त्यांना दयाल निहलानीच्या ‘एक कहाणी’ मालिकेमध्ये अभिनयासाठी नेले. त्यानंतर अभिनेते सतीश पुळेकर यांच्यासोबत त्यांनी काम केले. महिंद्रा कंपनीकडून ते क्रिकेट खेळले. त्यानंतर बी.पी.सिंगकडे ‘एक शून्य शून्य’ मालिकेत त्यांनी काम केले. ती मालिका खूप गाजली. ही मालिका त्यांच्या अभिनयातील टर्निंग पॉइंट ठरली. त्याच वेळी दयाल निहलानीच्या ‘अंधायुद्ध’ चित्रपटासाठी काही कलावंतांना कास्ट करण्यास मदत केली. त्यानंतर ‘केवळ तुझ्यासाठी’ हे नाटक त्यांनी केले. पुढे अनेक मालिकेमध्ये त्यांनी काम केले. दीपक सावंतच्या ‘अक्का’ चित्रपटामध्ये त्यांनी काम केले. त्यामध्ये एका गाण्यामध्ये अमिताभ बच्चन, जया बच्चन होत्या. त्यातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक मिळाले.

‘रात्र आरंभ’ नावाच्या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद व दिग्दर्शन त्यांनी केले. तेथून त्यांचा दिग्दर्शनाचा प्रवास सुरू झाला. तो त्यांच्या दिग्दर्शनातला टर्निंग पॉइंट ठरला. नंतर ‘एक होती वादी’, ‘रामचंद्र पुरुषोत्तम जोशी’, ‘एन्काऊंटर’, ‘यह है जिंदगी’, ‘चीटर’, ‘सीनिअर सिटिझन’ व एका गुजराती चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले. स्टोरी बोर्ड लिहिणारे ते एकमेव दिग्दर्शक आहेत. स्केचेस तयार करणारे देखील ते एकटेच दिग्दर्शक आहेत. त्यांना जगातला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक बनायचे आहे. त्यांना जगातली सर्वोत्कृष्ट कलाकृती तयार करायची आहे. जोहान्सबर्गमध्ये आईफा अॅवॉर्डसाठी त्यांना ‘एन्काऊंटर’ चित्रपटासाठी पाच नॉमिनेशन्स होती. ते एकमेव मराठी दिग्दर्शक होते, ज्यांना बेस्ट प्रोड्यूसर, बेस्ट स्टोरी, बेस्ट स्क्रीनप्ले, बेस्ट डायलॉग्ज, बेस्ट डिरेक्शन असे नॉमिनेशन होते. प्रेक्षकांना सकस व सर्वोत्तम कलाकृती देण्याची त्यांची धडपड खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या भविष्यातील कलाकृतीस व वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -