शून्यातून स्वत:च्या कर्तृत्वातून विलोभनीय असे विश्व निर्माण करणे, हे येड्यागबाळ्याचे काम नव्हे… त्यासाठी प्रचंड आत्मविश्वास, अथक मेहनत, चिकाटी, चौफेर अवलोकन, निरीक्षण, तल्लख बुद्धिमत्ता, भाषांवर प्रभुत्व, शब्द संचय आदी सर्वगुण संपन्नता असेल तर काय होऊ शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रसिद्ध रेडिओ उद्घोषक, रेडिओ निवेदक अमीन सायानी हे होय. अमीन सायानी यांनी आपल्या जादूई आवाजाने देश-विदेशातील रेडिओ श्रोत्यांच्या मनावर अनेक दशके अधिराज्य गाजविले. तो काळ असा होता जेव्हा रेडिओशिवाय अन्य कोणतेही मनोरंजनाचे साधन उपलब्ध नव्हते.
जगात जे काही घडेल ते कळायचे असेल, कळवायचे असेल, दूरदूरपर्यंत पोहोचवायचे असेल तर रेडिओ हे एकमेव साधन तेव्हा उपलब्ध होते. आता जसे गरीब, श्रीमंत अशा सर्वांच्या घरी, गल्लोगल्ली, वेगवेगळ्या स्वरूपातील टीव्ही संच उपलब्ध आहेत तसे त्याकाळी रेडिओचे संच काही मोजक्या लोकांकडेच असायचे. त्यामुळे त्यावरून प्रसारित होणारे कार्यक्रम केवळ ऐकण्यासाठी ‘जीवाचे कान’ करावे लागायचे. अशा दिवसांत एखादा कार्यक्रम केवळ रेडिओवरून प्रसारित होतो आणि देशभरातच नव्हे तर जगभरात प्रचंड लोकप्रिय होतो, तोही ४२ तब्बल वर्षे चालतो आणि यशाचे सर्व विक्रम मोडीत काढतो ही बाब म्हणजे आश्चर्यच म्हणायला हवे. देश स्वतंत्र झाल्यावर हिंदी चित्रपटसृष्टीही बहरायला लागली होती.
हिंदी सिनेमे आणि त्यातील नट – नट्यांची गाणी तासन् तास ऐकणे हा त्याकाळी लोकांचा आवडता फंडा होता. या अशाच हिंदी लोकप्रिय चित्रपट आणि त्यातील गाण्यांचा अनोख्या शैलीत परामर्ष घेणारा कार्यक्रम सायानी यांनी तयार केला आणि तो सादर होताच सर्वांना भावला. रेडिओवर वर्षोनुवर्षे चाललेल्या ‘बिनाका गीतमाला’ या त्यांच्या हिंदी चित्रपट गाण्यांच्या कार्यक्रमाने सर्वांनाच वेड लावले होते. हा मधाळ, रसाळ कधी कधी घायाळ करणारा आवाज ज्यांचा होता ते अमीन सायानी हे लोकांना फारसे दिसले नसतील, पण त्यांचा आवाज मात्र घराघरांत पोहोचला होता आणि तो आवाजच सर्वांना आपलासा वाटू लागला होता. अमीन सायानी यांना ऐकण्यासाठी त्यांचे चाहते दर आठवड्याला वाट पाहायचे.
‘गीतमाला’मुळे सायानी हे भारतातील सर्वात पहिले होस्ट बनले होते. त्यांनी हा संपूर्ण शो सादर केला व या शोच्या माध्यमातून रेडिओ जगतामध्ये वेगळेच स्थान निर्माण केले होते. रेडिओवर १९५२ साली सुरू झालेल्या ‘गीतमाला’ या कार्यक्रमाने अमीन सायानी यांना प्रसिद्धीची शिखरावर नेऊन ठेवले. या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी होती की, रेडिओच्या ऑफिसमध्ये अमीन सायानी यांच्यासाठी दर आठवड्याला जवळपास ६५ हजार पत्रे यायची. या गाण्याच्या कार्यक्रमात सुरुवातीला फक्त ७ गाणी ऐकविली जायची. ही संख्या नंतर १६ पर्यंत वाढविण्यात आली. त्यावेळी अमीन सायानी दिवसाला बारा-बारा तास काम करायचे. त्या दिवसांची आठवण सांगताना त्यांच्या मुलाने, घरच्यांनी सांगितले की, रविवार सोडून वडील आपल्याला कधीच भेटायचे नाहीत. ते त्यांच्या स्टुडिओमध्ये सतत कामात असायचे.
कोणीही वक्ता आपल्या भाषणाच्या किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘भाईयों और बहनों’ अशी आर्जव करून श्रोत्यांना अापलेसे करतो. पण या नेहमीच्या ओळींविरुद्ध जात ‘बहनों और भाईयों’ असे म्हणत स्वत:ची आगळी-वेगळी शैली त्या काळात त्यांनी खूप प्रसिद्ध केली आणि ती त्यांची जणू ओळखच बनली होती. ‘बिना का गीतमाला’ या कार्यक्रमाची सुरुवात ते आपल्या अनोख्या अंदाजात करायचे.
‘बहनों और भाईयों…’ हा अगदी प्रेमळ अंदाजातील त्यांचा तो आवाज मनामनांत घर करून राहिला आहे. त्यांनी ‘बहनों और भाईयो, अगली पायदानपें है ये गाना…’ असे म्हणत अनेक वर्षे रेडिओवर बिनाका गीतमाला सादर केली. शैलीदार आणि रसाळ निवेदनाने ते संगीतप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनले. त्यांनी केवळ निवेदन केले नाही तर अनेक गायक, गीतकार संगीतकार यांना मुलाखतीच्या निमित्ताने बोलते करून त्यांच्या गाण्यांचा सृजनशील प्रवास ध्वनिमुद्रित केला. मुंबईत १९३२ साली जन्मलेल्या सायानी यांनी इंग्रजी भाषेत उद्घोषक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी हिंदी भाषेत निवेदन करण्यास सुरुवात केली. आपल्या गोड आवाजात अस्खलित आणि सोप्या हिंदी भाषेत निवेदन आणि गाण्यांचे किस्से ऐकवत ‘बिनाका गीतमाला’ हा कार्यक्रम लोकप्रिय केला.
रेडिओवरील सायानी यांची अफाट लोकप्रियता पाहून त्या काळातले मोठ-मोठे, लोकप्रिय सिने अभिनेता आणि अभिनेत्री त्यांच्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आसुसलेले असायचे. अशा अनेक कलाकारांच्या त्यांनी रेडिओसाठी मुलाखती घेतलेल्या आहेत. रेडिओ सिलोन आणि विविध भारती चॅनलवरील ‘बिनाका गीतमाला’ या त्यांच्या कार्यक्रमाने तेव्हाचे लोकप्रियतेचे सर्व मापदंड मोडीत काढले होते. प्रत्येक आठवड्याला रेडिओप्रेमी त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आसुसलेल असायचे. ‘मैं समय हूँ…’ हा प्रचंड गाजलेल्या ‘महाभारत’ या मालिकेतील त्यांचा आवाज आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
सायानी यांच्या नावावर तब्बल ५४ हजारांपेक्षा जास्त रेडिओ कार्यक्रमांची निर्मिती/ कम्पेअर/ व्हॉईसओव्हर करण्याचा विक्रम आहे. जवळपास १९००० जिंगल्सना त्यांनी आपला आवाज दिला आहे. यासाठी त्यांच्या नावाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. त्यांनी भूत बंगला, तीन देवियाँ, कत्ल यांसारख्या चित्रपटांमध्ये अनाऊंसर म्हणून काम केले. रेडिओवर सेलिब्रिटींवर आधारित त्यांचा शो ‘एस कुमार्स का फिल्मी मुकादमा’ हा सुद्धा खूप लोकप्रिय झाला होता. आवाजाचा अनभिषिक्त सम्राट असा निवेदक पुन्हा झाला नाही. ‘या सम हाच’ अशी प्रतिभा लाभलेला ‘आवाज की दुनिया’चा मधाळ जादूगार… एक अस्सल कलावंत आज निघून गेला आहे.