मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांचे शुक्रवारी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. मध्यरात्री ३ वाजता मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना गुरुवारीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.
माजी लोकसभा अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर मुंबईमधील दादर स्मशानभूमीत आज (दि.२३) सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक पक्षांचे राजकीय नेते, शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशा विविध पदांवर काम केले आहे.
मनोहर जोशींचा जन्म २ डिसेंबर १९३७ मध्ये रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. सुसंस्कृत पण गरिब कुटुंबात जन्म झाल्यामुळे ‘कमवा आणि शिका’ या तंत्राने लहानपणापासूनच संघर्ष त्यांच्या नशीबी होता. वडिलांबरोबर भिक्षुकी करून पैसे मिळवू लागले. शिक्षणाच्या निमित्ताने मनोहर जोशी मुंबईत स्थलांतरित झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याची नोकरी मिळाली, त्यानंतर ते मुंबईत स्थायिक झाले. नंतरच्या काळात बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत काम सुरू केले. १९९५ साली राज्यात ज्यावेळी युतीची सत्ता आली, त्यावेळी मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री बनले. गेल्या काही काळापासून ते राजकारणात सक्रिय नव्हते.