पंतप्रधान मोदींनी साधला राहूल गांधींवर निशाणा
काशी (वृत्तसंस्था) : जेव्हा यूपीचे तरुण आपले भविष्य घडवत आहेत, तेव्हा हे परिवारवादी विरोध करत आहेत. काँग्रेसचे युवराज काशीच्या भूमीवर आले असून काशी आणि यूपीच्या तरुणांना व्यसनी म्हणत आहेत. जे स्वत: संवेदनशील नाहीत ते माझ्या काशीच्या मुलांना व्यसनी म्हणत आहेत. अरे परिवारवाद्यांनो तरुण यूपीचे भविष्य बदलत आहेत. आज यूपी बदलत आहे.
कौटुंबिक राजकारण आणि भ्रष्टाचाराने यूपीचा विकास रोखला असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहूल गांधींवर निशाणा साधला आहे.
वाराणसी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, पंतप्रधानांनी अमूल डेअरी प्लांटसह १३ हजारकोटी रुपयांच्या योजनांना हिरवा झेंडा दाखवला. त्यांनी प्लांटला भेट देऊन माहिती घेतली. पंतप्रधान मोदी यांनी सकाळी बीएचयूमध्ये एमपी नॉलेज स्पर्धेतील टॉपर्सना प्रमाणपत्रांचे वाटप केले. त्यांच्यासोबत फोटो काढले आणि पुढे जाण्याची प्रेरणा दिली. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी गोवर्धनपूर येथील संत रविदास मंदिरात जाऊन दर्शन आणि पूजा केली.
पंतप्रधान मोदी गुरुवारी रात्री १० वाजता विशेष विमानाने वाराणसीला पोहोचले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी वाराणसीमध्ये २५ किलोमीटरचा रोड शो केला. रात्री अकराच्या सुमारास बरेका गेस्ट हाऊसला पोहोचले. गेस्ट हाऊसमध्येच पंतप्रधानांनी रात्री मुक्काम केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वाराणसीतील जाहीर सभेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
या प्रकल्पांमुळे पूर्व उत्तर प्रदेशच्या विकासाचा मार्ग मोकळा होईल. या योजनांमुळे पूर्वेकडील भागात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील. या सर्व प्रकल्पांसाठी मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. पूर्वी बनारसला वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत होता. दिल्लीला जाण्यापेक्षा फ्लाइट पकडायला जास्त वेळ लागला. काल रात्री चालत गेलो आणि फुलवारिया फ्लायओव्हर पाहिला. आज बनारसचा वेग कितीतरी पटीने वाढत असल्याचे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
परिवारवादी लोक नेहमीच तरुण प्रतिभांना घाबरतात. संधी मिळाल्यास तरुण पुढे जातील असे त्यांना वाटते. त्यांना काशीचे नवे रूप आवडत नाही. हे घराणेशाहीप्रेमी त्यांच्या भाषणात राम मंदिराविषयी काय-काय बोलतात? त्यावरुनच त्यांची मंदिराबाबतची आस्था, प्रेम दिसत असल्याचे मोदी पंतप्रधान यावेळी म्हणाले.
पंतप्रधानांच्या प्रयत्नांतूनच यूएईमध्ये मंदिर
५०० वर्षांचा प्रभू श्रीरामांचा वनवास संपला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील जन्मभूमीत रामलल्ला प्रभूंना विराजमान केले. दूरदृष्टीने, वचनबद्धतेने राम मंदिराचा संकल्प पूर्ण झाला. अयोध्या धामासोबतच पंतप्रधान मोदी यांच्या प्रेरणेने आणि प्रयत्नांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये पहिले हिंदू मंदिर बांधण्यात आले. गेल्या आठवड्यात उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदी काशीत आले आहेत. काशी हे मंदिरांचे शहर आहे. आता जागतिक पटलावर सांस्कृतिकदृष्ट्या काशीचा प्रभाव वाढत आहे. अबुधाबीमध्ये बांधलेले मंदिर हेही याचे नवे उदाहरण आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी यावेळी नमूद केले.