Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीRajendra Patani Passed away : भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं दीर्घ आजारामुळे...

Rajendra Patani Passed away : भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं दीर्घ आजारामुळे निधन

वयाच्या ५९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

देवेंद्र फडणवीस यांनी केली श्रध्दांजली अर्पण

मुंबई : भाजपा आमदार राजेंद्र पाटणी (BJP MLA Rajendra Patni) यांचं दीर्घ आजाराने आज मुंबईत निधन झालं. वयाच्या ५९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. राजेंद्र पाटणी हे कारंजा विधानसभा (Karanja Vidhan Sabha) मतदारसंघाचे नेतृत्व करत होते. गेल्या दोन-तीन वर्षांपासून ते आजारी होते. मुंबईमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली.

राजेंद्र पाटणी यांना कोरोना काळात दोन वेळा कोरोना झाला होता. त्याच दरम्यान ते किडनी विकाराने त्रस्त होते. त्यांच्या दोनही किडण्या फेल झाल्या होत्या. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ते आजाराने त्रस्त होते. त्यानंतर त्यांना त्वचेचा कँसर झाल्याचं निदान झालं. गेल्या काही महिन्यांपासून ते रिलायन्स हॉस्पिटल मुंबई इथे उपचार घेत होते. आज सकाळी त्यांचं ९ च्या सुमारास निधन झालं. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अमित शहा (Amit Shah) यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने कुटुंबियांसह भाजपला मोठा धक्का बसला आहे.

आजच शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचं निधन झालं. त्यापाठोपाठ राजेंद्र पाटणी यांच्या निधनाचं वृत्त आल्याने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. राजेंद्र पाटणी हे सुद्धा एकेकाळचे शिवसैनिक होते. त्यांनी २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. सध्या त्यांची भाजपमध्ये सेंकड टर्म होती.

राजेंद्र पाटणी यांची कारकीर्द कशी होती?

राजेंद्र सुखानंद पाटणी हे १९९७ ते २००३ पर्यंत विधानपरिषदेचे शिवसेनेकडून आमदार होते. २००४ ते २००९ पर्यंत ते वाशीमच्या कारंजा मतदारसंघात विधानसभेमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत २०११ मध्ये त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र २०१४च्या निवडणुकीत भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले. त्यावेळी भाजपाकडून कारंजा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळाली आणि ते निवडून आले. त्यानंतर भाजपकडून त्यांना जिल्हाध्यक्षपद दिले गेले. २०१९ मध्ये ते पुन्हा कारंजा मतदारसंघात भाजप आमदार म्हणून निवडून आले.

देवेंद्र फडणवीस यांनी केली श्रध्दांजली अर्पण

देवेंद्र फडणवीस यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहित म्हटले आहे, “अत्यंत दुःखद बातमी: विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणीजी यांचे आज निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली. ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला आहे. पश्चिम विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, म्हणून ते सतत आग्रही असायचे. त्यांचे निधन ही माझी वैयक्तिक हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबीयांना मिळावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ॐ शांती”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -