Tuesday, April 29, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीराजकीय

Amit Thackeray : अमित ठाकरेंनी बोलून दाखवली पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा

Amit Thackeray : अमित ठाकरेंनी बोलून दाखवली पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा

म्हणाले, 'राजसाहेबांनी आदेश दिल्यास...

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर (Savitribai Phule Pune University) धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चावेळी मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, मनविसेचे गजानन काळे, प्रशांत कनोजिया उपस्थित होते. यावेळी अमित ठाकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला व पुणे लोकसभा निवडणूक (Loksabha Election) लढवण्याची इच्छा बोलून दाखवली. राजसाहेबांनी आदेश दिला तर पुणेच काय बीडमधूनही लोकसभा निवडणूक लढवेन, असं ते म्हणाले.

अमित ठाकरे म्हणाले, मी लहानपणापासून पुण्यात नेहमी येत असतो. पुणे बदलले असून, खूप समस्या दिसून येत आहेत. राजसाहेबांनी आदेश दिला तर मी पुणे लोकसभेची निवडणूक लढवू शकतो, त्यांचा आदेश असला तर पुणे काय बीडमध्येही मी लोकसभेची निवडणूक लढवू शकतो. मात्र, मी स्वत:हून लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहण्याचा अद्याप विचार केलेला नाही’, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुढे अमित ठाकरे म्हणाले, ‘दोन पक्षांचे चार गट झाल्यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांचे प्रश्न निर्माण झाले आहेत. पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंनी सूत्रे हातात घेऊन, सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना चांगले जेवण मिळत नाही. राहायला वसतिगृह नाहीत. अनेक वर्षांपासून मराठी भाषा भवनाचे काम अपूर्ण आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय कारकिर्दीतील पहिला गुन्हा पुण्यात अंगावर घेण्याची तयारी आहे. आगामी काळात मनविसेने प्रत्येक विद्यापीठाची सिनेट निवडणूक लढवण्यासोबतच, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मोर्चे काढण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment