उदय पिंगळे, मुंबई ग्राहक पंचायत
जिओ फायनान्शिअल’ आणि ‘ब्लॅकरॉक’ यांनी स्वतंत्र ॲसेट मॅनेजमेंट कंपनी स्थापून म्युच्युअल फंड व्यवसायात पदार्पण करण्यासाठी सेबीकडे अर्ज केला, तो मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. ‘जिओ फायनान्शियल’ ही रिलायन्स इंडस्ट्रीजपासून वेगळी झालेली फायनान्स कंपनी आहे. शेअरबाजारात तिची स्वतंत्र कंपनी म्हणून नोंदणी होऊन तेथे व्यवहार होत आहेत. ‘ब्लॅकरॉक’ ही ‘ब्लॅकरॉक इंटरनॅशनल अमेरिका’ यांची भारतात गुंतवणूक करणारी उपकंपनी आहे. यापूर्वी ते डीएसपी म्युच्युअल फंडाबरोवर संयुक्तपणे कार्यरत होते. पाच वर्षांपूर्वी डीएसपी बरोबरची भागीदारी त्यांनी काढून घेतली. आता रिलायन्स बरोबरील संयुक्त कंपनीत दोन्ही कंपन्या प्रत्येकी १५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे व्यावसायिक उद्दिष्ट ठेवत आहेत. त्यामुळे ब्लॅकरॉकचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे गुंतवणूक व्यवस्थापन, जोखीम व्यवस्थापन, कल्पक उत्पादन, बाजारातील तंत्रज्ञान, सखोल कौशल्य याचबरोबर जिओचे स्थानिक बाजारज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा, मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे उपलब्ध असलेली ग्राहकांची माहिती यामुळे या क्षेत्रात दबदबा निर्माण करण्यासाठी ते सज्ज आहेत.
‘ब्लॅकरॉक’ जगातील सर्वात मोठी ॲसेट मॅनेजर कंपनी आहे. कंपनीचा जन्म अमेरिकेत झाला. कंपनीकडे असलेल्या ॲसेटचे मूल्य दहा ट्रिलियन डॉलर इतकं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात अकरा टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा आकडा भारतीय जीडीपीच्या अडीचपट तर अमेरिकन जीडीपीच्या निम्मा आहे. जगातील एकूण शेअर्स आणि बॉण्ड्सच्या दहा टक्के भाग हीच कंपनी सांभाळते. त्यामुळे ती जगातील सर्वात मोठी शॅडो बँक आहे.
ॲपलमध्ये ब्लॅकरॉकचा ६.५ टक्के, फोर्डमध्ये ७.२ टक्के, फेसबुकमध्ये ६.५ टक्के, जेपी मॉर्गनमध्ये ६.५ टक्के, डॉएश बँकेत ४.८ टक्के, गुगलची पॅरेंट कंपनी असलेल्या अल्फाबेटमध्ये ४.५ टक्के हिस्सा आहे. भारतातील अनेक बड्या कंपन्यांमध्येही कंपनीचा हिस्सा आहे. या कंपनीची स्थापना लॅरी फिंक यांनी सन १९८८ मध्ये केली. फिंक हे या कंपनीचे सीईओ आणि चेअरमन आहेत. त्यांनी पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास केला. मात्र शेअर मार्केटमधील कमाईमुळे ते या क्षेत्रात आले. वयाच्या २३व्या वर्षापासून त्यांनी बोस्टन डायनॅमिक्समधून कारकिर्दीला सुरुवात केली.
डेट सिंडिकेशनची सुरुवात करण्याचे श्रेय फिंक यांना दिले जाते. ३१ व्या वर्षी ते बँकेचे एमडी झाले. वर्षभरात त्यांनी बँकेला एक अब्ज डॉलर कमावून दिले. त्यातून वाढलेल्या आत्मविश्वासाने फिंक यांनी अधिक जोखीम घेण्यास सुरुवात केली. एका तिमाहीत बँकेला दहा कोटी डॉलरचे नुकसान झाल्याने बँकेने त्यांना नारळ दिला. त्यानंतर त्यांनी वयाच्या ३५ व्या वर्षी स्वत:ची कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. ‘सर्वोत्कृष्ट व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा वापर’ हे कंपनीचे मुख्य सूत्र होते. नामांकित गुंतवणूकदार स्टिव्ह स्वार्जमन यांनी त्यांना साथ दिली. सुरुवातीला त्यांनी रोखे बाजारावर लक्ष केंद्रित केले. विस्तृत डाटाचा क्षणाक्षणाला बाजारभावावर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास केला. विविध घटकांचा शेअर्स आणि बॉण्डसवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला.
स्टिव्ह यांची कंपनी ब्लॅकस्टोननं फिंक यांच्यासोबत केली. पन्नास लाख डॉलरची गुंतवणूक केली. फिंक यांच्याकडे काही ॲसेट सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली. फिंक यांनी जबाबदारी उत्तम पार पाडली. त्यानंतर पाच वर्षांत कंपनीकडे असलेल्या असेटचे प्रमाण वीस अब्ज डॉलरवर गेले. या काळात त्यांनी मेरिन लिंचवर ताबा मिळवला, बर्कलेचे एक युनिट ताब्यात घेऊन इटीएफ व्यवहारात प्रवेश केला. फिंक यांनी चीनमध्ये येऊ नये म्हणून तिथल्या सरकारने बरेच प्रयत्न केले. मात्र चिनी सरकार त्यांना रोखू शकले नाही. यावरून त्यांच्या आर्थिक ताकदीचा अंदाज बांधता येईल. ब्लॅकरॉककडे ‘ॲसेट, लियाबलिटी, डेट अँड डिरिव्हेटिव नेटवर्क’ हा ‘अल्लाउद्दीन’चा जादूचा दिवा आहे.
मुकेश अंबानींच्या रिलायन्सची घोडदौड ही अशीच चालू आहे. ते जो व्यवसाय करतील त्यात मोठा ठसा नक्की उमटवतील हे आता आपल्याला माहीत झाले आहे. यापूर्वी जिओने टेलिकॉम क्षेत्रात क्रांती घडवली. एखाद्या उद्योगात प्रवेश करून कबुतराचे गरुड बनावे असे हे क्षेत्र त्यांनी काबीज केले आहे. त्यामुळे आता रिलायन्सच्या म्युच्युअल फंड उद्योगातील प्रवेशाने कोणते बदल होतील यावर अभ्यासक लक्ष ठेवून आहेत. ॲसेट मॅनेजमेंट कंपनीने व्यवसाय करण्यास अर्ज केल्यापासून मंजुरी मिळवून विविध योजना विक्रीसाठी आणण्यास साधारण वर्षभराचा काळ लागेल. जिओकडे असलेली मार्केटिंग ताकद खूप मोठी आहे. ४५ कोटी टेलिफोन वापरकर्ते आणि देशभरात १८००० हून अधिक स्टोअर्स हे त्याचे बलस्थान आहे. त्यामुळे यापुढे नेमके काय होईल? खरे तर हे कोणीच सांगू शकत नाही. पण ज्या पद्धतीने ‘कर लो दुनिया मुठ्ठीमें’ म्हणत टेलिकॉम क्षेत्र काबीज केले त्यासारखे सोपे निश्चित नाही, त्याची कारणे अशी :
- आधीच या क्षेत्रात बऱ्यापैकी म्हणजे ४५ प्रतिस्पर्धी आहेत. त्यातील ८/१० तगडे असले तरी अन्य प्रतिस्पर्धी
टिकून आहेत. - फंडकडे येणारी मालमत्ता ही प्रामुख्याने फंड मॅनेजर कोण आहे आणि योजनेची भूतकाळातील कामगिरी पाहूनच वाढत असते. त्यामुळेच त्यांच्याकडे स्टार फंड मॅनेजर असायला हवा.
- नवीन व्यक्तीही हे काम करू शकेल, पण त्याचे कर्तृत्व सिद्ध होण्यास जो कालावधी जाईल तो व्यवसायाच्या दृष्टीने जास्त असल्याने संयुक्त कंपनीचे व्यवस्थापन त्यास तयार असेल असे वाटत नाही. त्याचा व्यवसायातील ‘ना नफा ना तोटा’ (ब्रेक इव्हन) कालावधी हा नक्कीच अलीकडील असेल.
या क्षेत्रात व्यवस्थापन खर्च कमीतकमी ठेवणे हे आधीच सर्व खर्च किमान पातळीवर असल्याने कठीण आहे. त्यामुळे केवळ खर्च कमीतकमी ठेवला असलेल्या अनेक फंडहाऊसमध्ये अजून एकाची भर पडेल. सेबीला चकवून ते गुंतवणूकदारांना मोफत ऑफरची भुरळ घालू शकत नाहीत किंवा मोठमोठ्या जाहिरातीही करू शकत नाहीत.
आज तरी हे काम आव्हानात्मक वाटत आहे, पण ब्लॅकरॉकसोबत असलेली भागीदारी गुंतवणूक व्यवस्थापन क्षेत्रातील अत्यानुधिक दालन गुंतवणूकदारांना खुले करत आहे. रिलायन्ससाठी अल्लाउद्दीनचा हा दिवा काय काय जादू करतो ते येणारा काळच ठरवेल. (हा लेख गुंतवणूक शिफारस करीत नाही)
[email protected]