अहमदनगर : लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) बिगुल लवकरच वाजणार आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. यात वंचित बहुजन आघाडीलाही सहभागी करून घेतल्याचे सांगण्यात आले आहे. पण वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मात्र वंचित बहुजन आघाडीला अजूनही महाविकास आघाडीत सहभागी करून घेतलेले नाही, आम्ही वाट पाहत आहोत, असे खळबळजनक वक्तव्य अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अहमदनगरमध्ये केले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, आधी शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात जागावाटप होईल. त्यानंतर आम्हाला पाहिजे असलेल्या जागांसाठी आम्ही तिन्ही पक्षांशी स्वतंत्र चर्चा करू. या पक्षांचे आपापसातील जागावाटप होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करू शकत नाही. त्यामुळे आम्ही सध्या थांबलो आहोत. आम्हाला ज्या जागा हव्या आहेत. त्या ठिकाणी सध्या आम्ही सभा, मेळावे घेत आहोत. राज्यातील ४८ जागांपैकी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांच्याकडे असलेल्या २८ जागांचे वाटप होईल. त्यानंतर आम्ही तिन्ही पक्षांबरोबर चर्चा करू, असे आंबेडकर म्हणाले.
नगर जिल्ह्यातील शिर्डीच्या जागेवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही दावा केला आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीची जिल्हा कार्यकारिणी आग्रही आहे. मात्र या जागेवर निवडणूक लढवण्यास मी इच्छुक नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट सांगितले. तरी देखील या जागेसाठी आम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर चर्चा करू. मिळाली तर ठीक, नाही मिळाली तर नाही, असेही आंबेडकर म्हणाले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांत बैठका होत आहेत. चर्चा सुरू आहेत. काही जागांवरून अडचणी निर्माण होत आहेत. २०१९ च्या निवडणुकीत ज्या जिंकल्या तितक्या जागांची मागणी ठाकरे गटाकडून केली जात आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्याने त्यांची राजकीय ताकद देखिल कमी झाली आहे. काँग्रेसलाही धक्के बसले आहेत. अशा परिस्थितीत जागवाटप कसे होणार, कुणाला किती जागा मिळणार आणि मग त्यात वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय असेल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.