Tuesday, July 16, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीSwami Samartha : भक्ताला न्याय मिळाला

Swami Samartha : भक्ताला न्याय मिळाला

  • समर्थ कृपा : विलास खानोलकर

श्री स्वामी समर्थ भक्तांचे तारणहार होते. आपल्या भक्तांचा त्यांना फार कळवळा होता. एरवी शांत राहणारे स्वामी वेळ पडल्यावर कठोर आणि तापट होत असत. एकदा जर का ते रागावले, तर त्यांच्यासमोर भल्याभल्यांचा थरकाप व्हायचा.

माऊलींना अन्याय कधीच सहन व्हायचा नाही. अन्याय बघून ते चिडून जात असत. ते सत्यप्रिय होते. एकदा अशीच एक घटना घडली आणि लोकांना स्वामींच्या न्यायप्रियतेची प्रचिती आली.

अक्कलकोटवर राजे मालोजीरावांचे राज्य होते. ते जरी राजे असले, तरी ते स्वामींचे एकनिष्ठ भक्त होते. स्वामी श्री गुरुदेव दत्तांचे अवतार आहेत, हे राजे जाणत होते. राजे मालोजीरावांच्या पदरी मुख्य खजिन्यात नथोबा नावाचा एक माणूस नोकरीला होता. तो रोखपाल होता. किरकोळ देण्या-घेण्याचे व्यवहार तोच बघत असे. तोसुद्धा श्री स्वामींचा भक्त होता. श्री स्वामींचे दर्शन घेतल्याशिवाय तो कामावर जात नसे.

नथोबा अत्यंत प्रामाणिक होता. इकडचा पैसा तिकडे कधी त्याने केला नाही. स्वभावाने मनमिळावू असल्यामुळे तो सर्वांना आवडायचा; परंतु म्हणतात ना, चांगल्या माणसाला देखील शत्रू असतात! तसे नथोबालाही काही हितशत्रू होते. नथोबाची मानाची जागा आपल्याला मिळावी अशी त्यांची इच्छा होती. त्या दृष्टीने ते प्रयत्न करत होते.

एकदा त्यांनी खजिन्याच्या कार्यालयातील काही लोकांना हाताशी धरून काही पैसे लपविले. एवढे सारे झाल्यावर त्यांनी राजाकडे नथोबानेच खजिन्यातून काही पैसे लांबविल्याची तक्रार नोंदविली.

राजांनी लगेच तपास करायची आज्ञा दिली. तेव्हा तपासात खजिन्यात रक्कम कमी असल्याचे आढळून आले. ते बघून राजाने नथोबाला नोकरीवरून कमी केले. यानंतर तक्रारदारांनी पैसे खजिन्यात पुन्हा ठेवले. आपला दोष नसून आपल्याला शिक्षा मिळाली याचे नथोबाला फार वाईट वाटले. त्याच्यासमोर पोटापाण्याचा प्रश्न उभा राहिला.

एकदा नथोबाने आपले गाऱ्हाणे माऊलींजवळ मांडले. त्यावर स्वामी काहीच बोलले नाहीत. गुरुवारी मालोजीराजे स्वामींच्या दर्शनाला आले, तेव्हा मात्र स्वामींचा राग अनावर झाला. राजाला खडसावून स्वामी म्हणाले की, “राजे, खजिना कसा मोजतात ते तुला शिकवू काय? जर राजाला खरा गुन्हेगार शोधता येत नसेल आणि प्रामाणिक माणसावर अन्याय होत असेल, तर अशा राजाला खरेच राजा म्हणावे काय?”

राजाच्या मनाला स्वामींचे बोलणे खूप लागले. तो खजिल झाला. त्याने राजवाड्यावर जाऊन खजिन्याची तपासणी करणाऱ्यांची हजेरी घेतली आणि पुन्हा खजिना मोजायला लावला. तेव्हा खजिना बरोबर भरला. एक पैसाही कमी नव्हता. राजाने मग नथोबाला सन्मानाने कामावर परत बोलावले. नथोबाला न्याय मिळाला.

vilaskhanolkardo@gmail.com

स्वामी समर्थ करिती समर्थ

जेव्हा आलास तू या जगात
काय आणलेस तू या जगात ||१||
तरी हसत स्वागत झाले जगात
आता राहा चांगलेच वागत ||२||
तुझसाठी मी उगवली झाडे
सावली दिली वृक्ष ताडमाडे ||३||
चंद्रकला माझ्या प्रभाने वाढे
धावती सूर्याचे रथ साथ घोडे ||४||
आम्रतरूवर गानकोकिळा दौडे
काजू, फणस, बोरे झपाझप वाढे ||५||
गुलाबी सुगंधाने फुलपाखरे दौडे
मोगरा, जाई, जुई, भुंगा तेथे दौडे ||६||
श्री गणेश आवरे पृथ्वी आपुल्या सोंडे
शंकराचे तांडव पार्वतीस आवडे ||७||
दत्तात्रयाला गाय फार आवडे
साईला भक्त फार आवडे ||८||
नवनाथांना कानिफनाथ आवडे
ज्ञानेश्वरांना निवृत्तिनाथ आवडे ||९||
शिष्य चोळप्पाही मज आवडे
प्रेमळ बाळाप्पाही फारच आवडे ||१०||
स्वामीसूत भक्तांना आवडे
केळकरांची बखर आवडे ||११|
मुळेकरांचे कथन आवडे
अमरचे स्वामी चरित्र आवडे ||१२||
विलासाची स्वामी चालिसा आवडे
खानोलकरांची गाणी आवडे ||१३||
साधे सरळ भक्त आवडे
गरीब भुजंग भक्त आवडे ||१४||
पेहलवान कानफाट्या आवडे
हजारो भक्त-भक्ती आवडे ||१५||
टोळकर होळकर राजा आवडे
लाखो भक्तांची भक्तीच आवडे ||१६||
साऱ्या भारतभूवर माझाच विचार
माझ्या भक्तीचा जगभर प्रसार ||१७||

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -