संगमनेर मध्ये संतापाची लाट; स्थानिक आंदोलकांना पोलिसांच्या गराड्याने रोखले
संगमनेर : म्हाळुंगी नदीवर होणारा पूल विखे थोरात यांच्यातील राजकीय शीत युद्धाच्या कचाट्यात सापडला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते घाईघाईत होणारे भूमिपूजन स्थानिक नागरिकांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे चर्चेत आले आहे. या पुलाचे भूमिपूजन मंत्री विखे यांच्या हस्ते होऊ नये म्हणून आज संगमनेर मधील स्थानिक रहिवाशांनी प्रचंड विरोध केला. हा विरोध रोखण्यासाठी पोलीस व प्रशासनाने अनेक स्थानिक रहिवाशांना रोखले व त्यामुळे संगमनेर मध्ये संतापाची लाट निर्माण झाली. परिणामी मंत्री विखे व सत्ताधारी भाजपचे कार्यकर्ते यांना नामुष्की पत्करावी लागली.
ऑक्टोबर २२ मध्ये म्हाळुंगी नदीला आलेल्या पुरामुळे हा पूल खचला होता. यानंतर तातडीने काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक रहिवाशांना ये-जा करण्यासाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती. याचबरोबर आमदार थोरात यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे या पुलाच्या निधी करता साडेचार कोटी रुपयांची मागणी केली आणि तो निधी मंजूरही झाला होता. मात्र पुलावरून राजकारण करण्यासाठी मंत्री विखे यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी महसूल मंत्री विखे यांच्या मार्फत निधी अडवून नागरिकांना वेठीस धरले.
मागील अडीच वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नसल्याने नगर परिषदेवर प्रशासक आहे. आणि प्रशासक हे पालकमंत्री विखे यांच्या नियंत्रणाखाली आहे. या कामाच्या वर्क ऑर्डरला सुद्धा स्टे देण्यासाठी प्रयत्न झाला आहे, असा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे.
हा पूल तातडीने व्हावा यासाठी स्थानिक नागरिकांनी मागील एक महिन्यापासून आंदोलन सुरू केले आहे. अनेक वेळा मोर्चा काढून निवेदने दिली. मात्र हा पूल अडवून धरण्याचे कारण नागरिकांच्या एक-दोन दिवसांपूर्वी लक्षात आले. भाजप नेत्यांना याचे श्रेय घ्यायचे आहे हे ओळखून स्थानिकांनी याला विरोध केला. त्यामुळे पोलीस प्रशासनाने उपोषण करत असलेल्या कार्यकर्त्यांना तेथून हटवले. तरीही भूमिपूजनाच्या वेळेस अनेक स्थानिक महिला त्या ठिकाणी आल्या. सर्व स्थानिक महिला व कार्यकर्ते यांना पोलिसांच्या गराड्याने रोखून धरले. हे कार्यकर्ते मंत्री विखे यांना निवेदन देण्यासाठी जाणार होते. आंदोलन करणाऱ्यांना भूमिपूजनासाठी का बोलावले नाही असा सवाल विचारणार होते. मात्र प्रशासनाने त्यांचे न ऐकता त्यांना अडवून ठेवले. यामुळे संगमनेर मध्ये संतापाची लाट पसरली.महिला व स्थानिक कार्यकर्त्यांना रोखून धरल्याची बातमी पसरतात मंत्री विखे व त्यांच्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम आटोपता घेण्याची नामुष्की पत्करावी लागली.
स्थानिकांचं म्हणणं काय?
यावेळी अमोल डुकरे म्हणाले की, ऑक्टोबर २२ मध्ये पूल खचल्यानंतर एकदाही विखे पाटील या ठिकाणी आले नाहीत . त्यांना पुलाच्या बाबत काहीही माहिती नाही .आणि आज अचानक पुलाला पिताश्रींचे नाव देऊन भूमिपूजन करण्याचे कुटील कारस्थान हे न समजण्यासारखे आहे .याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत. हा सत्तेचा गैरवापर असून ही झुंडशाही आम्ही चालू देणार नाही.असा इशाराही त्यांनी दिला.
तर किरण पाटणकर म्हणाले की, ज्यांचा संबंध नाही हे लोक या ठिकाणी आले आहेत. आम्ही एक महिन्यापासून आंदोलन करत आहोत. त्यावेळेस विखे यांचा एकही पदाधिकारी इकडे फिरकला नाही. आणि आता त्यांना काय पुळका आला. आम्हाला हे भूमिपूजन मान्य नाही. आम्ही या फुलाचे नामकरण खोडून काढणार आहोत असा इशाराही त्यांनी दिला.
तर बंटी पवार, बंडू माळस, राकेश परदेशी, संकेत पाटणकर, कैलास साळुंखे, यांनीही आपल्या तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या. या घटनेमुळे साईनगर, पंपिंग स्टेशन, घोडेकर मळा, रंगार गल्ली यांसह संपूर्ण संगमनेर शहरात न केलेल्या कामाचे श्रेय लाटणाऱ्या भाजपाचे नेते व स्थानिक कार्यकर्ते यांच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे.