Wednesday, July 24, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीनिर्हेतुक कर्मात भगवंत

निर्हेतुक कर्मात भगवंत

  • अध्यात्म : ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

खरोखर, आज आपल्याला आपले अंतरंग ओळखण्याची खरी गरज आहे. सत्कर्म असो किंवा दुष्कर्म असो, हेतूवर सर्व काही अवलंबून असते. पुष्कळ पुण्यकर्मे केली आणि काही तरी विषयाचा हेतू मनात धरला, तर काय उपयोग!

काबाडकष्ट खूप केले, बायकोपोरे टाकून बाह्यांगाने कितीही केले, तरी मन जोपर्यंत तिथे नाही, तोपर्यंत राम नाही भेटणार. मनाला भगवंताची तळमळ लागली तरच त्याचा उपयोग. निर्हेतुक कर्मात भगवंत असतो, म्हणून आपली कर्मे तशी करावीत.

खरे पाहता प्रापंचिकाएवढे काबाडकष्ट साधकाला, पारमार्थिकाला नसतात. प्रपंचाच्या काबाडकष्टांपेक्षा निम्म्याने जरी भगवंताकरिता केले तरी खूप फायदा पदरात पडेल. ज्या स्थितीत भगवंताने आपल्याला ठेवले त्या परिस्थितीतून त्याला ओळखणे सहज शक्य आहे. पण आपण विषयाकडे दृष्टी ठेवून कर्मे करतो आणि भगवंत भेटत नाही म्हणून दु:खी होतो, याला काय करावे? दैत्यदानवांनी भगवंताची तपश्चर्या केली आणि समर्थांनीही केली; दानवांनी हेतू धरून केली त्यामुळे त्यांना हेतूचा, विषयाचा लाभ झाला; परंतु भगवंत अंतरला; याउलट, समर्थांना भगवंताशिवाय दुसरा कशाचाही लाभ नको होता. त्या लाभातच त्यांनी सर्वस्व मानले.

उत्कट प्रेमामुळे भगवंताचा ध्यास लागतो. भगवंताला पाहून ‘तू भेटलास, आता मला काही नको’, अशी वृत्ती झाली पाहिजे, तरच मीपणा मरेल. भगवंताचा हात तर पुढे आहेच; आपलाच हात त्याच्यापर्यंत पोहोचत नाही.

बुद्धीपेक्षा आणि पैशापेक्षा सदाचरणाचे वजन जास्त असते. सदाचरण असून भगवंताची निष्ठा असेल आणि आहे त्या परिस्थितीत समाधान ठेवण्याची सवय असेल, तर प्रापंचिक सुख लाभते. सुख हे कुठून उत्पन्न करायचे नसून ते आपल्या वृत्तीमध्येच असते. ‘मी’ भगवंताचा आहे, तसेच ‘सर्वजण’ भगवंताचे आहेत, म्हणून भगवंतावर प्रेम केले की सर्व जगावर प्रेम बसेल.

ज्याप्रमाणे भगवंताच्या प्रसादामध्ये एखादा कडू बदाम आला तरी तो आपण खातो, त्याप्रमाणे भगवंताने एखाद्या वेळी दु:ख दिले, तर ते आनंदाने सोसायला पाहिजे. चिकित्सा थोडी बाजूला ठेवून भगवंताचे आपण स्मरण करावे. अंत:करणाची शुद्धी नामाशिवाय नाही होणार. नामापरते काही नाही हे एकदाच ज्याच्या मनाने घेतले त्याला दुसरे काही सांगावे लागत नाही. मीठ म्हणून जरी साखर खाल्ली तरी साखरेची गोडी आल्याशिवाय राहत नाही; त्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत जरी नाम घेतले तरी ते आपल्याला तारकच ठरेल यात शंका नाही.

तात्पर्य : ज्याच्यामागे उपासनेचा जोर आहे, तोच जगात खरे काम करतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -