माझे कोकण: संतोष वायंगणकर
उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी अशी वर्गवारी समाजामध्ये पूर्वी प्रचलित होती. ज्याची भरपूर बागायती शेती आहे, त्या मुलाला मुलगी देणे यासाठी कोणतेही आढेवेढे घेतले जात नव्हते. उलट शेतीचे उत्पन्न आणि जमीन पाहून मुलगी दिली जायची. ज्याच्या घरी वर्षभर पुरणाऱ्या धान्यासाठी केलेल्या गोणी भरलेल्या दिसल्या तर तो गावातला सर्वात सुखी आणि श्रीमंत माणूस म्हणून ओळखला जायचा. शेतीतून मिळणारे उत्पादन हेच मुळी श्रीमंती मोजण्याचे मोजमाप होते. दिवसरात्र शेतीत राबणारे कुटुंब हे गावच्या आदर्शाचे मानबिंदू असत. मनानेही ही माणसे फार श्रीमंत होती.
शेतीतूनच लागणारे भात, भाजी यांचे पीक घ्यायची, त्यातच फळलागवडही केलेली असायची. कदाचित त्या काळात लोकांकडे सोने आणि खिशात साठवलेल्या हजारो रुपयांच्या नोटा बिलकुल नव्हत्या; पण सुख-समाधान याची अजिबात कमी नव्हती. एकत्र कुटुंबातील सर्वजण आनंदी असायचे. याचे कारण कुटुंबातील ज्येष्ठांचा मान राखला जायचा. घरात कुणी वयाने मोठा असेल तर त्याच्या शब्दाबाहेर जाण्याची कोणाची हिंमत नव्हती.
एवढा प्रचंड आदरभाव कुटुंब संस्थेत होता. अर्थात जगण्याच्या गरजा एका मर्यादित होत्या. शेजारच्या घराशी, बंगल्याशी स्पर्धा करायची नव्हती. उलट शेजारधर्मच पाळायचा होता. त्या पूर्वीच्या वातावरणात कुटुंब संस्थेचे सदस्य आनंदी आणि गुण्या-गोविंदाने राहात होते. मात्र नंतर सर्व क्षेत्रांत झालेल्या बदलामध्ये शेतीचे स्थान सर्वात शेवटी गेले. नोकरीला महत्त्व आले. शासकीय नोकरीची तर मधल्याकाळात प्रचंड ‘क्रेझ’ वाढली. अगदी शिपायापासून अधिकारपदावर काम करणाऱ्या सर्वांबद्दल समाजाने त्यांना मानाचे पान दिले आणि संपूर्ण समाजाची मानसिकताच बदलली. नोकरी करणाऱ्या मुलांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले.
नोकरीतही शासकीय नोकरी, खासगी कंपन्यांमधील नोकरी अशी त्यांची वर्गवारी झाली. त्यातही ‘पॅकेज’ चा विचार करून, पाहून विवाह ठरविले जायला लागले. मुंबई, पुणे, नाशिक शहरांत मुलाचे स्वत:चे घर आहे का? कर्जाऊ घर घेतले का? आयटी कंपनीतील नोकरी कोणतीही शाश्वती नाही, तरीही पॅकेज आणि शहर याचा विचार होऊन विवाह जमविले जायला लागले. या बदलत्या समाजव्यवस्थेत सगळेच बदलले आहे. प्राधान्य क्रमात नोकरीला वरिष्ठ स्थान आहे. उद्योग-व्यवसाय करणाऱ्यालाही दुय्यम स्थान आहे आणि शेती करणारा प्रगतशील शेतकरी असता वर्षाला दहा लाखांचे उत्पन्न असलेले तरुणही वय वाढत असल्याने नाराज आहेत.
काही तरुणांनी गावात राहून मोठ्या कष्टाने शेती, बागायती उभी केली. गावात छान बंगला, दारासमोर चारचाकी, दोनचाकी आणि आधुनिक शेती क्षेत्रातील यंत्र हे सगळे काही आहे, परंतु तरीही गावातील या अशा शिक्षण घेतलेल्या तरुणांची लग्न जुळण्यात अनेक अडचणी येत आहेत. ही शेतकरी असलेल्या तरुण मुलांची समस्या कोणा एका धर्मात किंवा जातीमध्ये नाही, तर ती फार मोठी समस्या समान पातळीवर आहे. ही कॉमन समस्या आहे.
ब्राह्मण समाजातील धर्मशास्त्राचे उच्च शिक्षण घेऊन पूजाअर्चा सांगणाऱ्या तरुणांमध्येही हीच समस्या आहे. ही कोणत्या एका जाती, ज्ञातीतली समस्या नाही. याचे प्रमुख कारण समाजव्यवस्थेने, कुटुंबीयांनीही ठरवून टाकले आहे की मुलाची स्थिरता ही फक्त नोकरीमध्ये आहे. त्याचे मासिक, वार्षिक उत्पन्न किती आहे याला गौण मानले जाऊ लागले. याचे कारणही बदलती जीवनशैली, छोटी कुटुंब. यामुळे बऱ्याच वेळा विवाह जमविताना नवरा मुलगा एकटाच असेल तर त्याला प्राधान्यक्रम. म्हणजे समाजातील कुटुंब व्यवस्थेत किती बदल झाले आहेत हे सहज समजून येते. यामागे शान-शौकीन राहणीमान अशी अनेक कारणे अवती-भवती आहेत.
एकीकडे सर्वच समाजामध्ये मुलींचे प्रमाण कमी झालेले आहे. मागील वीस वर्षांत स्त्रीभ्रूण हत्या मोठ्या प्रमाणावर झाल्यात. त्यात कायदा केल्यावर याला थोड्याफार प्रमाणात आळा बसला, परंतु ही समाजातील फार मोठी गंभीर समस्या आहे. एमएस्सी, पीच.डी. ‘गोल्ड मेडॅलिस्ट’ असलेला तरुण फक्त शेतात काम करतो या अशा कारणामुळे त्याचे स्थळ नाकारले जाते. ही कुठल्या एक गाव, तालुका, जिल्ह्याचे नव्हे, तर मला वाटत कोकणाची समस्या तर आहेच; परंतु त्याचबरोबर ही महाराष्ट्राचीही समस्या आहे. यावर वैचारिक मंथन होण्याची आवश्यकता आहे.
विवाह योग्य मुलगी ही ‘कन्फ्यूज’ असते. तिच्या आयुष्यात येणारा राजपुत्र कसा असावा हे तिचे तिने स्वप्न रंगविलेले असते; परंतु होते काय की मुलीची आई मुलीच्या कन्फ्यूजनमध्ये भर घालते. हे तुला जमणारे आहे का?, एवढ्याशा उत्पन्नात तुला जमणार आहे का?, अशा अनेक प्रश्नांचा डोंगर उभा केला जातो. मग, त्या मुलीलाही काय निर्णय घ्यावा हेच कळत नसत. या अशा अनेक प्रकारच्या समस्यांच्या विळख्यात समाजव्यवस्था अडकली आहे.
आपले बालपण, आपण ज्या अर्थकारणात वाढलो त्याचे भान या सगळ्या गोष्टी आपण नजरेसमोर ठेवल्या तर मला वाटते यावर निश्चितपणे उपाय होऊ शकेल. शिक्षण घेऊन शेतीत राबून स्वत:ची आर्थिक सुबत्ता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत समाजासमोर आदर्श निर्माण केला जात असेल आणि जर तो दुर्लक्षित होत असेल, तर शेती बागायतीत दिसणाऱ्या तरुणांची संख्याही मोजकीच राहील. यासाठीच विचारमंथनाची आणि या विषयावरच्या चर्चेचीही आवश्यकता आहे.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…