Dnyaneshwari : प्रेम योग


  • ज्ञानेश्वरी : प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे


‘ज्ञानेश्वरी’ म्हणजे अमृताचा सागर होय. आपल्यास जो मनुष्य परमप्रिय असतो, त्याने आपल्याशी बोलावे आणि आपल्याकडे पाहावे, असे प्रीतीचे लक्षण आहे. विशेष म्हणजे प्रेमाची कल्पना केवळ प्रियकर - प्रेयसीपुरती मर्यादित नाही.


'भगवद्गीता’ ही अमृताची कुपी जणू, तर ‘ज्ञानेश्वरी’ म्हणजे अमृताचा सागर होय. माणूस म्हणून जीवनात यशस्वी होण्यासाठी काही गोष्टी शिकाव्या. त्याचं सुंदर सार काढून व्यासमुनींनी आपल्यापुढे ठेवलं, ते ‘गीते’च्या रूपात! या आधारे माऊलींनी आपलं अंतःकरण ओतून लिहिली ‘ज्ञानेश्वरी’. गीतेत श्रीकृष्ण - अर्जुन हे गुरू-शिष्य म्हणून येतात. ‘ज्ञानेश्वरी’त ते सखा, सोबती, प्रियकर, मार्गदर्शक म्हणूनही भेटतात. त्यांच्या नात्यातील ही अवीट गोडी किती आणि कशी चाखावी! या रसाळ नात्याचा अनुभव देणाऱ्या या ओव्या आज पाहूया.



अठरावा अध्याय म्हणजे खरं तर समारोपाचा अध्याय; परंतु इथे अर्जुन श्रीकृष्णांना पुन्हा त्याग आणि संन्यास याचं स्पष्टीकरण करण्याची विनंती करतो. असं का करतो अर्जुन? याचं उत्तर ज्ञानदेव आपल्या प्रतिभेने देतात. ते किती बहारदार!



‘एरवी त्याला देवांनी सांगितलेले तत्त्व पूर्णपणे समजले होते; परंतु देव काही न बोलता स्वस्थ बसले ते त्याला बरं वाटेना.’ ओवी क्र. ७७



‘वासराचे पोट भरल्यावरही गाईने त्यापासून दूर न व्हावे असे एकनिष्ठ प्रेमाचे लक्षण आहे.’ ओवी क्र. ७८



आपल्यास जो मनुष्य परमप्रिय असतो, त्याने काही कारण नसतानाही आपल्याशी बोलावे आणि आपल्यास पाहिल्यावरही आपल्याकडे पाहतच असावे, असे प्रीतीचे लक्षण आहे.



ओवी अशी -
तेणें काजेंवीणही बोलावें । तें देखीलें तरी पाहावें ।
भोगितां चाड दुणावे। पढियंता ठायीं॥ ओवी क्र. ७९



‘काज’ शब्दाचा अर्थ कारण, तर ‘पढियंता’ म्हणजे आवडता, लाडका होय.
‘अशी प्रेमाची जात असून पार्थ तर श्रीकृष्णांच्या प्रेमाची मूर्तीच आहे. म्हणून भगवान स्वस्थ बसल्यामुळे पार्थास अवघड वाटले.’ ओवी क्र. ८०



काय बोलावं या अप्रतिम ओव्यांविषयी! किती सुंदर चित्र साकारतात या वर्णनातून! ज्ञानदेवांचं निरीक्षण किती सूक्ष्म! त्यांचा मानवी मनाचा अभ्यास किती सखोल! अर्जुन हा श्रीकृष्णांचा शिष्य तर आहेच, त्याच वेळी तो त्यांचा लाडका, प्रेमाचा विषय आहे. अर्जुनालाही श्रीकृष्णांविषयी अपार प्रेम आहे. म्हणून त्याने प्रश्न पुन्हा विचारणं हे प्रेमापोटी घडलं आहे. हे प्रेम कसं? तर आपल्या आवडत्या माणसाने बोलत राहावं असं वाटतं; त्याने गप्प बसणं नकोसं होतं. हा अनुभव खरं तर प्रेमिकांचा. आपल्यापैकी अनेकांनी घेतलेली सुखद, सुंदर क्षणांची ही अनुभूती!



ज्ञानदेवांची प्रतिभा काय करते? तर श्रीकृष्ण-अर्जुन नात्यात हेच प्रेमाचे रंग पाहते, खुलवते. पण विशेष म्हणजे त्यांची प्रेमाची कल्पना केवळ प्रियकर-प्रेयसीपुरती मर्यादित नाही. ती आई-मूल, गाय-वासरू अशी नात्यातील वत्सलताही चित्रित करते. जसं या ठिकाणीही त्यांनी केलं आहे. वासराचं पोट भरल्यावरही गाय त्यापासून दूर होत नाही. असं एकनिष्ठ प्रेमाचं लक्षण. तेच श्रीकृष्ण-अर्जुनामध्येही घडतं. श्रीकृष्ण म्हणजे वत्सल गाय, तर अर्जुन तिचं वासरू. किती ममतेने गाय वासराला दूध पाजत असते! आणि वासरू त्याच ओढीने ते पीत असतं. त्याप्रमाणे हे ज्ञानाचं दूध श्रीकृष्ण हे अर्जुनाला देत आहेत. त्याने अर्जुनाचं पोषण होत आहे. ज्ञानाची ही भूक भागली तरीही अर्जुनाला श्रीकृष्णांपासून दूर जावंसं वाटत नाही. त्यांनी स्वस्थ, गप्प बसावं असं वाटत नाही, म्हणून तो पुन्हा एकदा शंका विचारतो.



अर्जुनाने पुन्हा एकदा शंका विचारली. ही एक घटना होय. या घटनेचा अर्थ ज्ञानदेव किती तरल मनाने लावतात! त्यातून श्रोत्यांना आनंद देतात. प्रेम या नात्याविषयी प्रगल्भ करतात. हीच तर त्यांची -
‘विश्वात्मक प्रेमाची दृष्टी
साऱ्यांवर मायेची वृष्टी...’



manisharaorane196@gmail.com

Comments
Add Comment

ज्ञानी व्हा, धन्य व्हा!

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै आज आपण ज्या विषयाला सुरुवात करत आहोत तो म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे. हा विषय सर्व

मनातील कलह

आत्मज्ञान : प्राची परचुरे वैद्य माणूस हा विचार करणारा, जाणिवा असलेला जीव आहे. त्याच्या प्रत्येक कृतीमागे,

कपिल महामुनी

भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी सांख्य तत्त्वज्ञानाचे आद्यप्रवर्तक कपिलमहामुनी होत. त्यांनी सांख्यदर्शनाचे

माँ नर्मदा...

!! नमामि देवी नर्मदे!! नर्मदा परिक्रमा म्हणजे एक अध्यात्मिक अनुभूती आहे. ही परिक्रमा म्हणजे नर्मदा मैय्याभोवती

दत्तोपासनेचे सार

ऋतुराज : ऋतुजा केळकर संध्याकाळच्या समयी मंद समईच्या उजेडात मी गुरुदेवांच्या छायेत बसून नकळत हरवून जाते. त्या

Dattatreya Jayanti 2025 : त्रिमूर्ती स्वरूप, २४ गुरूंचे ज्ञान! आदिगुरु दत्तात्रेय कोण? मार्गशीर्ष पौर्णिमेचं धार्मिक महत्त्व काय?

सनातन धर्मामध्ये दत्त जयंतीला अत्यंत विशेष आणि अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगवान दत्तात्रेयांचा जन्म मार्गशीर्ष