Saturday, June 29, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीGod : परोक्ष ज्ञानाने परमेश्वराच्या जवळ

God : परोक्ष ज्ञानाने परमेश्वराच्या जवळ

  • जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै

आज जगात दुःख आहे. जगात देव आहे की नाही हा वादाचा विषय होईल, पण जगात दुःख आहे की नाही हा वादाचा विषयच नाही. सर्व संतांनीसुद्धा हेच सांगून ठेवले आहे. “जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूचि शोधूनि पाहे”, असे म्हटलेले आहे.

दुःख सर्व ठिकाणी भरलेले आहे. कुठल्याही इस्पितळामध्ये जाऊन बघाल तर जगात किती दुःख आहे व किती प्रकारचे दुःख आहे याला तोड नाही. जगात दुःख भरलेले आहे हा आपला सर्वांचा अनुभव आहे. जगात दुःख भरलेले आहे का, याबद्दल वाद नाही. पण जगात देव आहे का? याबद्दल लोक वाद घालतील.

बहुतेक संकटे आपत्तीविपत्ती निर्माण होते त्यांपैकी ९९ टक्के दुःख निर्माण होते ते परमेश्वराबद्दलच्या अज्ञानामुळे! परमेश्वराचे ज्ञान झाले तरी, देवाचे ज्ञान झाले तरी पुरे! मी साक्षात्कार म्हणत नाही. साक्षात्कार म्हणजे दिल्ली तो बहुत दूर, पण परमेश्वराचे यथार्थ ज्ञान मिळाले तरी पुरे.

परोक्ष ज्ञान व अपरोक्ष ज्ञान असे ज्ञानाचे दोन प्रकार आहेत. अपरोक्ष ज्ञान म्हणजे साक्षात्कार, अनुभवातून व परोक्ष ज्ञान म्हणजे शाब्दिक. शब्दाने तुम्हाला सांगणे, शब्दाने तुम्हाला परमेश्वराच्या जवळ नेणे म्हणजे परोक्ष ज्ञान, ज्यासाठी सद्गुरूंचे प्रवचन नीट ऐकले पाहिजे. लोक ऐकतात पण ते कसे ऐकतात? जीवाचा कान करून ऐकत नाहीत. मी जेव्हा प्रवचन ऐकायला जायचो, तेव्हाची गोष्ट सांगतो. मी जेव्हा दुसऱ्यांची प्रवचने ऐकायला जायचो, तेव्हा प्रवचन झाल्यावर मला जर कोणी विचारले की तू कुठे आहेस? आज दिवस कोणता? तरी सांगता यायचे नाही, इतका मी ते प्रवचन तल्लीन होऊन ऐकत असे. असे तल्लीन होऊन ऐकणारे किती लोक आहेत? ऐकताना किती विचार तुमच्या मनात येतात. असे विचार मनात आले, तर तुम्हाला माझे पुढचे बोलणे ऐकता येणार नाही. पुष्कळ वेळेला होते असे की, परमेश्वर या विषयावर बोलताना आम्ही लोकांना धक्के देत देत बोलत असतो. लोकांना त्याबद्दल काहीही माहिती नसते. तेव्हा लोक असा विचार करतात की, आत्तापर्यंत जे ऐकले होते ते वेगळेच होते, हे काहीतरी नवीन सांगत आहेत. असा विचार करू लागलात की मग पुढचे प्रवचन ऐकता येत नाही व तसाच गैरसमज घेऊन घरी जाता.

सांगायचा मुद्दा असा की, परमेश्वर हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. परमेश्वराबद्दलचे जे अज्ञान आहे, त्या अज्ञानामुळेच जगात अनेक समस्या, अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. अगदी ए टू झेड समस्या या अज्ञानामुळेच निर्माण झालेल्या आहेत. म्हणूनच आत्मज्ञानी सद्गुरूंकडूनच परमेश्वराबद्दलचे योग्य ते ज्ञान मिळविणे हेच या समस्येवरचे समाधान आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -