
आता झिशान सिद्दीकी देखील घेणार काँग्रेस सोडण्याचा निर्णय?
मुंबई : मुंबईच्या वांद्रे परिसरातील मातब्बर नेत्यांपैकी एक असलेले बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांनी नुकताच काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Ajit Pawar NCP) प्रवेश केला. त्यांच्यासह त्यांचे पुत्र आणि राजकारणात प्रचंड सक्रिय असलेले झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddiqui) देखील काँग्रेस (Congress) सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, सध्या तसा कोणताही विचार नसल्याचे झिशान सिद्दीकी यांनी स्पष्ट केले होते.
असं असतानाही झिशान सिद्दीकी यांची मुंबई युथ काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्या जागी काँग्रसने अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता नाराज होऊन झिशान सिद्दीकी देखील काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतील, अशा चर्चा रंगल्या आहेत.
झिशान सिद्दीकी हे वांद्रे परिसरातील अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम या मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. झिशान हे महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांची अध्यक्षपदावरुन हकालपट्टी केल्याने आता ते नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागच्याच महिन्यात बाबा सिद्दीकींसह काँग्रेसच्या तीन महत्त्वपूर्ण नेत्यांनी महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला. मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. यानंतर आता झिशान सिद्दीकी यांनी देखील काँग्रेसला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला तर ऐन निवडणुकीच्या वेळी काँग्रेससाठी तो एक मोठा धक्का असेल.