पनवेल : महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे (Bullockcart Association) अध्यक्ष आणि ‘गोल्डमॅन’ (Goldman) अशी ओळख असलेले पंढरीनाथ फडके (Pandharinath Phadke) यांचे आज निधन झाले. पनवेलच्या विहीघरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुपारी ऑफिस वरून घरी जाताना एक-दीडच्या सुमारास कारमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. पंढरीशेठ यांच्या निधनामुळे महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेवर तसेच फडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पनवेल तालुक्यातील विहिघर येथील पंढरीनाथ फडके संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीसाठी प्रसिद्ध होते. त्यांचं नाव घेतलं की अंगावर किलोभर सोनं, गाडीच्या टपावर बसून वरात आणि बादल बैलाची क्रेझ हे सगळं चित्र डोळ्यासमोर यायचं. महाराष्ट्रात कुठेही बैलगाडा शर्यत असेल तर त्या ठिकाणी ते हजर असायचे. तसेच शर्यतीत जिंकलेले ४० हून अधिक बैल त्यांच्याकडे होते. सरकारने बैलगाडा शर्यतीवर बंदी आणल्यानंतर ती परत सुरू करावी यासाठी पंढरीनाथ फडके यांनी प्रयत्न केले होते.
१९९६ पासून वडिलांमुळे पंढरीनाथ फडकेंना बैलगाडीचा नाद लागला. शर्यत जिंकल्यावर कोंबडा किंवा मेंढा मिळायचा तरीही शर्यत जिंकायची क्रेझ वेगळी होती. तिथपासून सुरू झालेली आवड फडकेंनी जपली होती. शर्यतीत जिंकणाऱ्या बैलावर पंढरीनाथ फडके यांची नजर असायची. मग तो बैल कितीही किंमत लागली तरी ते विकत घ्यायचे. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील टॉपचा समजला जाणारा बादल बैल याने तब्बल ११ लाख रुपयांची शर्यत जिंकली होती. त्यावरून त्यांना बैलगाडा शर्यतीची आणि बैलांची किती आवड होती हे लक्षात येतं. पंढरीशेठ यांच्या जाण्याने बैलगाडा शर्यत प्रेमींना मोठा धक्का बसला आहे.