नायिकेचा चेहरा दिसताच चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ‘भुलभुलैया ३’ (Bhool Bhulaiyaa 3) या सिनेमाची चर्चा आहे. ‘भुलभुलैया २’ मध्ये न दिसलेली विद्या बालन (Vidya Balan) तिसर्या भागात दिसणार आहे. मात्र, दुसर्या भागात मुख्य नायिका म्हणून दिसलेली कियारा अडवाणी (Kiara Advani) ‘भुलभुलैया ३’ मध्ये दिसणार नाही, अशी चर्चा होती. ही चर्चा आता खरी ठरली आहे. कारण ‘भुलभुलैया ३’ मधून कियाराचा पत्ता कट झाला आहे. तिच्याऐवजी रातोरात प्रसिद्ध झालेल्या एका अभिनेत्रीला संधी मिळाली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून तृप्ती डिमरी (Tripti Dimri) आहे.
‘भुलभुलैया २’ मध्ये मुख्य भूमिकेत झळकलेला कार्तिक आर्यन (Kartik Aryan) तिसर्या भागातही झळकणार आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एका पोस्टरवर नायिकेचे केवळ हसू दिसेल अशा प्रकारचा फोटो शेअर केला होता. त्याने प्रेक्षकांना ती कोण असेल हे ओळखायला सांगितले होते. अनेकांनी तिला ओळखलेही व तेव्हाच कियाराचा पत्ता कट झाल्याचा प्रेक्षकांना अंदाज आला. यानंतर कार्तिकने पुन्हा एकदा अभिनेत्रीचे डोळे व नंतर संपूर्ण फोटो शेअर करत ती अभिनेत्री तृप्ती डिमरी असल्याचे जाहीर केले. यानंतर कार्तिकच्या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
View this post on Instagram
अनेकजण ‘भुलभुलैया ३’ मधील तृप्तीच्या एंट्रीमुळे खूश झाले आहेत. तर कियाराला बाजूला केल्यामुळे कियाराच्या अनेक चाहत्यांनी नाराजी दर्शवली आहे. असं असलं तरी कार्तिक आणि तृप्तीची केमिस्ट्री पडद्यावर चांगली दिसणार का? ‘भुलभुलैया ३’ देखील हिट ठरणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.