Tuesday, July 16, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यअभ्यासाचा अति ताण विद्यार्थ्यांसाठी जीवघेणा ठरतोय का?

अभ्यासाचा अति ताण विद्यार्थ्यांसाठी जीवघेणा ठरतोय का?

फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे

आज-काल सातत्याने आपण बघतोय की अगदी तरुण वयातील उच्च शिक्षण घेणारी मुले अभ्यास, प्रॅक्टिकल, अवघड असे अभ्यासक्रम, करिअरमधील वाढती स्पर्धा, गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी असलेल्या अत्यंत कठीण प्रवेश परीक्षा (एन्टरन्स एक्झाम), स्पर्धा परीक्षा, त्यातून परत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण होण्याचा कौटुंबिक तसेच सामाजिक दबाव, वाढत्या रोजगाराच्या समस्या यामुळे आत्महत्या करताना दिसत आहेत.

विशिष्ठ परीक्षेत ठरावीक गुण मिळालेच पाहिजेत अन्यथा चांगले कॉलेज मिळणार नाही, चांगले कॉलेज मिळाले तरी अत्यंत अवघड अभ्यासक्रम झेपलाच पाहिजे, फक्त खूप अभ्यास करून उपयोग नाही, तर भरपूर गुण मिळालेच पाहिजेत. कॅम्पस इंटरव्हूव्हमध्ये निवड पण झाली पाहिजे आणि ताबडतोब मोठ्या पॅकेजची नोकरी तर लागलीच पाहिजे, अशी मानसिकता विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच समाजाची झाली आहे. मोठमोठी शहरे शैक्षणिक हब बनून नावारूपाला येत आहेत. असंख्य क्लासेस, लायब्ररी, सर्वत्र स्टडी मटेरियल, नोट्सची मुबलक विक्री, मोठ्या जाहिराती याला आपण बळी पडतोय हे कोणीच लक्षात घेत नाही.

पालकांसाठी तर लाखो रुपये फी भरून आपले पाल्य कसे मोठ्या शहरातील मोठ्या नामांकित महाविद्यालय, संस्थेत शिकत आहे हा स्टेट्स सिम्बॉल बनला आहे. तुम्ही ज्या गावात किंवा शहरात राहता, ते छोटं आहे, साधं आहे, त्यामुळे तिथे योग्य त्या शैक्षणिक सुविधा नाहीत, अशा ठिकाणी शिकत बसणं म्हणजे कमीपणा, मठ्ठपणा, बुजरेपणा, अडाणीपणा, मागासलेपणा अशी आज-काल संकल्पना रुजू झाली आहे.

मुलांना योग्य वयात आपल्यापासून दूर शिकायला पाठवल्यावरच त्याचे नशीब फळफळणार आहे. पालकांपासून त्याची नाळ तोडल्यावरच तो नावारूपाला येऊन स्वतःला सिद्ध करू शकतो, दुसऱ्या ठिकाणी शिकला तरच आपले पाल्य नाव कमवून यशस्वी होणार आहे अशी बालिश समजूत अनेकांच्या बोलण्यातून जाणवते. सुशिक्षित, अनुभवी पालकांमध्ये सुद्धा हे वैचारिक दारिद्र्य आहे हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

मुलांना बाहेरील जगाचा अनुभव यावा, पालकांपासून दूर राहिल्यावर स्वतःच्या जबाबदाऱ्या काळाव्यात, दुनियादारी समजावी, त्याने इतर मुलांच्या तुलनेत कमी पडू नये, योग्य वयात नोकरी लागली तर उत्तम व त्याच तोलामोलाचा जोडीदार मिळेल असला काहीसा पायंडा आजकाल पडला आहे. दररोज बदलत जाणारी, नव्याने उदयाला येणारी शिक्षण प्रणाली आत्मसात केलीच पाहिजे, स्वतःला अपडेट ठेवण्याशिवाय पर्याय नाही, असे विद्यार्थ्यांना सुद्धा वाटते. या सर्व परिस्थितीमध्ये मुलांना नेमके काय हवे आहे, काय करायचे आहे, काय शिकायचे आहे, पुढे काय बनायचे आहे, त्याचे ध्येय, स्वप्न, विचार, मानसिकता, योग्यता, कुवत यांचा आपण आई – वडील म्हणून कितपत विचारात घेतो हा गंभीर प्रश्न आहे. मुलांना लाखो रुपये फी भरून नामांकित क्लासेसला पाठवणे, त्यालाच ठाऊक असलेले भरमसाट फी घेणारे कॉलेज शोधले आणि आपल्या मुलाला त्यात ढकलले की पालक म्हणून आपली जबाबदारी संपली का? बाहेरगावी राहताना त्याला हॉस्टेल अथवा रूम बघून दिली, चांगली मेस लावली, शैक्षणिक साहित्य पुरवले म्हणजेच आपण आपले कर्तव्य पार पाडले असे सुशिक्षित उचभ्रू पालकांना वाटते हे दुर्दैव आहे. आपले कर्तव्य केले; आता मुलाने संधीचे सोने करावे आणि झपाटून अभ्यास करावा ही आपली अपेक्षा आपण त्याच्यावर लादत आहोत.

पालकांनी मुलांना उच्च दर्जाचे बौद्धिक शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणे अथवा त्यांची तशी इच्छा असणे हे स्वाभाविक आहे. समाजात वावरताना आपल्याला अभिमानाने सांगता आले पाहिजे की, मुलगा, मुलगी किती यशाची शिखरे सर करत आहे. आपण जे हलाखीचे दिवस काढले किंवा पाहिले ते आम्ही मुलांच्या वाट्याला येऊ देणार नाही. आम्हाला जसे शिकायला मिळाले नाही त्याप्रमाणे आमची मुलेही वंचित राहू नयेत. मुलांनी खूप मोठे व्हावे, संघर्ष करावा, मेहनत करावी, चिकाटी आणि जिद्द ठेवावी अशी अपेक्षा पालकांना असते. अनेक गुणवंत मुले ती अपेक्षा सहजासहजी पूर्ण देखील करतात. अत्यंत कमी वयात खूप छान सेटल होतात व पालकांची स्वप्न पूर्ण करतात.

त्या मुलांचे काय ज्यांना हा सर्व डोलारा पेलणे झेपत नाही. अनेकदा प्रयत्न करूनही अपयश पदरी पडते, त्या मुलांचे काय ज्यांना आई-वडिलांनी सांगितले आहे ते करिअर करायचेच नाहीये त्यांची काही वेगळीच खासियत आहे, त्या मुलांचं काय ज्यांना खूप जीवाचं रान करून पालकांनी भरभक्कम फी भरली म्हणून आता मध्येच माघारी फिरता येत नाही, त्या मुलांचे काय ज्यांच्या मनाला सतत टोचणी लागलेली आहे ती मोठ्या फीची. पालकांनी अतोनात कष्ट करून, पैसे जमवून, कर्ज काढून, तडजोड करून फी भरली तर त्यांना कसे सांगायचे की, मला हे जमत नाही, झेपत नाही, मी दुसरा काही प्रयत्न करतो. घरातील धाक, भीती, दबदबा त्यांना मनातलं मनमोकळे बोलण्याची परवानगी देतो का? हाही तितकाच मोठा प्रश्न आहे.

सगळीच मुले अभ्यास करतात, सगळ्यांना यश येते, आज-काल अशा शिक्षण पद्धतीशिवाय पर्यायच नाही, अत्यंत महागडं उच्चशिक्षण नसेल तर नोकऱ्याच मिळत नाहीत, मुलांची लग्न जमत नाहीत. आज-काल मुलींच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत म्हणून या मार्केटमध्ये टिकण्यासाठी आपला मुलगा असो वा मुलगी या शैक्षणिक फॅक्टरीमधून निघून एक उत्तम प्रॉडक्ट बनले पाहिजे या विचाराने सगळ्या पालकांच्या डोक्यात थैमान घातले आहे. आपल्या मुलाला जीव नकोसा होईपर्यंत त्याला आपल्याला सांगावेस वाटत नाही? बोलायची हिम्मत होत नाही? लांब शिकायला गेल्यामुळे तिथून अपयश घेऊन परत गेलो तर आपली आणि पालकांची इज्जत जाईल, नाव खराब होईल म्हणून तिथेच स्वतःला संपवायचं? इतकी दहशत मुलांच्या मनात का आहे, याचा विचार होणे आवश्यक आहे.

आपल्या मुलांनी जरूर शिकावे. पण जमेल तेवढे, झेपेल तेवढे आणि आवडेल तेच. आपल्या मुलांनी पैसे कमवावेत, त्याला उत्पन्न असावे. पण त्यासाठी स्वतःच्या सर्व स्वप्नांशी त्याला तडजोड करावी लागू नये, हे विचारात घ्या. पालकांनी मुलांना एवढे नक्कीच सांगावे की जे शिकायचे जे कमवायचे आहे ते सरळ मार्गाने, प्रामाणिकपणे, कोणाला न फसवता, चुकीच्या मार्गाला न जाता, कोणाला त्रास न देता करा. पालकांच्या उत्तम संस्कारांची शिदोरी जर मुलांसोबत असेल तर आयुष्यात ते नक्कीच यशस्वी होतील, कमावते होतील, नावारूपाला येतील. आपले सुसंस्कार, योग्य लक्ष आणि मार्गदर्शन, त्यांना समजून घेण्याची वृत्ती असेल, तर मुलं तुमचं नाव काढणारच हा विश्वास पालकांनी दाखवणे आवश्यक आहे. मुलगा अथवा मुलगी आपली असली तरी ते एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. त्याला स्वतःच्या आवाडी-निवडी, अपेक्षा आहेत. ते अभ्यास करून नोकरी मिळवून पैसे कमवणारे मशीन नसून एक माणूस आहे. त्यामुळे पालकांनी आपली मुले उत्तम माणूस म्हणून कशी पुढे येतील व तशी जगतील यावर लक्ष केंद्रित करावे असे वाटतं.
meenonline@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -