Saturday, July 13, 2024
Homeताज्या घडामोडीAmeen Sayani passed away : रेडिओ जगतातील आवाजाचा जादूगार अमीन सयानी यांचं...

Ameen Sayani passed away : रेडिओ जगतातील आवाजाचा जादूगार अमीन सयानी यांचं निधन

वयाच्या ९१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : रेडिओच्या जगातील आवाजाचे जादूगार (Voice magician) अशी ओळख असणारे ज्येष्ठ रेडिओ निवेदक (Radio Announcer) अमीन सयानी (Ameen Sayani) यांचे निधन झाले आहे. रेडिओचा आवाज, रेडिओ किंग अशा अनेक उपाधींनी गौरवण्यात आलेले ते ज्येष्ठ सूत्रसंचालक, उद्धोषक होते. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी सहा वाजता त्यांना हदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तातडीने एच.आर. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान अमीन सयानी यांची प्राणज्योत मालवली. अमीन यांचा मुलगा रझील सयानी यांनी अमीन सयानी यांच्या निधनाची बातमी दिली आहे.

अमीन सयानी यांना वृद्धापकाळामुळे उच्च रक्तदाब आणि अन्य शारीरिक व्याधींनी ग्रासले होते. गेल्या १२ वर्षांपासून त्यांना पाठीच्या दुखण्याचा त्रास होता. त्यामुळे त्यांना चालताना वॉकर वापरावा लागत असे. रेडिओ सिलोन आणि विविध भारती चॅनलवरील ‘बिनाका गीतमाला’ या त्यांच्या कार्यक्रमाने तेव्हाचे लोकप्रियतेचे सर्व मापदंड मोडीत काढल होते. प्रत्येक आठवड्याला रेडिओप्रेमी त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आसुसले असायचे. अमीन सयानी यांनी जवळपास १९ हजार जिंगल्सना आवाज दिला होता. त्यांच्या या विक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये झाली होती.

रेडिओवर १९५२ साली सुरु झालेल्या ‘गीतमाला’ या कार्यक्रमाने अमीन सयानी यांना प्रसिद्धीची शिखरावर नेऊन ठेवले. या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी होती की, रेडिओच्या ऑफिसमध्ये अमीन सयानी यांच्यासाठी दर आठवड्याला जवळपास ६५ हजार पत्रं यायची. या गाण्याच्या कार्यक्रमात सुरुवातीला फक्त ७ गाणी होती. ही संख्या नंतर १६ पर्यंत वाढवण्यात आली. त्यावेळी अमीन सयानी दिवसाला १२ तास काम करायचे. त्या दिवसांची आठवण सांगताना अमीन सयानी यांच्या मुलाने सांगितले की, रविवार सोडून मला वडील कधीच भेटायचे नाहीत. ते त्यांच्या स्टुडिओमध्ये कामात असायचे.

बहनों और भाईयो आप सुन रहे है…

लतादीदींच्या ‘मेरी आवाज ही पहचान है’ या गाण्याप्रमाणे काही माणसे ही त्यांच्या आवाजाने मनात कायमचं घर करुन जातात. एकेकाळी घराघरात ऐकल्या जाणार्‍या रेडिओमुळे काही आवाज सर्वांनाच सुपरिचित होते. असाच एक आवाज म्हणजे ज्येष्ठ रेडिओ निवेदक अमीन सयानी यांचा. त्यांच्या खास आवाजातील ‘बहनों और भाईयो आप सुन रहे है…’ ही वाक्य आजही सिने रसिक, रेडिओ प्रेमींच्या मनात घर करुन आहेत. त्यांच्या अशा अकाली निधनाने संबंध रेडिओप्रेमींवर शोककळा पसरली आहे. अमीन सयानी यांच्यावर २२ फेब्रुवारी रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -