
मुंबई: बारावी इयत्तेच्या बोर्डाच्या परीक्षेला आज बुधवारपासून सुरूवात आहे. राज्यातील १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. या परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार घडू नयेत यासाठी परीक्षा केंद्रांच्या ठिकाणी भरारी पथक नेमण्यात आली आहेत.
यंदाची बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान होणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ऑनलाईन पद्धतीने भरून घेतले जातील. राज्यात विज्ञान शाखेसाठी ७ लाख ६० हजार ४६ विद्यार्थी, कला शाखेसाठी ३ लाख ८१ हजार ९८२ विद्यार्थी, वाणिज्य शाखेसाठी ३ लाख २९ हजार ९०५ विद्यार्थी, व्यवसायिक अभ्यासक्रमांसाठी ३७ हजार २२६ विद्यार्थी, आयटीआयसाठी ४ हजार ७५० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.
अर्धा तास आधी उपस्थित रहा
परीक्षेसाठी किमान अर्धा तास आधी उपस्थित रहावे. पेपर सुरू झाल्यानंतर दहा मिनिटांनी विद्यार्थी आल्यास त्याला परीक्षेला बसू दिले जाणार नाही.
विद्यार्थ्यांना शेवटी दहा मिनिटे जास्त मिळणार आहेत. त्यावेळेस आपण लिहिलेली उत्तरपत्रिकेच्या मुख्यपृष्ठावरील माहिती योग्य असल्याची खात्री करावी. तसेच उत्तरे आणि प्रश्नांचे क्रमांकही पुन्हा एकदा तपासून खात्री करून घ्यावीत.