भाईंदर : गेल्या अनेक वर्षांपासून सर्व्हेक्षण अहवालाच्या नावाखाली प्रलंबित असलेले आदिवासी समाजाचे वन हक्क दावे लवकर निकाली काढण्यासाठी मीरा रोडच्या आदिवासी समाजाने मीरा भाईंदर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ६च्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मीरा रोड येथील डोंगराळ भाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या कक्षेत येतो. डोंगराच्या पायथ्याशी मांडवी पाडा, म्हसकर पाडा, माशाचा पाडा, दाचकूल पाडा, बाभळीचा भाट, असे छोटे-मोठे १५ आदिवासी पाडे आहेत. अनेक वर्षांपासून ते या भागात वास्तव्यास असुन जंगलातून लाकडे गोळा करणे आणि शेती हे त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे.
आदिवासी पाड्यातील घराच्या जवळच असलेल्या वन विभागाच्या जागेत या समाजाच्या कुटुंबांनी शेतीचा व्यवसाय सुरू केला. काहीजण भात, पालेभाज्या, फळे याची लागवड करून आपली उपजविका करत आहेत.
आता या जागा त्यांच्या नावावर करण्यासाठी त्यांनी शासन दरबारी प्रयत्न केले. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी तहसीलदारांना या भागातील सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले होते. तलाठी विहित नमुन्यातील अर्ज भरणा करत असताना त्यांना महापालिकेतील काही नोंदी घेणे गरजेचे होते. त्यासाठी आदिवासी समाजाच्या विहित नमुन्यात काही त्रुटी असल्याने महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त यांना तहसीलदार कार्यालयात अहवाल सादर करण्यास विलंब झाला. असे ४५१ दावे प्रलंबित राहिले आहेत. ते लवकर निकाली काढण्यासाठी आदिवासी समाजाने श्रमजिवी संघटनेचे नेते सुलतान पटेल तसेच आदिवासी समाजाचे सामजिक कार्यकर्ते नरेंद्र उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका प्रभाग कार्यालय क्र. ६ वर ठिय्या आंदोलन केले.
आदिवासी समाजाने भरायच्या विहित नमुन्यातील अर्जात असलेल्या त्रुटी त्यांनी पुर्ण केल्यावर तहसीलदार कार्यालयात अहवाल सादर करण्यात येईल. – प्रभाकर म्हात्रे, सहाय्यक आयुक्त, मीरा भाईंदर मनपा.
आदिवासी समाजाने त्यांच्या काही जागा बिल्डर, राजकीय नेते यांना विकल्या आहेत. त्या परत मिळविण्या साठी प्रयत्न करावेत. तसेच आदिवासी समाजाची आर्थिक फसवणूक करणाऱ्यावर शासनाकडून कारवाई करण्यात यावी. – प्रदिप जंगम, अध्यक्ष, जिद्दी मराठा प्रतिष्ठान.