Tuesday, July 23, 2024
Homeमहत्वाची बातमीमराठा आरक्षण आंदोलनामुळे एसटीचे ७५ लाखांचे नुकसान

मराठा आरक्षण आंदोलनामुळे एसटीचे ७५ लाखांचे नुकसान

जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोकोने दोन हजार फेऱ्या रद्द

मुंबई : मराठा आरक्षणाचा ठराव राज्य विधीमंडळात मंजुर झाला असला तरी एसटी महामंडळाला या आंदोलनाची फार मोठी किंमत मोजावी लागली आहे.मराठा आरक्षणाच्या संदर्भाने मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणादरम्यान संतप्त आंदोलकांकडून जाळपोळ, दगडफेक आणि रास्ता रोको केला गेल्याने एसटी महामंडळाला जबर फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर, बुधवारपासून पुन्हा बंद केलेल्या एसटी बसेसच्या फेऱ्या पूर्ववत सुरू करण्यात आल्या असल्या तरी गेल्या आठवडाभरात एसटीच्या दोन हजारांवर फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे महामंडळाला सुमारे ७५ लाखांचे नुकसान झाले आहे.

मराठा आरक्षणाचा विषय आणि त्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीत पुन्हा जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. त्यानंतर पाच दिवसांनी उपोषणाचे पडसाद उमटायला सुरूवात झाली. मराठवाड्यात अनेक गाड्यांवर दगडफेक, तोडफोड, जाळपोळ, रस्ता रोको करण्यात आल्याने राज्यातील बहुतांश जिल्हा मुख्यालयातून मराठवाड्यात जाणाऱ्या एसटीच्या बसेस आगार प्रमुखांनी बंद केल्या.

अधिकृत माहितीनुसार, राज्यातील ३१ जिल्हा मुख्यालयाने मराठवाड्यातील विविध शहरात जाणाऱ्या एकूण २१३३ बस फेऱ्या रद्द केल्या. परिणामी एसटी महांडळाला ७४ लाख, १९ हजार, ४१४ रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, सरकारने आज मराठा समाजाला १० टक्के आरक्षण जाहिर केल्याने आंदोलन निवळले असून, संपूर्ण राज्यातील बसफेऱ्या पूर्ववत झाल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

आंदोलनाचा सर्वाधिक फटका राज्यातील एसटीच्या छत्रपती संभाजीनगर विभागाला बसला. या विभागात छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव आणि परभणी असे एसटीचे सात जिल्हा मुख्यालये आहेत. त्यातून मराठवाड्यातील विविध गाव शहरात ९,६२६ बस फेऱ्या धावतात. आंदोलनाची तीव्रता बघता खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या आठवडाभरात त्यापैकी २,०७० बसफेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या.

या आंदोलनाचा मुंबईच्या एसटी विभागाला कोणताही फटका बसला नाही. मुंबई विभागातून मराठवाड्यात ७,१३९ बसेस जातात. यापैकी सर्वच्या सर्व बसेसचे संचालन सुरळीत होते. तर, नाशिक आणि पुण्यातून अनुक्रमे १२ आणि ८ बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या दोन विभागाला क्रमश: १ लाख, ६४ हजार, ४५९ आणि १ लाख, ६ हजार, ८० रुपयांचे नुकसान झाले. नागपूरच्या २४ फेऱ्या रद्द झाल्याने सुमारे तीन लाखांचे तर अमरावतीच्या ४० बस फेऱ्या रद्द झाल्याने २.३ लाखांचे नुकसान झाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -