Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीSmile design surgery : हसणं सुंदर करण्याची शस्त्रक्रिया पडली महागात! लग्नाआधीच नवरदेवाचा...

Smile design surgery : हसणं सुंदर करण्याची शस्त्रक्रिया पडली महागात! लग्नाआधीच नवरदेवाचा मृत्यू

नेमकं काय घडलं?

हैदराबाद : आपण सुंदर (Beautiful) दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. खरं तर नैसर्गिकरित्या जे रुप आपल्याला मिळालं आहे तेच अधिक सुंदर असतं. पण आधुनिक काळात सुंदरतेच्या व्याख्येत बसण्यासाठी अनेकजण चेहऱ्यावर, शरीरावर शस्त्रक्रिया करताना दिसतात. या शस्त्रक्रिया महाग असून कधीकधी उलट परिणाम होण्याचीही शक्यता असते. मात्र, सुंदर दिसण्यासाठीच्या वेडाने झपाटलेल्या लोकांना या परिणामांची पर्वा नसते आणि ते यासाठी प्रचंड पैसे खर्च करण्यासाठी तयार असतात. अशाच प्रकारातून एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हैदराबादमधील (Hyderabad News) या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

हैदराबादमधील एका तरुणाचे लग्न ठरल्यामुळे त्याने अधिक सुंदर दिसण्यासाठी स्माईल डिझायनिंग शस्त्रक्रिया (Smile design surgery) करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या शस्त्रक्रियेदरम्यान अॅनेस्थेशियाचा ओव्हरडोस (Anesthesia overdose) झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी मृत तरुणाच्या पालकांनी क्लिनिकविरोधात तक्रार दाखल केली आहे.

लक्ष्मीनारायण विंजम असं या तरुणाचं नाव असून तो २८ वर्षांचा होता. तो हैदराबादच्या जुबली हिल्स भागात असलेल्या एफएमएस इंटरनॅशनल डेंटल क्लिनिकमध्ये गेला होता. १६ फेब्रुवारी रोजी त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

मुलावर शस्त्रक्रिया होणार असल्याची वडिलांना नव्हती कल्पना

लक्ष्मीनारायणचे वडील रामुलू विंजम यांनी सांगितले की, शस्त्रक्रियेदरम्यान माझा मुलगा बेशुद्ध झाला होता. तो काहीच हालचाल करत नसल्याने क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांनी मला बोलावले आणि त्यानंतर मी ताबडतोब दवाखान्यात धाव घेतली. आम्ही आमच्या मुलाला ताबडतोब रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. माझ्या मुलाला आरोग्याची कोणतीही समस्या नव्हती आणि त्याच्या मृत्यूला क्लिनिकमधील डॉक्टरच जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुलावर शस्त्रक्रिया होणार असल्याचे आपल्याला माहित नव्हते असंही ते म्हणाले.

पोलिसांचा तपास सुरु

या प्रकरणी क्लिनिकच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी सांगितले की, आम्ही सध्या हॉस्पिटलचे रेकॉर्ड तपासत आहोत आणि तेथील सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहोत.

काय आहे स्माईल डिझाईन सर्जरी?

स्माईल डिझाईन सर्जरी बऱ्याच काळापासून प्रचलित आहे. या अंतर्गत लोक त्यांचे दात दुरुस्त करतात आणि ते अशा प्रकारे करतात की ते हसताना चांगले दिसतात. याशिवाय दात अधिक चमकदार दिसावेत यासाठी स्वच्छतेचाही समावेश आहे. तज्ज्ञांच्या मते, मानवी दात कालांतराने सैल होतात आणि त्यांचा रंगही निखळायला लागतो. अशा स्थितीत, स्माईल डिझाइन शस्त्रक्रियेद्वारे ते योग्यरित्या बसवले जातात आणि चमकदार बनवले जातात. अशातच या तरूणाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -