मीरा रोडला शिवजयंती उत्सवातील किर्तन पोलिसांनी केले बंद
भाईंदर : मीरा भाईंदर शहराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक परिसरात मराठी एकीकरण समितीच्या वतीने साजरा होत असलेल्या शिवजन्मोत्सवात सुरू असलेले किर्तन रात्री दहा वाजल्यामुळे पोलिसांनी बंद करण्यास लावले.
मराठी एकीकरण समितीच्या वतीने मीरा रोडच्या काशिमीरा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ शिवजन्मोत्सव सोमवारी साजरा करण्यात आला. सकाळी ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून स्मारकास पुष्पहार अर्पण करण्याचा तर संध्याकाळी शिव जन्मोत्सव, शिव चरित्र चर्चा, व्याख्याने, ऐतिहासिक व्यक्तींची वेशभूषा स्पर्धा, रांगोळी, रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पण रात्रौ ठीक १० वाजता पोलीस आले आणि वेळ संपली आहे, असे सांगून किर्तन बंद करण्यास सांगितले. आयोजक व कार्यकर्त्यांनी फक्त पाच मिनिटात किर्तन पूर्ण होईल, असे सांगितले. परंतु काशीमीरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक बेलोसे यांनी काही एक न ऐकता, कायदा मोडू नये, असे सांगून किर्तन बंद करण्यास लावले.
पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेबाबत मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले. रात्री १२ पर्यंत मीरा भाईंदर शहरात चालणारे इतर नाच गाण्यांच्या कार्यक्रमात सुद्धा अशीच तत्परता दाखवा, अशी विनंती केली आहे. गोवर्धन देशमुख यांनी पोलीस महासंचालक आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत तक्रार नोंदवली आहे.






