चांगल्या नेत्याचे एक वैशिष्ट्य असते की, तो आपल्या कार्यकर्त्यांना सातत्याने प्रेरित करत राहातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. या संदर्भात इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचे उदाहरण जगप्रसिद्ध आहे. इंग्लंडचा जर्मनीकडून पराभव अटळ आहे, असे दिसत असताना चर्चिल यांच्या एका भाषणाने सैन्यात नवी जान फुंकली आणि इंग्लंडचा विजय झाला. मोदी यांचे भाषण अगदी त्या धर्तीवर आहे. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मोदींनी अगोदरच सातत्याने मिळणाऱ्या विजयांमुळे उत्साहाने भारलेल्या भाजपामध्ये नवा जोश भरला आहे. त्यातून येत्या निवडणुकीत भाजपा ३७० जागा जिंकून पुन्हा सत्तेत येणार, यात आता काहीही शंका राहिलेली नाही. मोदी यांना जो आत्मविश्वास आहे, त्याला कारणही तसेच आहे. मोदी आणि शहा यांना टक्कर देण्यासाठी जी ‘इंडिया आघाडी’ उभारण्यात आली होती, त्या आघाडीचे तीनतेरा वाजले आहेत. आघाडी बनविण्याची मुख्य कल्पना मांडणारे नितीशकुमार हेच भाजपाच्या गोटात जाऊन बसले आहेत. अनेक माजी मुख्यमंत्री काँग्रेस सोडून भाजपामध्ये जाण्यासाठी उतावीळ झाले आहेत. अशोक चव्हाण हे तर त्याचे ताजे उदाहरण आहे.
सोनिया गांधी यांना लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत होणार, याचा इतका विश्वास असल्याने लोकसभा निवडणुकीतूनच त्यांनी पळ काढला आहे आणि त्यांनी आता राज्यसभेत मागील दाराने संसदेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सोनियांची राज्यसभा निवडणूक लढवण्याची तयारी हे एकच उदाहरण काँग्रेस पराभवाच्या शक्यतेने किती हताश झाला आहे, ते समोर येतेच. मोदी यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना काँग्रेसवर जो घणाघात केला, त्यामुळे काँग्रेस पुरती घायाळ झाली आहे.
काँग्रेसच्या घराणेशाहीवर मोदी यांनी प्रखर हल्ला चढवला आहे. काँग्रेसची घराणेशाही हे मोदी यांचे प्रमुख अस्त्र असून अजूनही काँग्रेसजनांना गांधी परिवाराचे भूत आपल्या मानगुटीवरून फेकून देण्याची बुद्धी होत नाही. या नादानपणाला काय म्हणावे. एक तर गांधी परिवार हा मते मिळवून देणारा राहिलेला नाही. राजीव गांधी, इंदिरा गांधी यांच्या काळात गांधी घराण्याच्या नावावर काँग्रेसला मते डोळे झाकून मिळत. इंदिरा गांधी यांची एक सभा मतदारसंघात लावली की, कार्यकर्ते बेफिकीर होत. आता तसा करिष्मा ना सोनिया यांच्यात आहे, ना राहुल गांधी यांच्यात. मोदी यांनी कार्यकर्त्यांमध्ये आपल्या भाषणाद्वारे नवीन जोम भरला आहे. प्रत्येक नेत्याला ते आवश्यकच असते.
काँग्रेसची अवस्था आज ओसाडगावसारखी आहे. त्यामुळे काँग्रेसकडे आज चांगला नेता नाही आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश भरणारा वक्ताही नाही. त्यामुळे खरे तर मोदी यांना आज राजकारणात प्रतिस्पर्धीच राहिलेला नाही. मोदी यांच्या बाबतीत टिना म्हणजे देअर इज नो अल्टरनेटिव्ह घटक मोठ्या प्रमाणात काम करत आहे. देशाला आज मोदी यांच्यावरच पूर्ण विश्वास आहे आणि मोदी तो सार्थ ठरवू शकतील, इतकी त्यांची कार्यक्षमता आहे. मोदी यांना येत्या निवडणुकीत पुन्हा जिंकून येण्याची खात्री तर आहेच, पण कित्येक परदेशांनाही आहे.
मोदी यांनी सांगितले की, त्यांना अनेक देशांची भावी पंतप्रधान म्हणून निमंत्रणे येऊन पडली आहेत आणि हा आत्मविश्वास सत्याच्या यथार्थ परिशीलनातून आला आहे, अज्ञानीपणातून नव्हे. अमित शहा यांनी याच कार्यकारिणीत बोलताना सांगितले की, ‘इंडिया आघाडीतील प्रत्येक नेत्याला आपल्या मुलाच्या भविष्याची चिंता आहे. त्यामुळे एकापेक्षा एक ज्येष्ठ नेते काँग्रेस सोडून भाजपामध्ये जात आहेत. विरोधी नेत्यांना ईडीचा धाक दाखवून आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे, हे विरोधकांचे म्हणणे म्हणजे निव्वळ ढोंगीपणाची परिसीमा आहे. कारण अगोदर या नेत्यांनी सत्तेवर असताना तिचा दुरुपयोग केला, भ्रष्टाचार केला आणि आता त्यापासून वाचण्यासाठी भाजपावर आरोप करण्याचा अश्लाघ्यपणा सुरू केला आहे.
अमित शहा यांनी इंडिया आघाडीच्या प्रत्येक नेत्याला आपल्या मुलाच्या भवितव्याची चिंता आहे, याचा उल्लेख करताना अनेक पक्षांची नावे घेतली आहेत. त्यात शंभर टक्के सत्य आहे. माजी मुख्यमंत्री ठाकरे यांना इंडिया आघाडीत जाऊन आपल्या मुलाचे राजकीय भवितव्य वाचवायचे आहे. पण इंडिया आघाडी म्हणजे ओसाडवाडी झाली असून ओसाडवाडीचे जहागीरदार होऊन कुणालाच काही मिळणार नाही. पण तितकाही शहाणपणा या नेत्यांकडे नाही. मोदी यांच्या दिल्लीतील भाषणाने अगोदरच जोशात असलेले भाजपा कार्यकर्ते आणखी उत्साही झाले आहेत. मोदी यांनी आपल्या भाषणातून, विरोधी आघाडी देशाचा खरा विकास घडवू शकत नाही, असे सुचवले आहे.
केवळ भाजपाच असा पक्ष आहे की जो देशाला २०४७ मध्ये विकसित देश बनविण्याचे स्वप्न पाहू शकतो, मोदी यांच्या या विधानाने विरोधक कुठे आहेत, याचे दिशादर्शन होते. अशा उत्साहाने सळसळणाऱ्या पक्षाच्या विरोधात गलितगात्र झालेल्या काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडी लढा देऊ शकत नाही, याची संपूर्ण खात्री पटल्यानेच आज भाजपाकडे नेत्यांची रिघ लागली आहे. कारण भाजपामध्ये भवितव्य आहे, हे सर्वांनाच समजून चुकले आहे आणि त्याचे संपूर्ण श्रेय मोदी यांनाच आहे. माता-पुत्रांचा हा पक्ष कधीकाळी सर्वात मोठा पक्ष होता. आज त्याची अवस्था इतकी वाईट झाली आहे की, ममता बॅनर्जी किंवा स्टॅलिन यांच्यासारखे नेतेही काँग्रेसवर दादागिरी करत असतात. जागा वाटपात काँग्रेसला आज इतरांचे ऐकून घ्यावे लागते. मोदी यांच्या कालच्या भाषणाने त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढल्याचे दिसलेच, पण आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा पहिल्यापेक्षाही जास्त जागा घेऊन जिंकून येणार, ही बाब अधोरेखित झाली आहे. एकीकडे विकासाचा दृष्टिकोन असलेला भाजपा आणि दुसरीकडे स्वतःच्या पिढ्यांचे कल्याण करण्यासाठी खालच्या पातळीवरचे प्रयत्न करणारे विरोधी पक्ष यातील विरोधाभास हा उघड आहे.