Thursday, July 25, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेकोकण विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळावा’ ठाणे येथे २९ फेब्रुवारी ते १ मार्च...

कोकण विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळावा’ ठाणे येथे २९ फेब्रुवारी ते १ मार्च रोजी होणार

विविध आस्थापनांनी रिक्त पदांची माहिती नोंदवण्याचे, बेरोजगार युवक आणि युवतींनी त्वरित नोंदणी करण्याचे आवाहन

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनातून कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत नोकरी इच्छुक युवक-युवती, तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी हायलँड ग्राऊंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे (पश्चिम) येथे कोकण विभागातंर्गत ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील नोकरीइच्छुक युवक व युवतींकरिता ‘नमो महारोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात स्टार्टअप एक्सपोचे देखील आयोजन करण्यात आले असून हा मेळावा दि. २४ आणि २५ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित केला जाणार असे घोषित करण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव या तारखांमध्ये बदल झाला असून ठाणे येथे होणारा मेळावा २९ फेब्रुवारी ते १ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होईल. या मेळाव्यात नोकरी इच्छुक युवक-युवती यांनी मुलाखतीसाठी आणि महाएक्सपो मध्ये स्टार्टअप्स, इनवेस्टर्स व इनकुबेटर्स या सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा म्हणाले की, दहावी, बारावी,आय.टी.आय., पदविका, पदवीधर, पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेवून रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत. या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. https://qr-codes.io/gdhSNd किंवा www.rojgar.mahaswayam.gov.in या लिंक वर जावून उमेदवार नोंदणी व नोकरीकरिता अर्ज करून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. एका पेक्षा अधिक नोकरीसाठी देखील एकाच उमेदवाराला अर्ज करता येवून मुलाखती देत येतील.रोजगार मेळाव्यात सहभागी होणा-या उमेदवारांनी मेळाव्याच्या अगोदर ही नोंदणी करणे आवश्यक आहे.जे उमेदवार मेळाव्याच्या अगोदर नाव नोंदणी करतील त्याच उमेदवारांच्या मेळाव्याच्या दिवशी मुलाखती होणार आहेत. या माध्यमातून दोन लाख युवक आणि युवतींना रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यामुळे सर्व विभागांनी मिळून हा रोजगार मेळावा सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत.

‘नमो महारोजगार’ मेळाव्याकरिता जास्तीत जास्त नोकरीच्या रिक्तपदे संधी उपलब्ध होण्याकरिता कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी,महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय तसेच उद्योग व कामगार विभाग यांना विविध कंपन्याशी संपर्क साधून रिक्त पदे अधिसूचित जाहीर करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.

कोकण विभागातंर्गत ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी करून रिक्त पदे अधिसूचित/जाहीर करणे आवश्यक आहे. याबाबत काही अडचण असल्यास संबंधित जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी किंवा 1800 120 8040 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -